Wednesday, February 8, 2017

सरळ मान्य करा की, प्रेमामध्ये पडला आहात...

मालिका वात्रटिका

सरळ मान्य करा की,
प्रेमामध्ये पडला आहात...

स्वत:चा वेडेपणा बघून
स्वत:वरच चिडला आहात.
स्वप्नांचे पंख लावून
पिसासारखे उडला आहात,
मग सरळ मान्य करा की,
प्रेमामध्ये पडला आहात...।। १ ।।

कुणाशी तरी बोलून बोलून
मन हलकं हलकं होत आहे.
कंटाळा आला तरी
मन बोलकं बोलकं होत आहे.

जागेपणी स्वप्न पाहून
स्वप्नामध्येच पडला आहात.
दडविण्यासारखे काहीच नसतानाही
संकोचाने दडला आहात.
मग सरळ मान्य करा
प्रेमामध्ये पडला आहात...।। २।।

कुणाच्या तरी चाहूलीने
काळीज धडधडत आहे.
राहून राहून कानमध्ये
कुणीतरी बडबडत आहे.

स्वत:तच स्वत:ला डिस्टर्ब करून
स्वत:वरतीच चिडला आहात.
मग सरळ मान्य करा की,
प्रेमामध्ये पडला आहात...।। ३ ।।

तुमच्या अंगाखांद्यावरती
मोरपिसं फिरत आहेत.
तुमच्या तना-मना‘ध्ये
फुलपाखरं शिरत आहेत.

इंद्रधनुचा गोफ करून
आकाशाशी भिडला आहात.
एक एक तारा तुम्ही
अलगदपणे खुडला आहात.
मग सरळ मान्य करा की,
प्रेमामध्ये पडला आहात...।। ४ ।।

सगळं कसं नवं नवं,
वेगळं वेगळं वाटतं आहे.
सगळं कसं हवं हवं
आगळं आगळं वाटतं आहे.

गच्च धरलेला किनारा
केव्हाच सोडला आहात.
पोहता येत नसतानाही
पाण्यामध्ये पडला आहात.
मग सरळ मान्य करा की,
प्रेमामध्ये पडला आहात...।। ५ ।।

स्वत:च्या नरड्याला गळा समजून
जाहीरपणे गुणगूणू लागलात.
आपलीच आपल्याला अक्कल पाजीत
उगीच भुणभूणू लागलात.

प्रत्येक स्पर्शामध्ये
स्वर्गाचा अर्थ काढता आहात.
ऐकूण घेणार्‍या प्रत्येकाच्या
डोक्याचा भुगा पाडता आहात.

मग सरळ मान्य करा की,
प्रेमामध्ये पडला आहात...।। ६ ।।

तुमचे जसे कळलेय,
तसे इतरांचेही कळत आहे.
आजूबाजूचा धूर सांगतोय
आत काहीतरी जळत आहे.

ओठांचा चंबू करून
नशेमध्ये बुडला आहात.
हव्या हव्याशा वाटणा‍र्‍या पिडेने
रात्रंदिवस पिडला आहात.
मग सरळ मान्य करा की,
प्रेमामध्ये पडला आहात...।। ७ ।।

जड होते जीभ,
डोळे सारे काही ओकत आहेत.
तुमचा जल्लोष बघून
भोकणारे भोकत आहेत.

कविता-बिविता लिहून लिहून
कागदाचा फडशा पाडला आहात.
नेमकी खोली माहीत नसतानाही
खोल खोल बुडला आहात.
मग सरळ मान्य करा की,
प्रेमामध्ये पडला आहात...।। ८ ।।

प्रेम बिम म्हटले की,
सगळ्यांचेच सारखे असते.
आभाळाहून मोठे अन
बारक्याहून बारके असते.

सगळे समजून येतेय तरी
कोड्यामध्ये पडला आहात.

गोड कोडे सुटू नये म्हणून
जाणीवपूर्वक अडला आहात.
मग सरळ मान्य करा की,
प्रेमामध्ये पडला आहात...।। ९ ।।

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-९९२३८४७२६९

पूर्वप्रसिद्धी-
दैनिक पुण्यनगरी
१४फेब्रुवारी२०१५

जन्मतारखेचे वाद


व्हिव्यूज ऑफ न्यूज


बिहार पॅटर्न .... मराठी वात्रटिका

  आजची वात्रटिका --------------------- बिहार पॅटर्न जसे कर्म तसे फळ, हे लगेच प्रत्यक्षात आले. महाराष्ट्रात जे कमावले, ते बिहारमध्ये गमावले ग...