Thursday, November 21, 2019

आजची अपडेट


सेनेचे हृदयपरिवर्तन

आजची वात्रटिका
---------------------------------------
सेनेचे हृदयपरिवर्तन
कालच्या रोखठोक भूमिका,
आज उलट्या सुलट्या आहेत.
आधी सरकार,मग मंदीर,
अशा आलट्या पलट्या आहेत.
हातचे सोडून देवून
पळत्याच्या मागे जायची पाळी आहे.
हिंदुत्वाला लगाम लागून,
धोक्यात दहा रुपयांची थाळी आहे.
काल ज्यांना शिव्या दिल्या,
त्यांचेच आज किर्तन आहे !
ना अँजिओग्राफी,ना अँजिओप्लास्टी,
हे तर हृदयपरिवर्तन आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5632
दैनिक पुण्यनगरी
21नोव्हेंबर2019

Wednesday, November 20, 2019

घाईतला गोंधळ

आजची वात्रटिका
---------------------------------------

घाईतला गोंधळ
काही वाक्प्रचार आणि म्हणी,
रोचक आणि खोचक असतात.
पण त्याच विषारी ठरतात,
जेंव्हा त्या जातीवाचक असतात.
भाषिक सौदर्य वाढले तरी,
त्यांना आता टाळले पाहिजे !
कितीही घाई आणि गोंधळ असो,
काही बंधन पाळले पाहिजे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-7126
दैनिक झुंजार नेता
20नोव्हेंबर2019

डेथ शूट

आजची वात्रटिका
---------------------------------------
डेथ शूट
सैतानाकडून शक्य नाही ते,
माणसांकडून करण्यात आले.
पिसाळलेल्या बैलाला इन कॅमेरा,
जेसीबीने चिरडून मारण्यात आले.
बैल हैवान असूनसुद्धा,
ते असले कृत्य करणार नाहीत !
पिसाळलेली माणसे
मारायची असतील तर
जेसीबी सुद्धा पुरणार नाहीत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5631
दैनिक पुण्यनगरी
20नोव्हेंबर2019

Tuesday, November 19, 2019

शब्दच्छल

आजची वात्रटिका
---------------------------------------
शब्दच्छल
कधी ताटातूट असते,
कधी फुटाफूट असते.
तुटले आणि फुटले तरी,
त्यांचीच जुटाजूट असते.
फुटाफूट आणि जुटाजूटीचे
त्यांच्याकडून गोडवे असतात !
तेच असतात दलाल,
त्यांच्यातच भडवे असतात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-7125
दैनिक झुंजार नेता
19नोव्हेंबर2019

पॉवर गेम

आजची वात्रटिका
---------------------------------------
पॉवर गेम
पाठीत खुपसून खंजीर,
त्यांनी सत्ता भोगली आहे.
आता मारल्या कोलांटउड्या,
त्याला म्हणती,गुगली आहे.
राजकीय मुत्सद्दीपणा म्हणजे,
उठता बसता विश्वासघात आहे.
खेळले रडीचे डाव जरी,
विद्वान बोलती, व्वा क्या बात आहे?
एकास एक, दुसऱ्यास एक,
हा वैचारिक अन्याय आहे !
दोन्ही डगरीवरती हात असून,
तिसऱ्याच्या मुंडक्यावर पाय आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5630
दैनिक पुण्यनगरी
19नोव्हेंबर2019

Sunday, November 17, 2019

चॅनलचे दूर (दैव) दर्शन

आजची वात्रटिका
------------------------------------------
चॅनलचे दूर (दैव) दर्शन
ब्रेकींग न्यूज म्हणजे,
वावड्यावर वावड्या आहेत.
न्यूज चॅनल्स म्हणजे,
विडी फुक्यांच्या चावड्या आहेत.
सर्वात आधी,सर्वात पुढे,
हे वेड तर बघा केवढे आहे?
चावड्यावरच्या वावड्यांना,
' न्यूज व्हॅल्यू ' चे वावडे आहे !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7123
दैनिक झुंजार नेता
17नोव्हेंबर2019

एकमत