Monday, May 30, 2011

मोस्ट वॉंटेड

पाकिस्तानचा भारतद्वेष
अगदी गॅरंटेड आहे.
खरे तर अख्खा पाकिस्तानच
मोस्ट वॉंटेड आहे.

त्यामुळेच आपली यादी
नक्क्कीच चुकीची आहे !
पाकिस्तानची भूमिका तर
निव्वळ फेकाफेकीची आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, May 29, 2011

महायुती

बघाबघी झाली,पसंती झाली,
टिळा-कुंकूच उरले आहे.
छत्तीसचा आकडा असूनही
अखेर एकदाचे ठरले आहे.

वरमाय,बरबाप खुशीत,
सोयर्‍या-धाय‍र्‍यांना चिंता आहे.
भावकीचा विरोध असतानाही
नव्या नात्याचा गुंता आहे.

’पटले तर व्हयं म्हणा’
हीच महायुतीची टीप आहे !
मुहूर्ताचे पुढचे पुढे बघता येईल
सध्या लिव्ह इन रिलेशनशिप आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, May 26, 2011

चळवळीचे मारेकरी

आपला वैचारिक पाया
दुसर्‍याच्या पायी घातला जातो.
चळवळीचा खरा बळी
अनुयायांकडूनच घेतला जातो.

तात्पुरता फायदा झाला तरी
हा कायमचा घाटा असतो !
चळवळ नेस्तनाबूत करण्यात
अनुयायांचा सिंहाचा वाटा असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, May 25, 2011

बळीचे बकरे

सगळेच पर्याय संपले की,
स्वार्थी पर्याय सूचला जातो.
नेत्यांची किंमत वाढते
कार्यकर्ता मात्र खचला जातो.

नको तो विचार,नको तो मार्ग,
कार्यकर्त्यांच्या गळी असतो !
नेत्यांच्या पुनर्वसनात
कार्यकर्त्यांचा बळी असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

नाटकी इतिहासकार

काही इकडचे,काही तिकडचे,
ढापणारे पाहिले मी.
जुन्यावर नवे संस्कार करून
छापणारे पाहिले मी.

अशा भाटांचेही
खूप भाट पाहिले मी.
अशा नाटकी इतिहासकारांचे
खूप थाट पाहिले मी.

आपण केले माफ जरी
इतिहास माफ करणार नाही !
काळाची कसोटीच अशी की,
हा नाटकीपणा पुरणार नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

मोबाईल खिसेकापू

आपल्या खात्यावरील पैसे
डोळ्यादेखत ढापले जातात.
मोबाईलद्वारे आपले खिसे
डोळ्यादेखत कापले जातात.

खिसे कापण्याच्या धंद्यात
मोबाईलवाला जुंपलेला असतो !
मोबाईल आणि आपलाही बॅलन्स
लढता लढता संपलेला असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, May 23, 2011

खासदार निवास

हा साधासुधा नाही,
भलताच कहार आहे.
खासदारांनीच भरलेला
दिल्लीचा तिहार आहे.

तिहारला जेल म्हणताना
आपल्याला काही वाटले पाहिजे !
यापुढे तिहारला जेल न म्हणता
खासदार निवास म्हटले पाहिजे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, May 22, 2011

जगबुडी

अनेक वेळा भविष्य सांगुनही
अशुभ काही घडले नाही.
एवढ्या अफवा पसरूनही
जग काही बुडले नाही.

निसर्ग दाखवून देतो
माणसाच्या बुद्धीची
कुठपर्यंत उडी असते ?
त्यामुळेच तर चर्चेत
नेहमी जगबुडी असते !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

अंगठीछाप

आपल्या अपयशाचे संबंध
आकाशाशी जोडले जातात.
बिचार्‍या ग्रहांच्या नावाने
उगीच खडे फोडले जातात.

जे जे तोडले जातात,
ते ते अकलेचे तारे आहेत !
अंगठीछाप लोकांपेक्षा
अंगठेछाप तरी बरे आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, May 17, 2011

अपशकुनी थोबाडं

ज्यांचे थोबाड बघावे वाटत नाही
अशांचेच थोबाड बघावे लागते.
रस्त्या-रस्त्यावरती एवढे बॅनर की,
खाली बघूनच निघावे लागते.

बघितले नाही तरी
त्यांचा सामना चुकून होतो !
रस्त्यांवरच्या बॅनरमुळेच
आम्हांला अपशकुन होतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, May 16, 2011

जातीय ओळख

पूर्वी पक्ष्यांना जात होती,
आता जाती-जातीचे पक्ष आहेत.
जातीय हितसंबंधांसाठी
अगदी जातीने दक्ष आहेत.

जाती-जातीला वापरून घेणारे
सर्वत्र जातीय दलाल आहेत !
जातीय ओळखीसाठी तर
विविध रंगी गुलाल आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, May 15, 2011

’घर-घर’ की कहानी

पैसा झाला मोठा,
माणूस खोटा होतो आहे.
’हम दो हमारे दो’ मुळे
सांस्कृतिक तोटा होतो आहे.

ज्याची त्याची गरज
पैशावरती भागली आहे.
घर नावाच्या संस्कृतीला
घर-घर लागली आहे.

प्रायव्हसी जपतानाच
कौटुंबिक जाणीव ठेवावी लागेल !
नसता घरा-घरावरती
’रेस्ट हाऊस’ची पाटी लावावी लागेल !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, May 11, 2011

(रि) पब्लिकचा सवाल

शेळी होवून जगण्यापेक्षा
पॅंथर वाघाशी दोस्ती करू लागला.
आपली घटलेली किंमत
आणखीनच सस्ती करू लागला.

कालच्या आणि आजच्या भूमिकेत
खूप टोकाचे अंतर आहे !
पब्लिक विचारू लागली,
हाच का तो पॅंथर आहे ?

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, May 9, 2011

मैत्रीनामा

ठाकरे-पवार मैत्रीचा
महाराष्ट्राला आदर आहे.
दोघांच्या मित्रत्त्वाचा सामना
वेळोवेळी सादर आहे.

दिलदार शकुनीमामाला
दिलदार शत्रुचे टोले आहेत.
आपल्या पोराबाळांच्या
वयाचा विसर पडावा,
एव्हढे ते म्हातारे झाले आहेत.

कधी बारामतीचा जादूगार,
कधी मैद्याचे पोते आहे !
तरीही राजकारणाच्या पलीकडॆ
शरदबाबूंशी नाते आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, May 8, 2011

आक्रीत लोक-रीत

लोकांशी इमानदारीने वागा,
लोक तुम्हांला हसू लागतात.
लोकांशी बेइमानीने वागा,
लोक सहज फसू लागतात.

ना नवल,ना खंत,
सगळेच कसे आक्रीत आहे !
चुकीची असली तरीही
शेवटी हीच लोक-रीत आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, May 7, 2011

मोहन जोशी (ला)

सतीशने अकलेचे ’तारे’ तोडले,
मोहनही ’जोशी’ला आहे.
मराठी नाटकांचा तमाशाच
आजकाल नशीला आहे.

एकच प्याल्याचा मोह न पड्तो तर
पुढचा तमाशा घडला नसता !
अध्यक्षपदाचा अबलख घोडा
देशोदेशी उडला असता !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, May 6, 2011

नैतिक हल्ला

सत्य उभे राहिले की,
असत्याचा कल्ला असतो.
सत्य रेटलेच नाही तर
सत्यावर नैतिक हल्ला असतो.

नैतिक हल्ले होवूनही
सत्य चिडत नाही,कुढत नाही !
सत्य बदनाम होते,
पण सत्य सत्यता सोडत नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, May 5, 2011

मरणोत्तर शंका

अफवा,प्रश्न आणि शंकांना
फा मोठा उत आहे.
ओसामा लादेन मेला तरी
जिवंत त्याचे भूत आहे.

"हा जागतिक शांततेसाठीचा लढा"
जरी ओबामा वदला आहे !
जगाने सुटकेचा नि:श्वास टाकला
तरी हा वैयक्तिक बदला आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, May 4, 2011

स्व.जगदीश खेबूड्कर

कविता वेगळी,गीत वेगळे,
हे त्यांच्यापुढे भास होते.
लेखणीची हुकूमत अशी की,
त्यांच्यापुढे शब्दही दास होते.

कविता बघा,गीत बघा,
प्रत्येक शब्द गुलाम आहे !
प्रतिभेच्या त्या जगदीशाला
हा अखेरचा सलाम आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

पहावा विठ्ठल

वारकरी साधेभोळे,
बडवे अट्ट्ल.
सेना म्हणाली मनसेला,
पहावा विठ्ठल.

छायाचित्र असो,
वा व्यंगचित्र असो,
विठ्ठलाचीच छाया आहे !
थोरल्या आणि धाकट्या पंढरीत
ज्याचा त्याचा विठुराया आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, May 2, 2011

एका लादेनचा अंत

लपाछपीच्या खेळात अखेर
लपणाराच हारला गेला.
ओसामा बीन लादेन
पुन्हा एकदा मारला गेला.

लादेनच्या मृत्यूबरोबरच
आणखी एक गोष्ट चांगली आहे !
पाकिस्तानची हरामखोरी
पुन्हा एकदा वेशीवर टांगली आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

शैक्षणिक प्रगतीपुस्तक

ना कुणी पास,ना नापास,
कुणी पहिले ना दुसरे होते.
निकालाच्या दिवशी
पहिल्यांदाच चेहरे हसरे होते.

विद्यार्थ्यांनी आनंद लुटला,
पालकांनी आनंद लुटला नाही.
मार्कांच्या आकड्याशिवाय
निकाल निकाल वाटला नाही.

प्रगतीपुस्तकाचे स्वागत करा,
गुणपत्रकांना फाटा आहे !
विद्यार्थी हा विद्यार्थीच असतो
म्हणू नका,नर्मदेचा गोटा आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

ऐतिहासिक विकृती...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- ऐतिहासिक विकृती एकीकडे खोट्या इतिहासाशी, खऱ्या इतिहासाचे लढणे चालू आहे. दुसरीकडे विकृत इतिहासाच्या, व...