Tuesday, November 30, 2010

बघा बुवा !

दवा पाहिजे,दवा देतात,
दुवा पाहिजे,दुवा देतात.
मुलंबाळं नसणार्‍या भक्तांना
मुलंसुद्धा बुवा देतात.

भक्त सोसतात,भक्त फसतात
तरीही अंधविश्वास ठाम आहे !
पटले तरच होय म्हणा,
आमचे बुवा सांगणे काम आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, November 29, 2010

न्यूज चॅनलचा बकासूर

बातम्यांच्या नावाखाली
२४ तास काहीतरी द्यायला लागते.
न्यूज चॅनल नावाच्या बकासूराला
सारखे काहीतरी खायला लागते.

नाहीच मिळाले काही तर
तेच तेच चघळत असतो !
बकबक करीत बकासूर
तेच तेच उगळत असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, November 27, 2010

ते आणि आपण

शे-पन्नास रूपये वर देऊन
नंबरशिवाय गॅस घेतोच ना?
एखादे काम पटकन होण्यासाठी
आपण शे-पाचशे देतोच ना?

ते कागदावर घरं बांधतात,
आपण अनुदान लाटतोच ना?
कागदावर विहिरी,तळी खांदून
बोगस बिलांचा नोह सुटतोच ना?

सांगा नेमका कोणता भेद
त्यांच्यात आणि आपल्यात असतो !
त्यांच्याएवढाच आपलाही
सहभाग गफल्यात असतोच ना ?

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, November 26, 2010

लोककलेचा ’विठठल’ गेला...

२६/११ ची तक्रार

एवढा मोठा धोका होवूनही
अजून काहीच शिकला नाहीत.
खर्‍या-खुर्‍या सत्यावरती
अजूनही प्रकाश टाकला नाहीत.

असे बेसावध राहिलात तर
पुन्हा कुणीतरी येऊन जाईल !
पुन्हा एखादी २६/११
बघता-बघता होवून जाईल !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, November 25, 2010

बिहारचा ऐतिहासिक निकाल

आपल्याच जाळ्यात
लालुंना फसावे लागले.
राजपुत्रालाही बिहारमध्ये
हात चोळीत बसावे लागले.

सामोश्यात आलू असतानाही
बिहारमध्ये लालु नाही !
ज्याची त्याला जागा कळाली
आपण काही बोलू नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

सावधान....

***** आजची वात्रटिका *****
**********************

सावधान....

आदर्श घोटाळ्याचा फटका
तुम्हांलाही बसू शकतो.
सावधान,तुमच्याही नावावर
सोसायटीत फ्लॅट असू शकतो.

हा काही कल्पनाविलास नाही,
प्रत्यक्षात असे घडलेले आहे !
भ्रष्टाचारी हरामखोरांनी
बिल दुसर्‍यांच्या नावे फाडलेले आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, November 24, 2010

बातम्यांचे मोजमाप

न्यूज राहिल्या बाजूला
व्ह्युज छापून येत आहेत.
प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिकवाले
सगळेच मापून घेत आहेत.

आर्थिक तर आहेच आहे,
हा वैचारिक भ्रष्टाचार आहे !
कुर्‍हाडीच्या दांड्यांचा
गोतावरतीच वार आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, November 23, 2010

रिअ‍ॅलिटी

राखी का इन्साफ
न्यायालयालाही मान्य आहे.
बिग बॉसची रिअ‍ॅलिटी बघून
प्रेक्षकही धन्य धन्य आहे.

टीआरपीच्या वाढीसाठीच
मालिकेत सगळा मसाला असतो !
कोल्हे मोकाट सुटलेले
बंदोबस्त मात्र ऊसाला असतो !!


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, November 22, 2010

हर्षद मेहताचा निरोप

माझ्याच पायावरती
नवे कळस चढवित आहात.
स्वत:चे घर भरून
देशाला बुडवित आहात.

माणसाची लालसाच
या सर्वांचे कारण होते !
एकदा आठवून बघा
कसे माझे मरण होते ?

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, November 21, 2010

सहकारनामा

गाई आटल्या,
कोंबड्या खुडूक.
सूत गिरण्यांपुढे
अंधार बुडूक.

सहकारी संस्थांना
स्वाहाकाराची फूस.
मुळासकट खाल्ला
कारखान्यांनी ऊस.

शुगर कमी,
कारखाने आजारी.
पेशंट वाढता
डॉक्टरची बेजारी.

दुसर्‍याचे बघतो कोण?
प्रत्येकजण खुद्दार !
मागच्या पिढीकडून
सात पिढ्यांचा उद्धार !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

मोबाईल घोटाळा

Saturday, November 20, 2010

खातेवाटप

हे नको;ते हवे,
प्रत्येक मंत्री कुंथत असतो.
मालदार खात्यामध्येच
सर्वांचा जीव गुंतत असतो.

शेवटी मिळेल ती जबाबदारी
पार तर पाडली जाते !
खाते भाकड असले तरी
त्यातून मलई काढली जाते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, November 19, 2010

लोकशाहीच्या वल्गना

बाप केंद्रात,मुलगा राज्यात,
जिल्हा परिषदेत नातू असतो.
कुणी म्हणायला गेले तर
जनकल्याण हाच हेतू असतो.

उरलेल्या ठिकाणी
लेकी-सुना बसवल्या जातात !
लोकशाहीच्या वल्गना
पद्धतशीर प्रसवल्या जातात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, November 18, 2010

भ्रष्ट तुलना

आमचा छोटा,तुमचा मोठा
घोटाळ्यांच्या तुलना चालल्या आहेत.
रूचल्या तरी पचणार नाहीत
अशासुद्ध गोष्टी खाल्ल्या आहेत.

तेच आता उघडे पडलेत
जे जे पाप झाकणारे आहेत !
लोकांनाही दिसू लागले
कोण कोण पांघरूण टाकणारे आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, November 17, 2010

रेकॉर्ड ब्रेक घोटाळे

षंढालाही चीड यावी
एवढे अतिरेक होत आहेत.
घोटाळ्यांनीच घोटाळ्यांचे
रोज रेकॉर्ड ब्रेक होत आहेत.

लाज-लज्जा आणि नैतिकता
यांना केंव्हाच ’टाटा’आहे !
आजचा घोटाळा पाहिला की वाटते,
कालचा कितीतरी छोटा आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, November 16, 2010

डिजिटल राजे

पासंगालाही पुरणार नाहीत
एवढे नेते खुजे आहेत.
तरीही महाराष्ट्रामध्ये
जाणते राजेच राजे आहेत.

कार्यकर्त्यांच्या अजाणतेपणात
जाणत्या राजांचे मूळ आहे !
बावळ्यांच्या मावळेपणात
डिजिटल बॅनरचे खूळ आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

टाटांचा गौप्यस्फोट

एखादे काम फुकटात झालेय
असे कधीच घडले नाही.
प्रत्यक्ष टाटांनासुद्धा
लाच मागायचे सोडले नाही.

जिथे टाटांना भ्याले नाहीत
तिथे आमच्यासारख्यांचे काय आहे?
टाटांकडे तरी पैसा आहे,
आमच्याकडे खायला हाय आहे !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, November 14, 2010

घोटाळ्यांचा दूरसंचार

गॉड आणि फादर

वरचेही पोसावे लागतात,
खालचेही पोसावे लागतात.
राजकारणात गॉड आणि फादर
दोन्हीही असावे लागतात.

राजकीय भवितव्याचा खेळच
शाप आणि उ:शापांचा असतो !
प्रत्येक राजकीय पक्षच
अनेक बापांचा असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, November 13, 2010

सरकारी ’बाबू’राव


आबूराव सोकलेले आहेत,
खाबूराव सोकलेले आहेत.
सरकारी कार्यालयांमधून
’बाबू’राव सोकलेले आहेत.

आबूरावांचा बळी दिला जातो,
खाबूरावांचा बळी जातो !
बाबूरावांच्या हातावर
बाबूराव टाळी देतो !!


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, November 12, 2010

वेडी आशा

कितीही काढायचे म्हटले तरी
आमच्या मनातून जात नाही.
दिल्लीने दाखवून दिले
महाराष्ट्रात स्वच्छ ’हात’नाही.

’गर्जा महाराष्ट्र माझा’म्हणण्याची
काही सोय उरली  नाही !
बरबटलेल्या राजकारणातही
आम्ही हिंमत हारली नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, November 11, 2010

प्रश्नांकित बदल

नांदेडला शोककळा,
सारार्‍यात धामधूम झाली.
बारामतीत दिवाळी तर
नाशिकला सामसूम झाली.

सामाजिक समतोलाचा मुद्दा
दुमता-तिमता आहे !
परिषद विचारू लागली,
हीच का ’समता’ आहे ?

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, November 10, 2010

दुहेरी खांदेपालट

कुणाला कुटाण्यावारी जावे लागले,
कुणाला फुटाण्यावारी जावे लागले.
’दादा’गिरीपुढे अनुभवाला,
अगदी वाटाण्यावारी जावे लागले.

एकीकडे पृथ्वी-राज,
दुसरीकडे अजित पॉवर आहे !
खांदेपालटीचा खरा साक्षीदार
आदर्श सोसायटीचा टॉवर आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, November 9, 2010

आदर्श ते आदर्श

अशोकपर्वाचा अस्त

प्रशासनापेक्षा शासनाचाच
गाजावाजा जास्त झाला.
आदर्शाचा पहिला बळी म्हणून
अशोकपर्वाचा अस्त झाला.

अशोकपर्वाचा अस्त होताच,
बाकीचेही बुजले आहेत !
हे विसरूण चालणार नाही,
सोसायटीला ३१ मजले आहेत !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, November 8, 2010

ओबामांचे प्रमाणपत्र

आम्ही म्हणतो,महासत्ता व्हायचे आहे;
ते म्हणाले,महासत्ता बनला आहे.
त्यांच्या या धूर्तपणातला
मतलब आम्ही जाणला आहे.

याचा अर्थ असा नाही,
त्यांचे थोडेफारही खरे नाही !
मात्र मेंढीसारखे हूरळून
वाघाच्या नादी लागणे बरे नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, November 6, 2010

ओबामा भेट

ओबामाच्या भेटीचा
केवढा गाजावाजा आहे?
यातून हाच संदेश मिळतो
मीच जगाचा राजा आहे.

आम्ही मोजीत बसलो
भेटीचा खर्च किती आहे ?
जगाचा राजा असला तरी
त्याला जीवाची भीती आहे !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, November 4, 2010

आक्र ss मण......!!

वळवळणारी खेळपट्टीही
सपाट होवू लागते.
फलंदाज ठोकायला लागला की,
झकत साथ देऊ लागते.

विचार नको ट्वेंटी20,
वन डॆ की टेस्ट असते ?
कुठल्याही खेळामध्ये
आक्रमणच बेस्ट असते !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, November 2, 2010

घरगुती फटाके

बायको अ‍ॅटमबॉम्ब असेल तर
नवर्‍याचा नक्की भुईनळा होतो.
तिच्या आवाजापुढे
बिच्चार्‍याचा खुळखुळा होतो.

तो सुतळी बॉम्ब असेल तर
ती सुतासारखी सरळ होते !
टिकल्या तर वाजणारच
प्रदर्शन मात्र विरळ होते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

कोरोना युग