Sunday, June 19, 2011

फसलेले बंड

एक नेता रूसला
त्याला बंडाचा किडा डसला.
नेहमी युद्धात जिंकणारा
नेमका तहामध्ये फसला.

मागे कुणीच उरले नाही,
त्याची भूमिकाच टोकाची होती !
पूर्वीचेच दिवस बरे होते,
झाकली मूठ सव्वालाखाची होती !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, June 17, 2011

पक्षाघात ते पक्षांतर

कालचा नाथही
कधी कधी अनाथ असतो.
पक्षांतराच्या मुळाशी
नेहमी पक्षाघात असतो.

जो गडगड करी
तो कधीच पडत नसतो !
पक्ष सोडतो म्हणणारा
कधीच पक्ष सोडत नसतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, June 16, 2011

प्रिय नेत्यांनो.....

तुम्हांला जिकडे जायचे
तिकडे तुम्ही जा हो..
कार्यकर्त्यांची फरफटही
लक्षात तुम्ही घ्या हो...

तुमच्या मागे फरफटत जाणे
याचेच नाव निष्ठा असते !
तुमचे पक्षांतर म्हणजे
कार्यकर्त्यांची चेष्टा असते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, June 12, 2011

वजन घटवायचे आहे?

आपले वजन घटवायला
जे उताविळ झाले आहेत.
त्यांना योगासन आणि उपोषण
असे दोन पर्याय खुले आहेत.

मात्र रामदेवबाबांच्या उपोषणामुळे
एक गोष्ट सर्वांना पटू शकते!
योगासनापेक्षा उपोषणानेच
वजन लवकर घटू शकते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, June 10, 2011

सुगीचे दिवस

साठेबाजांच्या मढयावर
घालायचे ते घातले जाते.
खताबरोबर बियाणेही
मागच्या दाराने घेतले जाते.

कडू बेण्यांचे नशीबच
साठेबाजीमुळे फळफळले जाते !
सरकारी सौजन्यानेच
काळ्याबाजाराला
खतपाणी मिळले जाते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, June 9, 2011

भ्रष्टाचाराची जननी

गरजवंत तो गरजवंत,
अक्कलनाम शून्य असतो.
गाढवांचे पाय धरण्याएवढा
भ्रष्टाचार परिस्थितीजन्य असतो.

आमची ही प्रतिक्रिया
विचारांची आहे,क्रोधाची नाही !
गरज ही भ्रष्टाचाराची जननी आहे,
ती केवळ शोधाची नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

आधुनिक बकासूर

***** आजची वात्रटिका *****
**********************

आधुनिक बकासूर

बातमी कशाचीही होवू शकते,
बातमीला काही लागत नाही.
तरीही न्यूज चॅनलच्या बकासूराची
भूक कशानेच भागत नाही.

भस्म्या नावाचा रोग
या बकासूराची भूक जिवंत करतो !
रिकाम्या वेळी हा बकासूर
नको त्या बातम्यांचा रवंथ करतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, June 8, 2011

बदलते रंग

मतांच्या राजकारणापोटी
सारेच खुळे झाले.
घडयाळाच्या डायलबरोबर
काटेही निळे झाले.

हे धोरणात्मक निर्णय नाहीत,
हे राजकीय सट्टे आहेत !
आजकाल वाघाच्या अंगाबरही
निळे निळे पट्टे आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, June 7, 2011

काळे इंग्रज

हे राज्य गोर्‍या इंग्रजांचे नाही,
हे राज्य काळ्या इंग्रजांचे आहे.
हे राज्य आपले वाटत नाही,
हे राज्य त्यांचे आणि त्यांचे आहे.

उपोषण,सत्याग्रह,चळवळ
यांना काळ्या इंग्रजांची भीक नाही !
जाऊन जाऊन जातील कुठे?
त्यांना’चले जाव’ म्हणणेही ठीक नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, June 6, 2011

सामाजिक गरज

जरी अण्णा भरडला जातो,
एखादा बाबा चिरडला जातो.
जनतेच्या वतीने
कुणीतरी ओरडला जातो.

सारे काही आलबेल असल्याचा
सरकारचा दावा असतो !
त्यामुळेच जनतेला एखादा
अण्णा किंवा बाबा हवा असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, June 4, 2011

निष्ठेचे पुतळे

एकमेकांच्या इज्जतीचे
जाहीर कोथळे आहेत.
रस्त्या-रस्त्यावर उतरलेले
निष्टेचे पुतळे आहेत.

पुतळ्यांची विटबंणा,
पुतळ्याची जाळा-जाळी आहे !
छुSS म्हटले की भुंकणा‍र्‍या
निष्ठावंतांची जातच खुळी आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, June 3, 2011

भ्रष्टाचारमुक्तासन

उठसुठ उपोषण करणे
ही लोकशाहीतली फॅशन आहे.
रामदेव बाबांचे मात्र
भ्रष्टाचारमुक्तासन आहे.

पवनमुक्तासन,
भ्रष्टाचारमुक्तासन
यातले साम्य ध्यानात येऊ शकते !
रामदेव बाबांचे उपोषण
योगा-योगाने रेकॉर्ड ब्रेक होवू शकते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

उपोषण

बायको स्वयंपाक करेना,
रागावणार नाही तो नवरा कसला?
उपोषणाच्या बातम्या ऐकून
नवराही उपोपोषणाला बसला.

तसाही उपवास घडला असता,
असाही उपवास घडला गेला !
उपासमारीचा प्रसंग
उपोषणाच्या नावे पडला गेला !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, June 2, 2011

प्या आणि पाजा

एकविसला बियर,
पंचविसला दारू.
पेताडांनो पिताना
विचार नका करू.

ही वयाची अट आहे,
हा दारूचा भाव नाही !
सरकारी उदारतेपुढे
दारूबंदीचे नाव नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, June 1, 2011

नामांतर ते नामविस्तार

पुरूषप्रधान संस्कृतीचे वर्चस्व
अगदी गृहीत धरलेले असते.
लग्नानंतर स्त्रियांचे नामांतर
अगदी पक्के ठरलेले असते.

दोन-दोन आडनावे लावण्याचा
स्वाभिमानी स्त्रियांना मोह असतो !
राजकारणाप्रमाणे संसारातही
नामांतराच्या प्रसंगाला
नामविस्ताराचा शह असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

ऐतिहासिक विकृती...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- ऐतिहासिक विकृती एकीकडे खोट्या इतिहासाशी, खऱ्या इतिहासाचे लढणे चालू आहे. दुसरीकडे विकृत इतिहासाच्या, व...