Thursday, May 31, 2012

बंदचा ताळेबंद


कुणाचा बंद बंदिस्त,
कुणाचा बंद खुला असतो
कुणाचा बंद कडकडीत
कुणाचा बंद ढिला असतो

चित्र-विचित्र, आगळ्या-वेगळ्या
बंद बंदच्या गोष्टी असतात
त्या बंदचा तळतळाट जास्त
जेव्हा लोक कष्टी असतात!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Wednesday, May 30, 2012

कौतुकाचे गालबोट

पांडवांच्या सत्काराला
सांगा कौरव हवेत कशाला?
बरबटलेल्या हातांनी
कुणाचे गौरव हवेत कशाला?


कौरवांची प्रतिष्ठा वाढते
पांडवांना पहा काय वाटते आहे?
द्रौपदीला वस्त्रहरणाचे
पुन्हा पुन्हा भय वाटते आहे!!


- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Sunday, May 27, 2012

फोडा आणि राज्य करा

लोक एकत्र आले की, 
सत्तास्थानं डळमळू लागतात.
कळायच्या त्या गोष्टीही 
ज्यांना त्यांना कळू लागतात.


फोडा आणि राज्य करा म्हणीत
लोकांची फोडाफोडी सुरू होते!
गोर्‍या इंग्रजांची औलाद मग
काळ्या इंग्रजांची गुरू होते!!


- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Saturday, May 26, 2012

गुणवत्तेचे मानक

गुणपत्रकातले गुण
हेच गुणवत्तेचे मानक आहे.
कुणापेक्षा किती जास्त?
हाच गुणवत्तेचा गुणक आहे.

गुणपत्रिकेतील गुण दिसतात
अंगातल्या गुणांचा पत्ता नाही!
केवळ आकडेवारी म्हणजे काही
सर्वागीण गुणवत्ता नाही!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Friday, May 25, 2012

ग्राहक जागृती


पेट्रोलच्या दरवाढीने
सार्‍या देशात आग आग झाली.
सरकारचे माहीत नाही
पण ग्राहकांना मात्र जाग आली.

खाओ, पिओ, मजा करो
गोव्याचे धोरण मस्त आहे!
चला टाक्या फुल्ल करू
गोव्यात पेट्रोलही स्वस्त आहे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Thursday, May 24, 2012

पेट्रोलची साडेसाती

भाववाढ साधीसुधी नाही
एकदमच अती आहे.
तुमच्या आमच्या मागे
पेट्रोलची 'साडेसाती' आहे.


थोडीफार झाली असती तर
वाटले असते, चला ठीक आहे!
गाडीचे अँव्हरेज काढायचे तर
आता रुपयाला किक आहे!!


- सूर्यकांत डोळसे (पाटोदा, बीड)

Wednesday, May 23, 2012

संसदेचे शुद्धीकरण

उपोषण आणि आंदोलनाला
आणखी एक कारण होईल.
आम्हांला नाही वाटत
कुणाच्या उपोषणामुळे
संसदेचे शुद्धीकरण होईल.

हा विचारच असंसदीय ठरतो
आपली संसद बाटलेली आहे !
शुद्धीकरणाची केविलवाणी धडपड
आम्हांला निरर्थक वाटलेली आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

'खान'दानी फरक

'खान'दानी फरक

कुठे आमिर? कुठे शाहरूख
दोघांत 'खान'दानी फरक आहे.
आयपीएलची नशा
सर्वाच्याच प्रतिमेस मारक आहे.

आमिरच्या हातामध्ये
'सत्यमेव जयते'चा झेंडा आहे!
शाहरूखचा 'किंग' पणावर
आपल्या हाताने धोंडा आहे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Tuesday, May 22, 2012

वाचवा आणि वाचा


ग्रंथालयांच्या पडताळणीत
कागदं तपासले जाऊ लागले.
प्रत्यक्ष वाचकांना सोडून
सगळे काही पाहू लागले.

केवळ ‘पुस्तकी’पडताळणी नको
वाचक पडताळणी व्हायला पाहिजे !
‘वाचवा आणि वाचा’
अशी तंबी द्यायला पाहिजे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

आयपीएल टच

निवृत्ती घेतलेलेही
परत फिरून आले.
आयपीएलच्या स्पर्शाने
म्हातारेही तरुण झाले.


तरुणाईच्या मस्तीबरोबर
म्हातार्‍यांनाही चळ आहे!
चिअर्स गर्ल्सच्या प्रदर्शनाची
बारबालांना झळ आहे!!


- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Monday, May 21, 2012

... आयपीएल तेरे लिए

क्रिकेट बदनाम हुआ 
आयपीएल तेरे लिए,
मैदानावर मुन्नीची डमी आहे
आयपीएलच्या माध्यमातून 
क्रिकेटमध्ये रम, रमा, रमी आहे.


सट्टेबाजांनाही जेवढे जमले नाही
आयपीएलने ते काम केले आहे!
ट्वेण्टी-20च्या माध्यमातून 
क्रिकेट शंभर टक्के बदनाम झाले  आहे!!


- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Sunday, May 20, 2012

ग्रंथालय पडताळणी

शाळांचे घोटाळे पचले नाहीत
ग्रंथालयांचे घोटाळे पाचक आहेत.
कागदावरती पुस्तकं
कागदावरतीच वाचक आहेत.


ग्रंथालयांची पडताळणी
धडाक्यात पार पाडली जाईल!
महाराष्ट्राची वाचक संख्या
विक्रमी संख्येने वाढली जाईल!!


-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Saturday, May 19, 2012

निरमा आणि राज्यसभा

निरम्याच्या जाहिरातीचा
बघा कसा करिश्मा आहे.
राज्यसभेत दाखल
रेखा,हेमा,जया और सुषमा आहेत.

सबकी पसंद राज्यसभा
हा नवा अनुभव दिला आहे !
राज्यसभेच्या सभागृहात
सिलसिला एके सिलसिला आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

खुशखबर

दुष्काळाचा फायदा घेत
जिकडे-तिकडे लूट आहे.
हागणदारीमुक्त योजनेला 
दुष्काळापुरती सूट आहे.


वापरायला आणायचे कुठून?
जिथे प्रश्न पिण्याचा आहे!
सरकारनेही हात टेकले
शेवटी प्रश्न पाण्याचा आहे!!


- सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

Friday, May 18, 2012

पुन्हा पुन्हा ‘बळी’ नको !

बळीराजाचे स्वप्न सारे
क्षणात धुळीला मिळत असते.
उठसूठ ‘बळी’जाण्याची सजा
राजा बळीला मिळत असते.

मनात आले तर हाती खुट्टॆ घेऊन
बळीराजा उट्टे काढू शकतो !
अयुष्याशी खेळणारांना
तो पाताळात धाडू शकतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

सिलसिल्याची कॅसेट

सावरून बसली राज्यसभा
जेव्हा ती 'रेखांकित' झाली होती.
टक लावून बसले कॅमेरे
जया शंकीत झाली होती.

नको ती बहादुरी बघून
जयाचा 'अभिमान' जागा झाला!
सिलसिल्याची कॅसेट ऐकून ऐकून
डोक्याचा अक्षरश: भुगा झाला!!- सूर्यकांत डोळसे ,पाटोदा(बीड)

Thursday, May 17, 2012

गोगलगायीचे व्यंगचित्र


मी गोगलगायीला म्हणालो,
तुझे व्यंगचित्र काढले आहे.
ती संथपणे म्हणाली,
त्यात काय विशेष घडले आहे?

मी चिथावणी दिली
निषेध कर,मोर्चा काढ.
भावना दुखावल्या म्हणीत
मोठमोठ्याने गळा फाड.

अभिव्यक्तीचा विजय असो
गोगलगाय शिंगे रोखत म्हणाली !
कळलाव्यांनो सावधान...
ती माझा डाव जोखत म्हणाली !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

स्पॉट फिक्सिंग

फोरवर फोर
सिक्सवर सिक्स आहेत.
स्पॉट स्पॉटला जाणवते
आयपीएल मॅच फिक्स आहेत.

आयोजक आणि प्रायोजकांचीही
आता 'पाचा'वर धारण आहे!
जिथे पैशाला महत्त्व,
तिथे इमानदारीचे काय कारण आहे!!


- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Wednesday, May 16, 2012

दुकानदारी


यांनी थाटले, त्यांनी थाटले
सगळे दुकान थाटून झाले.
वाटता येतील तेवढे
महापुरुष वाटून झाले.

महापुरुषांचा उपयोग
केवळ राजकारण्यांसाठी आहे!
महापुरुषांच्या दुकानावर
आपापल्या मालकीची पाटी आहे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Tuesday, May 15, 2012

भारनियमनाचे प्रतिपादन

एकाच्या माथ्यावर
दुसर्‍याचे पाप आहे.
वाढत्या भारनियमनाला
वसुलीचे माप आहे.

भारनियमनाच्या प्रतिपादनाला
नवा नवा पर्याय सुचत आहे
विजेची निर्मिती म्हणजेचत
विजेची बचत आहे!!

- सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

Monday, May 14, 2012

लेखनसंहिता


व्यंग-चित्र

थोडीशी संधी भेटली की,
सोम्या-गोम्या पेटून उठला जातो.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा  गळा
जगजाहीरपणे घोटला जातो.

निषेध काही प्रामाणिक नसतो
त्यात राजकीय रंगाचा भाग असतो!
यातून जो चित्रित होतो
तो राजकीय व्यंगाचा भाग असतो!!

- सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

Saturday, May 12, 2012

दुष्काळ:एक उत्सव

पाणी पिता येते,
चाराही खाता येतो.
छावण्यातल्या शेणाचा
घासही घेता येतो.

सरकारी तिजोरी
बिनबोभाट साफ करता येते.
शेतकर्‍याचे कर्ज-बिर्ज
थोडेफार माफ करता येते.

गल्लीत गोंधळ घालणारे
दिल्लीत मात्र मुजरा करतात !
सगळे मतभेद सारून
ते दुष्काळ साजरा करतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)

पाण्याची बोंबाबोंब


धरण उशाला असूनही
कोरड मात्र घशाला आहे.
पाण्यासारखा घातला पैसा
सांगा तो कशाला आहे?

लोकांच्या तोंडातले पाणी
कुणाच्या तरी घशात आहे!
पाण्यासाठी बोंबाबोंब
अख्ख्या महाराष्ट्र देशात आहे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
    मो. : 9923847269

Friday, May 11, 2012

नैसर्गिक धडा


आपण पाणी अडवीत नाही,
आपण पाणी जिरवीत नाही.
जमिनीची पुरती तहान
आपण कधीच पुरवीत नाही.

आपली सगळी मस्ती
निसर्ग पुरती जिरवू लागला!
दुष्काळाचे कडक धडे
दरवर्षी गिरवू लागला!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Thursday, May 10, 2012

'गुरु'किल्ली


आपल्या मेंदूवरती
आपलाच ताबा लागतो.
नाही तर गुरू म्हणून
एखादा भोंदूबाबा लागतो.

गुरू असावा गुरूसारखा
एखादा भंपक बाबा नको!
गिर्‍हाईकांची वाट बघत
बगळ्यासारखा उभा नको!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Wednesday, May 9, 2012

लिंगबदलाचे व्याकरण

मुलीचा मुलगा होतो,
मुलाची मुलगी होते.
लिंगबदलाच्या व्याकरणाने
डफडय़ाची हलगी होते.


अधले-मधले राहण्यापेक्षा
बदललेले लिंग असते!
आपल्या डोळ्यांवरती मात्
सांस्कृतिक भिंग असते!!


- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Tuesday, May 8, 2012

प्रशासकीय बदल्या

ज्याला जायचे आहे
त्याला जाऊ दिले जात नाही.
ज्याला राहायचे आहे
त्याला राहू दिले जात नाही.

प्रशासकीय बदल्यांचे
हेच धोरण नडले जाते!
अडले-नडले दिसले की
दलालांना स्फुरण चढले जाते!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Monday, May 7, 2012

यशस्वी 'कला'कार


यशस्वी 'कला'कार

सर्वाच्या कला-कलाने घेणे
ही आघाडी धर्माची कला आहे.
आपल्या घडय़ाळबाबांचा
रोज टोळ्यावर टोला आहे.

कला-कलाने कसे घ्यावे?
याचे अनुभव त्यांना फार आहेत!
नाहीतरी आघाडी सरकारमधले
तेच यशस्वी कलाकार आहेत!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Sunday, May 6, 2012

खेळपट्टीवरचा संवाद


बॅट म्हणाली बॉलला
बघ आपला केवढा थाट आहे.
राज्य अंधारात असतानाही
आयपीएलमध्ये चमचमाट आहे.

यावर बॉल उत्तरला,
तोंडाचा पट्टा जरा आवरता घे,
क्रिकेट सभ्य माणसांचा खेळ आहे!
हौद से गई वो बुँद से नही आती
म्हणूनच तर ही वेळ आहे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Saturday, May 5, 2012

टॅंकर आणि नळ

दुष्काळा फायदा
सगळ्यांनाच कळाला.
आता कसे वाटतेय?
टॅंकर म्हणाले नळाला.

दुष्काळाचा आनंद
टॅंकरच्या टाकीत मावला नाही.
टॅंकरचा वाहता उन्माद
नळाला काही भावला नाही.

मग नळ कोरडेपणाने म्हणाला,
तुझे ते माझे,माझे ते तुझे आहे !
पाण्याचा पत्ता नाही,
केवळ योजनांचे ओझे आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

जरा लाईट ली घ्या


लचकत येते, मुरडत जाते
तिचे वय 16 आहे.
ग्रामीण भागाकडे
तिचा तिरपा डोळा आहे.

12 महिने, 13 त्रिकाळ
तिच्यावरती लोड असतो!
पूर्णवेळ थांबली नाही तरी
तिचा धक्का गोड असतो!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Friday, May 4, 2012

आवडता दुष्काळ


दुष्काळाचा फायदा घेत
पंप हात मारू लागले.
टँकर्सही चेष्टा करीत
आल्यासारखे करू लागले.

भलत्याच खुशीमध्ये
टँकर लॉबी आहे.
पिकांच्या आणेवारीपुढे
दुष्काळाची समस्या उभी आहे.

टंचाई असो वा दुष्काळ?
आलेली संधी सोडतो कोण?
दुष्काळ आवडे सर्वाना
नसल्या भानगडीत पडतो कोण?

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Thursday, May 3, 2012

दुष्काळाचे मोजमाप

टंचाई आणि दुष्काळात
सरकारी अंतर असते.
दुष्काळ ठरविणारे
आणेवारीचे तंतर असते.

आणेवारीच्या मापाने
दुष्काळ मोजला जातो !
अस्मानी आणि सुल्तानी दुष्काळ
पाचवीलाच पूजला जातो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

नायक ते खलनायक

ज्याची मुळीच लायकी नाही
त्याला बळेच लायक केले जाते.
कुणी त्याबद्दल बोलले की,
त्यालाच खलनायक केले जाते.

नालायकांना लायक,
नायकांना खलनायक केले जाते!
शाहिरांची मुस्कटदाबी करून
झिलकर्‍यांना गायक केले जाते!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Wednesday, May 2, 2012

आठवीपर्यंतचा निकाल

आजचा विद्यार्थी म्हणजे
'गुण'वंत प्राणी आहे.
त्याच्याच निकालपत्रकावर
श्रेणी एके श्रेणी आहे.


पालक नावाचे मालक
निकालपत्रक वाचू लागले!
अ टू, ब टू, क टू सत्य
पारंपरिक नजरेला टोचू लागले!!


- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Tuesday, May 1, 2012

हिमालय बोले सह्याद्रीला

वाटाघाटी, लाटालाटी करण्याते
जो तो तिथे सज्ज आहे.
महाराष्ट्राची नवी ओळख
महाराष्ट्र 'आदर्श' राज्य आहे.


'अटके'पार लागले झेंडे, 
कुणी जामीन देऊ शकत नाही.
तुझीच लाज तूच राख
मी मदतीला येऊ शकत नाही.


दिल्लीचे तू तख्त राखले
याची मजला जाण आहे!
न्यायाची तडजोड नको
तुला शिवबाची आण आहे!!


- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

भविष्यवाणी ... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका --------------------- भविष्यवाणी अजूनही या प्रश्नांची उत्तरे, कुणालाच मिळाले नाहीत. जगाचे भविष्य सांगणाऱ्यांना, स्वतःचे मृत्...