Saturday, June 30, 2012

दुर्दैवी चित्रकामावर मजूर नसतातच
मजुरांची डमी असते.
रोजगार हमी योजना म्हणजे
भ्रष्टाचाराची हमी असते.

रोजगाराची हमी आहे
असे कागदोपत्री बोलले जाते !
योजना कोणतीही असो,
तिला वाटून-वाटून खाल्ले जाते !!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Wednesday, June 27, 2012

ज्याची त्याची 'डोके 'बाजीकेवळ भजनापुरतेच
राष्ट्रपुरुष भजले जातात.
विचार सोडून देऊन
फक्त फोटोच पुजले जातात.

राष्ट्रपुरुष डोक्यात घेण्यापेक्षा
डोक्यावर घेणे सोपे असते!
विचारांचे पाईक होण्याऐवजी
झिलकरी होणे सोपे असते!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Monday, June 25, 2012

पळवापळवी

पटपडताळणीच्या धाकाने
नको त्या गोष्टी घडू लागल्या.
जिल्हा परिषदेच्या शाळा
विद्यार्थ्यांविना ओस पडू लागल्या.

कुणाला वाटेल, पालकांच्या मनाची
ही वळवावळवी आहे!
ही वळवावळवी नाही
ही विद्यार्थ्यांची पळवापळवी आहे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Sunday, June 24, 2012

लग्नाचा प्रस्ताव


लग्नाचा प्रस्ताव

बेडूक म्हणाला बेडकीला,
पावसाचा प्रश्न सोडवून टाकू.
तुझ्या-माझ्या लग्नाचा बार
चल एकदाचा उडवूनटाकू.

बेडकी फुगत म्हणाली,
असे वेडय़ासारखे वागायचे नाही!
तुझ्या-माझ्या लग्नाने
कोल्हय़ाचे लग्नही लागायचे नाही!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Friday, June 22, 2012

मंत्रालयातील आग

मंत्रालयाला लागली आग 
राज्यभर संशयाचा धूर निघाला.
लोकांच्या बोलण्यातून 
अविश्वासाचा सूर निघाला.

फायलींची तर राख झाली 
विश्वासाची राख होऊ नये! 
चौकशीतून सत्य बाहेर यावे
तेही जळून खाक होऊ नये!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Thursday, June 21, 2012

आघाडी धर्म


राजकीय विरोधकांकडून
नेहमी वर्मावर बोट असते.
आघाडीतल्या आघाडीत
आघाडी धर्मावर बोट असते.

आघाडीतला राजकीय तणाव
किती तरी जबरी असतो!
कितीही ताणा, तुटत नाही
आघाडी धर्म रबरी असतो!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड) 

Monday, June 18, 2012

पावसाचा स्वभाव

पाऊस नेहमी मंगल करतो,
पाऊस कधी दंगल करतो
वेधशाळेच्या अंदाजांची
पाऊस नेहमी टिंगल करतो.

पाऊस रुजला जातो,
पाऊस पुजला जातो
कित्येक किलोमीटर पडूनही
पाऊस सें.मी.त मोजला जातो

म्हणूनच पाऊस रुसतो
कुठेतरी दडी मारून बसतो!
भरलेले आभाळही
डोळ्यादेखत मोकळे करून बसतो !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Sunday, June 17, 2012

'प्रणव' ओंकार

आपल्या मुखाने मर्जी जाहीर करून
काँग्रेसने 'प्रणव' ओंकार केला.
यादव झाले मुलायम
मायावतींकडूनही हुंकार आला.

मावळत्याला विचारतो कोण?
उगवत्याला सलाम आहे!
डाव्या ठरलेल्या ममतांसाठी
सबुरीचा 'कलाम' आहे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Saturday, June 16, 2012

दी ग्रेटेस्ट इंडियन


कुठे बंदा रुपया?
कुठे खुर्दा आहे?
सर्वोत्कृष्ट भारतीय ठरवताना
कुणाचीही कुणाशी स्पर्धा आहे.

सर्वोत्कृष्ट भारतीय निवडणे
हा शोध नाही, जावईशोध आहे!
अनाठायी तुलना करू नये
यातून हाच खरा बोध आहे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Friday, June 15, 2012

आरक्षणाचा आधारस्तंभ


राष्ट्रपतीपदाची उमेदवारी


उमेदवारी जाहीर करण्यात
आघाडीमध्ये आघाडी आहे.
एकमत व्हायचे सोडून
बिघाडीवर बिघाडी आहे.

आपल्याच हाताने
आपलाच उल्लू आहे!
उमेदवारांच्या नावांचे
रोज नवेनवे पिल्लू आहे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Wednesday, June 13, 2012

देशद्रोहाचा गुन्हा


कुणाच्याही राष्ट्रप्रेमी टाळक्यात
तिरसटपणा घुसू शकतो.
भ्रष्टाचारविरोधी लढा
देशद्रोह कसा असू शकतो?

हा देशद्रोहाचा गुन्हा असेल तर
परत गुन्हा करावा लागेल!
राष्ट्रप्रेमाच्या व्याख्येचा विचारही
नव्याने पुन्हा करावा लागेल!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)


Tuesday, June 12, 2012

चोरांचे स्वागत

ज्यांचे तोंड काळे आहे
ते उजळ माथ्याने फिरत आहेत.
सज्जनाबरोबर कायद्याचीही
जाहीर चेष्टा करत आहेत.

चोरांचेच जयजयकार,
चोरांचेच आगत-स्वागत आहे!
न केलेल्या पापांची शिक्षा
इथे सज्जन भोगत आहे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)


Monday, June 11, 2012

परिवर्तनाचे साधनसत्तेच्या साधनाचा
परिणाम अगदी उलट होतो.
जनता राहते बाजूला
नेत्यांचाच कायापालट होतो.

कालचा गरीब नेता
आज नको तेवढा सधन आहे!
उदाहरणासहित सिद्ध होते
सत्ता परिवर्तनाचे साधन आहे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Sunday, June 10, 2012

शाब्दिक उद्योग

शाब्दिक उद्योग


सध्या महाराष्ट्राच्या नशिबाचे
अनिष्ट योग चालू आहेत.
कुरघोडीच्या राजकारणाचे
वेगळेच 'उद्योग' चालू आहेत.

शह-काटशहाचे प्रसंग
नेहमीच गृहीत धरावे लागतात!
जणू राजकीय करमणूक म्हणून
शाब्दिक उद्योग करावे लागतात!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Saturday, June 9, 2012

शौचालयाची चर्चा


आयोगाचे नियोजन
आपल्या ध्यानात येऊ शकते
ज्यांच्या शौचालयाचीही
देशभर चर्चा होऊ शकते.

कुठे 28 रुपये?
कुठे 35 लाख रुपये!
तुमच्या आमच्या घरापेक्षाही
त्यांची शौचालये झ्यॅक आहेत!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Friday, June 8, 2012

मान्सूनची ओळख


मान्सूनची ओळख

तो म्हणाला, मी मान्सून आहे
ती म्हणाली, ओळख सांग.
वातकुक्कुट यंत्रावरचे कोंबडे
तेव्हा देऊ लागले बांग.

तो वि्रसला, तो बरसला
त्याच्याकडे पुरावा नव्हता.
वीज चमकली, ढग गडगडले
आता त्यांच्यात दुरावा नव्हता.

धपापल्या श्वासाने, मातीच्या वासाने
ती पावसात ¨झिंगत आहे!
मान्सून आला, मान्सून आला
ती ओलेत्यानेच सांगत आहे!!

-सूर्यकांत डॊळसे, पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
चिमटा-3042
दैनिक पुण्यनगरी
8जून 2012
--------------------------

Thursday, June 7, 2012

आश्चर्यकारक पाठिंबा


आश्चर्य वाटावा असा
प्रकार घडू लागला.
अण्णांपेक्षा बाबांच्या आंदोलनाला
पक्षीय पाठिंबा वाढू लागला.

लोकपालाकडून काळय़ा पैशाकडे
आंदोलनाची दिशा आहे!
दगडापेक्षा वीट मऊ वाटल्यानेच
पक्षीय पाठिंब्याची भाषा आहे!!

- सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

Wednesday, June 6, 2012

खडे बोल


नारीभक्षक


स्त्रीभ्रूण हत्येची
जिकडे-तिकडे साथ आहे.
राक्षसीवृत्तीवरही
नारीभक्षकांची मात आहे!

समाजातल्या नारीभक्षकांची
आज पाशवी युती आहे!
स्त्रीभ्रूण हत्येचे आकडे सांगतात
नारीभक्षकांचे प्रमाण किती आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, June 5, 2012

सामाजिक ढोंग


झोपेचेही सोंग असते,
जाग आल्याचेही सोंग असते.
सामाजिक जागृती
हे सोयीस्कर ढोंग असते.

तेवढय़ापुरती जागरूकता
पुन्हा सगळी सामसूम असते!
सामाजिक बेपर्वाईमुळेच
चोरांचीही धामधूम असते!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Monday, June 4, 2012

बीडची नाचक्की


काळा पैसा


जेवढा स्वीस बँकेत ठेवला आहे
तेवढाच इथे दिला-घेतला जातो.
काळा पैसा कुठेही असो
तो नक्की उतला-मातला जातो.

भारत देश म्हणजे
काळय़ा पैशाची खाण आहे!
ज्याच्याकडे काळा पैसा जास्त
त्याचेच खरे मानपान आहे !!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Sunday, June 3, 2012

मान्सूनचा इशारा

तारीख-बिरीख, मुहूर्त-बिहूर्त
मान्सून असले काही मानत नाही.
भसाभस वारे वाहिले तरी
तो पाऊस सोबत आणत नाही.


मान्सून म्हणतो, बदलायला शिका
आपले मात्र जुनेच पाढे असतात!
वेधशाळेच्या अंदाजांचेही
राडय़ावरती राडे असतात !!


- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Saturday, June 2, 2012

संदेशाची ऐशीतैशी


शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध
हे प्रत्यक्षात सिद्ध होऊ लागले.
शिकून, संघटित होऊन
एकमेकांच्या अंगावर धावू लागले.

शिका, संघटित व्हा, संघर्ष करा
याचा नेमका अर्थ कुठला आहे?
आपल्यातल्या आपल्यातच
शैक्षणिक संघर्ष पेटला आहे!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

भविष्यवाणी ... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका --------------------- भविष्यवाणी अजूनही या प्रश्नांची उत्तरे, कुणालाच मिळाले नाहीत. जगाचे भविष्य सांगणाऱ्यांना, स्वतःचे मृत्...