Monday, May 31, 2010

नशिबाचे राजकारण

***** आजची वात्रटिका *****
*********************

नशिबाचे राजकारण

पाठीशी गॉडफादर असला तरी
जोडीला नशिब असावे लागते.
नाही तर प्रत्यक्ष हिर्‍यालाही
मातीत धूळ खात बसावे लागते.

दुर्दैव कधी बघत नाही
तुमच्यात किती धमक आहे ?
केवळ नशिबामुळेच कोळश्यांना
आज हिर्‍यांची चमक आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Sunday, May 30, 2010

अरे संसार संसार....

***** आजची वात्रटिका *****
*********************

अरे संसार संसार....

अस्थिर संसाराची व्याख्या
अगदी सरळ साधी असते.
नवरा दहशतवादी असेल तर
बायको नक्षलवादी असते.

दोघांनाही वाटत असते
आपण न्यायासाठी लढतो आहोत !
याची जाणीव कुणाला?
आपण आपल्या स्वप्नांचे
मुडदे पाडतो आहोत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Saturday, May 29, 2010

अतिरेक

***** आजची वात्रटिका *****
*********************

अतिरेक !

भारत म्हणीत नाहीत,
ना पाकिस्तान म्हणीत नाहीत.
देव-धर्म असले काही
अतिरेकी जाणीत नाहीत.

बामियानमधील बुद्धमुर्ती
ते निर्दयपणे फोडू शकतात.
अमेरिकेचे ट्विन टॉवर्सही
बघता-बघता पाडू शकतात.

अतिरेक्यांना ज्यांनी पोसले
त्यांनाही सोसावे लागत आहे !
अवघड जागेच्या दुखण्याला
झाकीत बसावे लागत आहे !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)

Friday, May 28, 2010

बुवा ते दुवा

***** आजची वात्रटिका *****
*********************

बुवा ते दुवा

स्वार्थापोटी राजकारणी
नको ते भास करीत आहेत.
धरू नये त्या बुवाचे
जाहिर पाय धरीत आहेत.

बुवा तिथे नेते,
नेते तिथे बुवा असतो !
एकमेकांच्या भल्यासाठी
दोघांचाही दुवा असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Thursday, May 27, 2010

निष्ठावंत ते बंडखोर

***** आजची वात्रटिका *****
*********************

निष्ठावंत ते बंडखोर

संधी मिळाली की,
सावही चोर होत असतो.
संधी नाकारली की,
निष्ठावंतही बंडखोर होत असतो.

निष्ठावंत आणि बंडखोरात
फक्त संधीची रेघ असते !
वर वर अखंडता असली तरी
आतमध्ये मात्र भेग असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, May 25, 2010

फिटले आणि मिटले

****** आजची वात्रटिका ******
************************

फिटले आणि मिटले

दोघांचे भांडण तिसर्‍याचा लाभ
पुन्हा एकदा सिद्ध झाले.
२००५ पूर्वीचे राजकीय खटले
वादावादीमध्ये रद्द झाले.

झाले गेले ते
असे गंगेला मिळाले आहे !
आपल्या प्रश्नाचे उत्तर
लोकांना न सांगता कळाले आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Monday, May 24, 2010

हौ्सराव जिंदाबाद

***** आजची वात्रटिका *****
***********************

हौ्सराव जिंदाबाद

काही हौसराव असे की,
स्वत:ची हौस पुरवून घेतात.
जिथे जमेल तिथे
आपण स्वत:च मिरवून घेतात.

काहीही असो,कसेही असो,
त्यांची मिरवा-मिरवी असते !
हौसरावास भेटता हौसराव
हौसेची पुरवा-पुरवी असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

ब्लॅक बॉक्स

***** आजची वात्रटिका *****
*********************

ब्लॅक बॉक्स

घात-अपघात,वाद-विवाद
हे तर अगदी फिक्स असतात.
मुले म्हणजे तर
संसाराचा ब्लॅक बॉक्स असतात.

संसाराचे अचूक प्रतिबिंब
ब्लॅक बॉक्सवर गोंदले जाते !
तुम्ही कितीही पायलट असा,
सा्रे ब्लॅक बॉक्समध्ये नोंदले जाते!!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, May 23, 2010

मृत्युगाथा

****** आजची वात्रटिका *****
***********************

मृत्युगाथा

मृत्यु चुकूनही कधी
कमाल आणि किमान बघत नाही.
ना बघतो रेल्वे,ना चार चाकी,
ना नौका,ना विमान बघत नाही.

जळी,स्थळी,काष्ठी,पाषाणी,
मृत्यु कुठेही गाठू शकतो.
कधी शांत,कधी रौद्र,कधी बिभत्स,
कधी अपघाती भेटू शकतो.

एकदा आला की,
तिथे कुणाचीच खैर नसते !
मृत्यु तर अजातशत्रू
त्याचे कुणाशीच वैर नसते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Saturday, May 22, 2010

रेकॉर्ड ब्रेक पॅटर्न

****** आजची वात्रटिका ******
***********************

रेकॉर्ड ब्रेक पॅटर्न

राजकीय पॅटर्न म्हणजे
नवनवे तोडगे असतात.
कुणालाच काही वाटत नाही
सगळेच कोडगे असतात.

असे कोडगे जमले की,
हमखास तोडगे काढले जातात !
निलाजरेपणाचे सर्व विक्रम
पॅटर्नमधून मोडले जातात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

विसराळू आणि घसराळू

***** आजची वात्रटिका *****
***********************

विसराळू आणि घसराळू

राजकारणी कसेही घसरतात
कारण ते घसराळू असतात.
याचे खरे कारण म्हणजे
लोकच विसराळू असतात.

त्यांच्या घसराळूपणाविरूद्ध
लोकांनी रान उठवले पाहिजे !
यासाठी लोकांना मात्र
वेळच्या वेळी आठवले पाहिजे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Friday, May 21, 2010

देवघर

***** आजची वात्रटिका *****
**********************

देवघर

माणसांच्या दुनियेत
देव बिच्चारे उपरे आहेत.
देव-देवतांच्या वाट्याला
घराघरातील कोपरे आहेत.

माणसांच्या घरापेक्षा
देवघरं छोटी आहेत !
देवास कोपरा दाखविणारी
माणसेच खोटी आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, May 19, 2010

वादळी अवस्था

****** आजची वात्रटिका ******
*************************

वादळी अवस्था

जशी सर्वांच्या आयुष्या्त येतात
तशी मान्सुनच्या आयुष्यातही
वादळं येऊन जातात.
सुख-शांतीच्या बद्ल्यात
लढाऊ वृत्ती देऊन जातात.

कधी कमी दाबाचा,
कधी जास्त दाबाचा पट्टा असतो !
मान्सुनसोबत आलेला पाऊस
अगदी नक्की मोठ्ठा असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Monday, May 17, 2010

मोबाईल प्रॉब्लेम

***** आजची वात्रटिका ******
**********************

मोबाईल प्रॉब्लेम

तीच तीच गोष्ट
कशी राहून राहून होते.
ती कव्हरेज एरियात येताच
त्याची बॅटरी डाउन होते.

कधीही बघावे तेंव्हा
त्याची तर्‍हा हीच असते.
बॅटरी चार्ज होते तेंव्हा
ती आऊट ऑफ रिच असते.

सगळे योग जुळून येतात
तेंव्हा नेटवर्कचा पत्ता नसतो !
बॅलन्सचे करायचे काय ?
त्याचा उपयोग आत्ता नसतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड).

Monday, May 10, 2010

स्टंटबाजी

***** आजची वात्रटिका ******
**********************

स्टंटबाजी

ते एवढे शहाणे की,
त्यांना बसायला उंट असतो.
सामाजिक कळकळ कमी,
नको तेवढा स्टंट असतो.

परस्परांचे बघूनच
त्यांना सुरसुरी येवू लागते !
हास्यास्पद गोष्टींचीही
मग स्टंटगिरी होऊ लागते !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड).

Sunday, May 9, 2010

सत्यशोधन

***** आजची वात्रटिका ******
**********************

सत्यशोधन

बुद्धीभेद करणार्‍यांवर
चित्त वेधले पाहिजे.
ह्या नव्या गुलामगिरीचे
सत्य शोधले पाहिजे.

त्यांचे हे नवे अंदाज
भलतेच वेधक आहेत.
ते तुम्हांस ओळखून चुकले
हे सत्यशोधक आहेत.

दांभिकांच्या तोंडीच आता
सत्यशोधनाची भाषा आहे !
अश्या बॅंडमास्तरांकडेच
ढोली-बाजा आणि ताश्या आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड).

Saturday, May 8, 2010

भ्रष्ट समानता

***** आजची वात्रटिका ******
***********************

भ्रष्ट समानता

बेईमानीत लिंगभेद नसतो
बेईमान ते बेईमान असतात.
भ्रष्टाचाराच्या मार्गावर
स्त्री-पुरूष समान असतात.

स्त्री असो वा पुरूष,
कुणीही कच्चे सोडले जात नाही !
भ्रष्टाचाराचे नाते असे
कधी लिंगभेदाशी जोडले जात नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड).

एका विधेयकाची फरफट

Thursday, May 6, 2010

डकवर्थ आणि लुईस

***** आजची वात्रटिका ******
**********************

डकवर्थ & लुईस

हातभर इकडे होते,
हातभर तिकडे होते.
विजयाचे सरळ गणित
पावसामुळे वाकडे होते.

नियमांचा अतिरेक
क्रिकेटला भोवला जातो !
चांगल्या चाललेल्या खेळाचा
पार निकाल लावला जातो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड).

Wednesday, May 5, 2010

संपाचे हत्यार

***** आजची वात्रटिका ******
**********************

संपाचे हत्यार

पक्ष आणि संघटनांकडून
संपाचे हत्यार उचलले जाते.
स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी
जनसामान्यांना कुचलले जाते.

जनतेला वेठीस धरून
मागण्यांची वाटाघाटी केली जाते !
संघटना आणि पक्षांकडून
श्रेयाची लाटालाटी केली जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड).

Tuesday, May 4, 2010

न्याय-दर्शक

***** आजची वात्रटिका ******
**********************

न्याय-दर्शक

शत्रूंनाही संधी देतो
असा आमचा न्याय आहे.
मानवतेचा पूरावा
याहून दुसरा काय आहे ?

कसाबचा हिसाब होणारच
यात कुठे शंका आहे ?
आमच्या न्यायप्रियतेचा
सार्‍या जगात डंका आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड).

Monday, May 3, 2010

छंदिष्टपणा

***** आजची वात्रटिका ******
**********************

छंदिष्टपणा

ज्यावेळी विद्यार्थ्यांना
सुट्ट्या लागल्या जातात.
नेमक्या तेव्हांच छंदवर्गाच्या
भट्ट्या लागल्या जातात.

मुलांना जुंपून ठेवण्याचा
पालकांना छंद असतो !
मुलांच्या मानसिकतेचा
कुठे कुणाला गंध असतो ?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड).

बोलघेवडे प्रबोधन

***** आजची वात्रटिका ******
**********************

बोलघेवडे प्रबोधन

दारूबंदीचे प्रचारकच
बेवडे निघायला लागले.
प्रबोधनाचा वसा घेणारे
बोलघेवडे निघायला लागले.

जसे बोलता,तसे वागा
नसता लोकांना सांगु नका !
आपली बोलघेवडी अक्कल
वेशी-वेशीवरती टांगू नका !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड).

Saturday, May 1, 2010

सानिया ते माधुरी

***** आजची वात्रटिका ******
**********************

सानिया ते माधुरी

कुठे लग्नाची मागणी,
कुठे प्रेमाचे चाळे आहेत.
भारतात पाकिस्तानचे
आता प्रेमाचे जाळे आहेत.

योगायोगाची गोष्ट नाही,
जणू सत शिंकू लागले !
द्वेषाने जमले नाही
आता प्रेमाने जिंकू लागले !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड).

दैनिक वात्रटिका19मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -286वा

दैनिक वात्रटिका 19मार्च2024....वर्ष- तिसरे.. अंक -286वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1-fbx6QEScldHj2QiABT650...