Monday, August 31, 2009

पुरस्कारांची उथळता

***** आजची वात्रटिका *****
**********************

पुरस्कारांची उथळता

ज्याला वाटेल तो
पुरस्कारांचे दुकान थाटून टाकतो.
आदर्शांचे पुरस्कार तर
सोम्या-गोम्याही वाटून टाकतो.

जिकडे पहावे तिकडे
आदर्शांचा सुळसुळाट आहे !
अधिक खोलात शिरले की कळते,
हा उथळ पाण्याचा खळखळाट आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, August 30, 2009

कर्जबाजारी नसणार्‍यांसाठी

***** आजची वात्रटिका *****
**********************

कर्जबाजारी नसणार्‍यांसाठी

होते नव्हते तेवढे पाप
टप्प्या-टप्प्याने साफ झाले.
कर्जबाजारी शेतकर्‍यांचे
थकीत कर्ज माफ झाले.

जे कर्जबाजारी नव्हते त्यांचा
थोडातरी विचार व्हायला पाहिजे !
अशा शेतकर्‍यांनाही
बक्षीस तरी द्यायला पाहिजे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

’रेशन’ल थिंकींग

***** आजची वात्रटिका *****
**********************

’रेशन’ल थिंकींग

महागाईचे जे व्हायचे
अखेर ते झालेच.
साखर म्हणाली तुरदाळीला,
तु हो पुढे;मी आलेच.

साखर तर गोडबोली,
दाळीची चालही तुरुतुरू आहे !
रेशनवर पोहचायच्या आधिच
वाटेत काळाबाजार सुरू आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, August 29, 2009

भाववाढ

***** आजची वात्रटिका *****
**********************

भाववाढ

डाळच शिजू द्यायची नाही
साक्षी द्यायला तुरी आहे.
कॉंग्रेसची राष्ट्रवादीवर
साखरेची सुरी आहे.

इकडे भाव वाढू लागला
तिकडे दबाब वाढतो आहे !
लोकसभेचा विधानसभेवर
असा प्रभाव पडतो आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

अरे रामा.....

***** आजची वात्रटिका *****
**********************

अरे रामा.....

भाजपा म्हणजे काही
लहान बालक नाही.
संघाने स्पष्ट केले,
आम्ही काही पालक नाही.

सांघिक जबाबदारी
सगळेच टाळू लागले !
ओलाव्या अभावी कमळ
जाग्यावरच वाळू लागले !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, August 28, 2009

फाळणीचे दिवस

***** आजची वात्रटिका *****
**********************

फाळणीचे दिवस

कुणी बोलून मोकळे झाले
कुणाच्या तोंडात गुळण्या आहेत.
हकालपट्टी,राजीनामे,शोकॉज,
ह्यासुद्धा नव्या फाळण्या आहेत.

फाळणीला जबाबदार कोण ?
मुद्दा तसा वादग्रस्त आहे !
जीना वैचारीक फाळणी करतोय
त्यामुळे भाजपा त्रस्त आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

कुत्तर-ओढ

***** आजची वात्रटिका *****
**********************

कुत्तर-ओढ

आंधळे दळीत असले की,
कुत्रे मुक्तपणे पीठ खातात.
बघणार्‍यांनीही दुर्लक्ष केले की,
कुत्रे अधिकच धीट होतात.

लहान तोंड असले तरी
कुत्रे भलामोठा घास घेतात.
सुगंधाचा परीचय नसल्याने
कुत्रे नको त्याचा वास घेतात.

नको तिथे कुत्रे
तंगडी वर करून बसतात !
खरा दोष वृत्तीचाच असतो
लोक शेपटीला धरून बसतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Thursday, August 27, 2009

पुरस्कारांचे गुपित

***** आजची वात्रटिका *****
**********************

पुरस्कारांचे गुपित

पुरस्कार मिळत नाहीत,
पुरस्कार मिळवावे लागतात.
न केलेल्या कामाचेही
पुरावे जुळवावे लागतात.

असे पुरावे जुळवलेकी,
पुरस्कारही मिळले जातात !
देणार्‍या घेणार्‍यांचे गुपितंही
सगळ्यांना कळले जातात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

लढा गुरूजी लढा...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
लढा गुरूजी लढा...
झिजले जरी नाक तरी
पाया त्यांच्याच पडा.
आदर्शांच्या पुरस्कारांसाठी
लढा गुरूजी लढा...
अशी ’शाळा’ जमली की,
पुढचे सगळे सोडा
निवडणूका जवळ आल्यात
लढा गुरूजी लढा...
बघा रेस सुरू झाली
नाचवा कागदी घोडा.
नगदी रक्कम हाती घेऊन
लढा गुरूजी लढा...
लढतो तो जिंकतोच,
फक्त लाज थोडी सोडा !
अब्राहम लिंकनचे काय ऎकता ?
लढा गुरूजी लढा !!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-1973
दैनिक पुण्यनगरी
27ऑगस्ट 2009

Wednesday, August 26, 2009

तिसरा पर्याय

***** आजची वात्रटिका *****
**********************

तिसरा पर्याय

तिसर्‍या आघाडीतल्या भुजातले
चांगलेच बळ वाढ्ते आहे.
कितीही नाकारले तरी
पोटातली कळ वाढते आहे.

सोळा जण,सोळा विचार,
हे तर सोळा आणे सत्य आहे !
खंबीरपणे गंभीर होणे
एवढेच आघाडीचे पथ्य आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

दुनिया वेड्यांचा बाजार

***** आजची वात्रटिका *****
**********************

दुनिया वेड्यांचा बाजार

दुनिया एवढी वेडी की,
ती वाट्टेल तशी वागू शकते.
सलमानच्या टॉवेलसाठीही
जाहिर बोली लागू शकते.

हजार काय ? लाख काय ?
त्याला कोटींचाही भाव येईल !
नट-नट्यांच्या अंतर्वस्त्रांचाही
उद्या कदाचित लिलाव होईल !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, August 25, 2009

जाहिर हरास (लिलाव)

जाहिर हरास (लिलाव)

गणपतीच्या पुढे
भक्तीचा आव असतो.
गणपतीच्या मागे
पत्त्यांचा डाव असतो.

पुढे उभा मंगेशा,
मागे असली आरास असते !
जुगाराच्या डावाची
जाहिरपणे हरास असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Monday, August 24, 2009

कुत्री म्हणाली कुत्र्याला

!!!!! गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!

***** आजची वात्रटिका *****
**********************

कुत्री म्हणाली कुत्र्याला

जरा इमानदारी पाळ,
एवढे माजल्यासारखे वागू नको.
तुला किती वेळा सांगितले,
टि.व्ही.वरच्या मालिका बघू नको.

तु मालिकेतल्यासारखे चाळे
वर्षभर करत बसललेला असतो !
बाराही महिने तुझ्या अंगी
भाद्रपद घुसलेला असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
http://suryakantdolase.blogspot.com/
----------------------------------------------------------------------------------
वाचा नवा दिवस...नवी वात्रटिका...
अभिप्राय कळवा...आवडली तर नाव न गाळता मित्रांना पाठवा.

Friday, August 21, 2009

दुष्काळाची प्रतिक्षा

***** आजची वात्रटिका *****
**********************

दुष्काळाची प्रतिक्षा

पावसाची वाट बघत
लोक आशेवर जगत आहेत.
कुणी कुणी तर दुष्काळाची
वाटच बघत आहेत.

कुणाचे पावसाकडे,
कुणाचे दुष्काळाकडे
टक लावलेले डोळे आहेत !
ते कोण ? हे न समजायला
लोक थोडेच भोळे आहेत ?

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, August 20, 2009

बैलोबा

!!!!!! पोळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा !!!!!

***** आजची वात्रटिका *****
**********************

बैलोबा

घरात आहेत,दारात आहेत,
वर-खाली,मागे-पुढे आहेत.
बैलोबांचे कळप बघा
अगदी सगळीकडे आहेत.

जिथे जिथे बैलोबा
तिथे सारे काही छान असते.
करायचे तर काहीच नाही,
हलवायची फक्त मान असते.

वेसन आणि चाबकाशिवाय
बैलोबा बैलपण जपू शकतात !
अधुनमधुन चेमटले की,
बैलोबा नेटाने खपू शकतात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)


----------------------------------------------------------------------------------
वाचा नवा दिवस...नवी वात्रटिका...
अभिप्राय कळवा...आवडली तर नाव न गाळता मित्रांना पाठवा.

Wednesday, August 19, 2009

जीना,इसी का नाम है

***** आजची वात्रटिका*****
*********************

जीना,इसी का नाम है

मागचाच अध्याय
नव्याने पुन्हा आहे.
स्तुतीच्या लाटेवर
बॅरीस्टर जीना आहे.

लालकृष्ण ते जसवंत
एक समान धागा आहे !
जीना म्हणजे तर
घसरती जागा आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

राजकीय पॅटर्न

***** आजची वात्रटिका *****
**********************

राजकीय पॅटर्न

पक्षीय त्रिकोण जोडण्यासाठी
स्वार्थाचा कर्ण ओढला जातो.
नैतिक पर्याय संपले की,
राजकीय पॅटर्न काढला जातो.

एका अपरिहार्य परिस्थितीत
असेच काहीतरी घडून जाते !
सत्तेचे अंडे घोळता घोळता
पॅटर्नचे पिल्लू उडून जाते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, August 18, 2009

स्ट्राईक रोटेट

***** आजची वात्रटिका *****
**********************

स्ट्राईक रोटेट

त्याचा ट्वेंटी-२० चा खेळ
ती ’कसोटी’ मागते.
पिचवर टिकताना
त्याची कसोटी लागते.

कधी तो,कधी ती,
सामना सांभाळुन नेतात !
स्ट्राईक रोटेट केल्यावर
आपोआप धावा होतात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, August 17, 2009

आडपडदा

***** आजची वात्रटिका ******
***********************

आडपडदा

पडद्यावरच्या नट्यांना
कुठलाच आडपडदा राहिला नाही.
असा एकही अवयव नाही
जो कुणीच पाहिला नाही.

चित्रपटाच्या मायेपोटी
त्या काया तोलीत होत्या !
भविष्य़ाला ओरडून सांगावे लागेल
एके काळी नट्यासुद्धा
इथे कपडे घालीत होत्या !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, August 16, 2009

नारायणाष्टक

***** आजची वात्रटिका *****
**********************

नारायणाष्टक

तिकडे काय होते?
इकडे मंत्रीपदाची मज्जा आहे.
झुणका भाकरीपेक्षा मस्त
इटालियन पिझ्झा आहे.

उड्डाण पूलाखालुन पाणी वाहिले
तरी अंगी मावळेपणा होता !
मी कडवट सैनिक होतो
हाच माझा बावळेपणा होता !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, August 14, 2009

तिरंग्याचे मनोगत

***** आजची वात्रटिका *****
**********************

तिरंग्याचे मनोगत

हल्ली झेंडे एवढे झालेत की,
मलाही फडकावे वाटत नाही.
तुम्ही एवढे मोकाट झालात की,
मलाही अडकावे वाटत नाही.

" झंडा ऊंचा रहे हमारा "
हे फक्त गाण्यातच राहू लागले !
दुश्मनांची गरजच काय?
आपलेच पाण्यात पाहू लागले.

त्या नि:स्वार्थी क्रांतीवीरांची
ती सलामीच खरी होती !
आजचा स्वैराचार पाहून वाटते,
ती गुलामीच बरी होती !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

ऎक्याचे एल्गार

***** आजची वात्रटिका *****
**********************

ऎक्याचे एल्गार

ऎक्य होणार नाही
हे जवळजवळ सिद्ध झाले.
जे आशा लावून बसले होते
ते बिचारे हतबुद्ध झाले.

जे स्मितहास्य करीत होते
त्यांचे फक्त खिदळणे बाकी आहे !
ऎक्याचा नवा एल्गार झाला
आता सभा उधळणे बाकी आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, August 13, 2009

हे देवकीनंदना.....

***** आजची वात्रटिका *****
**********************

हे देवकीनंदना.....

सुख दु:खाचे क्षण सारे
तु सहज भोगले होते.
गोंधळलेल्या अर्जुनालाही
तु सहज योगले होते.

एकपत्नीत्व स्विकारूनही
कॄष्णा, कशातच राम नाही !
तुझे कौतुक यासाठी की,
१६,१०८ जणींना सांभाळणे
हे काही खायचे काम नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, August 12, 2009

बॅनरचा एक्स-रे

***** आजची वात्रटिका *****
**********************

बॅनरचा एक्स-रे

राजकारणाच्या घसरत्या दर्जाची
चौकाचौकात झलक आहे.
ज्याला कुत्रेही विचारीत नाही
त्याचा जाहिरातीचा फलक आहे.

यांचा मोठा, राष्ट्रपुरूषांचा छोटा,
एवढा कशाला माज पहिजे ?
कुणाचा फोटो केवढा असावा?
याची थोडी तरी लाज पाहिजे !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, August 11, 2009

मेळावा ते फुटाफूट

***** आजची वात्रटिका *****
**********************

मेळावा ते फुटाफूट

जातीजातीच्या मेळाव्याला
एकच ऊत आला आहे.
एवढा पुळका कशासाठी?
हा मुद्दा सर्वश्रुत झाला आहे.

निवडणूकांच्या तॊंडावर
हे मेळावे नियोजित असतात !
एकाच जातीचे अनेक मेळावे
पक्षांकडून प्रयोजित असतात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, August 10, 2009

ऑफिसीयल गड्बड

***** आजची वात्रटिका *****
**********************

ऑफिसीयल गड्बड

फाईल म्हणाली टेबलाला,
चल पट्कन उरकून घे.
जेवढे सरकायचेत
तेवढे चटकन सरकून घे.

ती बघ कशी चोरपावलाने
आचारसंहिता येते आहे !
माझ्यामध्ये सवतीमत्सराची
भावना जागी होते आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, August 9, 2009

पक्षांतर म्हणजे....

***** आजची वात्रटिका *****
**********************

पक्षांतर म्हणजे....

काल एकाचे घ्यायचे
आज एकाचे नाव घेतले जाते.
पक्षांतर म्हणजे तरी काय?
फक्त डोरले नवे घातले जाते.

थोडे दिवस जड जाते,
नव्याचे गोड वाटते !
पक्षांतर म्हणजे....
पुन्हा नव्याची ओढ वाटते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, August 8, 2009

चले जाव...

***** आजची वात्रटिका *****
**********************

चले जाव !

गोरे गेले,काळे पोसले
देशी इंग्रजांनो, चले जाव.
चरणार्‍यांनो,चारणारांनो,
हरामखोरांनो,चले जाव.

सत्ता आणि मत्तापिपासूंनो,
अप्पलपोट्यांनो,चले जाव.
फाटाफुट्यांनो,पायचाट्यांनो,
लाळघोट्यांनो,चले जाव.

शोषकांनो,मूषकांनो,
धोकेबाजांनो,चले जाव !
ज्यांना मातृभूमिची लाज वाटते
त्या डोकेबाजांनो,चले जाव !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, August 6, 2009

एकच साहेब....बाबासाहेब

***** आजची वात्रटिका *****
**********************

एकच साहेब....बाबासाहेब

रिपब्लिकन ऐक्याच्या दृष्टीने
हे सकारात्मक पाऊल वाटते.
येणार्‍या निळ्या वादळाची
ही वादळी चाहूल वाटते.

एकच साहेब....बाबासाहेब
हा नारा जेंव्हा बुलंद होइल !
तेंव्हाच नेत्यांचे कार्यकर्ते होऊन
रिपब्लिकन फाटाफूट बंद होईल !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

ऎतिहासिक पाऊल

***** आजची वात्रटिका *****
**********************

ऎतिहासिक पाऊल

महात्मा फुलेंचे स्वप्नच
प्रत्यक्षात आले आहे.
प्राथमिक शिक्षण
मोफत आणि सक्तीचे झाले आहे.

वाघिणीच्या दुधाची चोरी
हा आता गुन्हा ठरला जाईल.
शिक्षणातला पान्हाचोर
आता गुन्हेगार धरला जाईल.

शासनाचे स्वागत,गुरूंचा आदर,
गुणवत्तेचाही आग्रह धरू या !
चुकली असेल तर
पुन्हा शिक्षणाची वाट धरू या !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

होऊन जाऊ द्या...

***** आजची वात्रटिका *****
**********************

होऊन जाऊ द्या...

युती आणि आघाडीच्या
आड ते दडत आहेत.
दोघांची मिळून एकालाच
मतंही पडत आहेत.

एकदा तरी चौघांनी
वेगळे लढायला हवे !
कुणाचे स्वबळ किती आहे ?
हे उघडे पडायला हवे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

आगामी आकर्षण

***** आजची वात्रटिका *****
**********************

आगामी आकर्षण

टी.आर.पी.पुढे वादावादीची
दखल कशाला कोण घेतो ?
गाजलेल्या रिऍलिटी शो चा
हमखास भाग दोन येतो.

राखीच्याही बिनधस्तपणाचा
भरवसा कोण कसा देऊ शकतो ?
राखी का स्वयंवर: भाग दोन
काही दिवसाताच येऊ शकतो !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, August 5, 2009

भाऊराया वाचव रे.... मराठी वात्रटिका

***** आजची वात्रटिका *****
**********************

भाऊराया वाचव रे....

तु वंशाचा दिवा
आमचे जगणेच बेचव रे
वेड्या बहिणीची नवी मागणी
भाऊराया वाचव रे....

जन्मापूर्वीच मला ठेचणारांचे
कान जरा टोचव रे
रक्षाबंधन बंद होऊ नये
भाऊराया वाचव रे....

वेड्या बहिणीची वेडी हाक
वेड्या भावांपर्यंत पोचव रे
फक्त तुच वाचवू शकतोस
भाऊराया वाचव रे....

फाटका हा पदर पसरते
तुझ्या प्रेमाने टाचव रे
राखीचे हे बंधन पाळ
भाऊराया वाचव रे.....

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
  9923847269
----------------------
चिमटा-1660
दैनिक पुण्यनगरी
5 ऑगस्ट 2019Tuesday, August 4, 2009

स्वयंवर झाले राखीचे...

***** आजची वात्रटिका *****
**********************

स्वयंवर झाले राखीचे...

कुणाला वाटते बरोबर,
कुणाला वाटते झाले चुकीचे.
आपल्या बापाचे काय गेले ?
स्वयंवर झाले राखीचे.

बारा हजारात एक निवडला
नापसंत झाले बाकीचे.
मिका कसा राहिला मुका ?
स्वयंवर झाले राखीचे.

दाखवायचे एकच राहिले !
तुमच्या लक्षात आले बाकीचे ?
निवडल्या घरी तु सुखी रहा
स्वयंवर झाले राखीचे !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, August 3, 2009

टक्केबहाद्दर

***** आजची वात्रटिका *****
**********************

टक्केबहाद्दर

दलालांचा बाजार तर
हल्ली सर्वत्र भरलेला असतो.
ज्याचा त्याचा टक्काही
अगदी पक्का ठरलेला असतो.

लोक टक्के-टोणपे खातात,
ते टक्क्या-टक्क्याने खात आहेत !
बोलणार तरी कोण ?
त्यांचेच ओठ, त्यांचेच दात आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, August 2, 2009

मैत्री : एक शोध

मैत्री : एक शोध

जेंव्हा जीवाचं शिवाला,
रंकाचं रावाला,
भक्ताचं देवाला,
न सांगताही कळलं जातं.
तेंव्हाच आपोआप...
मैत्रीचं नातं जुळलं जातं.

मैत्री मैत्री असते,
मैत्री जन्मदात्री असते,
मैत्री म्हणजे खात्री असते,
मैत्री म्हणजे पत्रापत्री असते,
मैत्री म्हणजे,
कधी तीची,कधी त्याची,
भर पावसात,
उन्हाळ्याच्या दिवसात,
दोघांत....
फक्त एकच छत्री असते.

मैत्री म्हणजे लुकलुकणारं चांदणं,
मैत्री म्हणजे हातावरचं गोंदणं,
मैत्री म्हणजे मना-मनातल्या
तणाचं वेळोवेळी निंदणं !
मैत्री म्हणजे,
एकमेकांच्या कुशीत स्फुंदनं !!

मैत्री रडवते,
मैत्री हसवते,
मैत्री सांगुन फसवते,
मैत्री मना-मनात नवा स्वर्ग वसवते !!

मैत्री विहिरीतला पारवा,
मैत्री रानातला सरवा,
मैत्री उन्हातला गारवा,
मैत्री मिसळीतला झणझणीत शरवा !!

राधेचा संग असते मैत्री,
मीरेचा रंग असते मैत्री,
द्रौपदीचे न उलगडलेले
गुढ अंग असते मैत्री.
सुदाम्याच्या किड्क्या पोह्या्त
कधी गुंग असते मैत्री.
कधी कर्ण दुर्योधनाच्या
प्रेमात दंग असते मैत्री.

मैत्री क्षणभर टेकायला हक्काचं स्थळ देते,
मैत्री लागेल एवढी कळ देते,
मैत्री जगायला आभाळाएवढं बळ देते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

मानव मंदिराचा शोध

***** आजची वात्रटिका *****
**********************

मानव मंदिराचा शोध

मानवतेला कुरतडतोय
तो जाती-जातीचा उंदीर आहे.
जाती-जातीच्या नावावरच
समाजा-समाजाचे मंदिर आहे.

समाज जोडतो आहोत की,
आपण समाज तोडतो आहोत ?
जाती-जातीच्या फटीमध्ये
नव्याने पाणी सोडतो आहोत !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, August 1, 2009

पक्षीय गुत्तेदारी

***** आजची वात्रटिका *****
**********************

पक्षीय गुत्तेदारी

पैशांच्या जीवावरच
सारे काम फत्ते आहे.
गुत्तेदारांच्या हातामध्येच
पक्षा-पक्षाचे गुत्ते आहे.

जिकडे सत्ता,तिकडे गुत्ता
बाकीच्यांचे मरण आहे !
चरा आणि चारा,
हेच पक्षा-पक्षाचे धोरण आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

बिहार पॅटर्न .... मराठी वात्रटिका

  आजची वात्रटिका --------------------- बिहार पॅटर्न जसे कर्म तसे फळ, हे लगेच प्रत्यक्षात आले. महाराष्ट्रात जे कमावले, ते बिहारमध्ये गमावले ग...