Sunday, March 31, 2013

वात्रटिका : इतिहास आणि वर्तमान


वात्रटिका :
वर वर एक हलकाफुलका विनोदी काव्यप्रकार वाटत असला तरी केवळ विनोद निर्मिती हे वात्रटिकेचे एकच आणि अंतिम कार्य नाही. पश्चिमी ‘लिम्‌ रिक’ या पद्यप्रकाराचा मराठी अवतार म्हणजे वात्रटिका होय. साधारणपणे चार-पाच ओळींत चमकदार, विनोदी कल्पना अथवा चुटका वात्रटिकेत गुंफलेला असतो. आशयाच्या अथवा कल्पनाविस्ताराच्या दृष्टीने कधीकधी सहा ते आठ ओळींचीही वात्रटिका असते.

या काव्यप्रकाराचे मूळ अज्ञात असले, तरी एम्.रसेल, एस्.जे. यांनी ‘लीअरिक’ (Learic) हा शब्द एडवर्ड लीअरच्या नावावरून तयार केला. त्यावरून लिम्रिक आले असावे. हा काव्यप्रकार आयरिश सैनिकांनी आणला, अशीही एक उपपत्ती आहे. हा मूळ जुना फ्रेंच काव्यप्रकार असावा. तो आयरिश सैनिकांनी फ्रेंच युद्धावरून परतताना १७०० च्या दरम्यान आर्यलंडमध्ये आणला. फ्रेंच व आयरिश सैनिक लिम्‌रिक म्हणताना एकत्र येत. त्यातून त्यांच्या वराकीत अनेक लिम्रिक काव्यरचना जन्माला आल्या. लिम्‌रिक हे आयर्लंडच्या पश्चिम किनाऱ्यावरचे एक प्रमुख बंदर. या बंदरावरून लिम्‌रिक नाव आले, अशी एक उपपत्ती आहे. लँगफर्ड रीडने या शहरावरच एक लिम्‌रिक लिहिले :

‘All hail to the town of Limerick,
Which provides a congnomen, generic,
For a species of verse
Which for better or worse,
Is supported by layman and cleric.’

१७१९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या मदर गूसेस मेलडीज् फॉर चिल्ड्रेन या शिशुगीतसंग्रहात लिम्रिकचा उगम पाहावयास मिळतो. त्यानंतर द हिस्टरी ऑफ सिक्स्टीन वंडरफुल  ओल्ड विमेन (१८२१) व ॲनक्डोट्स अँड ॲडव्हेंचर्स ऑफ फिफ्टीन जंटलमेन (१८२२) यांमध्ये लिम्‌रिक आढळतात. हा काव्यप्रकार कवी व चित्रकार एडवर्ड लीअरने (१८१२-८८) अधिक लोकप्रिय केला. त्याची काव्यरचना व चित्रसजावट असलेला द बुक ऑफ नॉन्‌सेन्स (१८४६) हा प्रसिद्ध लिम्‌रिक-संग्रह होय. तसेच त्याचा मोअर नॉनसेन्स पिक्चर्स, ऱ्हाइम्स, बॉटनी एट्सेट्रा (१८७२) हा संग्रहही लक्षणीय आहे. ⇨बडबडगीत वा निरर्थिका (नॉन्सेन्स ऱ्हाइम) हा काव्यप्रकार वात्रटिकेला स्वभावतः खूप जवळचा असा आहे.
भारतीय लोकसाहित्य,संतसाहित्य,कथाकाव्ये यातही याची बीजे आढळून येतात.वात्रटिका हा आता संशोधनाचा विषय झाला असून सूर्यकांत डॊळसे त्याविषयी संशोधनाचे काम करीत आहेत.
पदवी आणि पद्व्यूत्तर अभ्यासक्रमात काही वात्रटिकासंग्रहांचा समावेश झाला असला तरी तो विनोदी कविता म्हनून झाला आहे.मराठीतील काही तथाकथित कविंना आजही वात्रटिकाकार म्हणून घेणे लज्जास्पद वाटते.विनोदाचा भाग असा की ते आपल्या वात्रटिकांना...चारोळ्या,आठोळ्या,हास्यकविता,उपरोधीका,व्यंगकविता,भाष्यकविता,विडंबन,उपहासिका अशी कसली तरी नावे देऊन सादर किंवा प्रकाशित करतात.

साधारणतः लिम्‌ रिकच्या पहिल्या ओळीत मुख्य पात्र व पार्श्वभूमी, दुसऱ्या ओळीत कृती, तिसऱ्या व चौथ्या ओळींत कृतिविस्तार आणि पाचव्या ओळीत ‘तार्किक विक्षिप्तपणा’ येतो. उदा., एडवर्ड लीअरच्या पुढील ओळी –

‘There was an Old Man with a bread,
Who said, “It is just as I feared –
Two Owls and a Hen,
Four Larks and a Wren
Have all built their nests in my bread!”

सामान्यपणे लिम्रिक ही पार्टीमध्ये म्हटली जाते. त्यात पाहुण्यांना काव्यरचना करण्यास व गाण्यास आव्हान दिले जाई. प्रत्येक कडव्यानंतर, ‘कम अप टू लिम्‌रिक’ ही ओळ समूहस्वरात म्हटली जाई. विसाव्या शतकाच्या प्रारंभी लिम्‌रिकच्या जाहीर स्पर्धा होऊ लागल्या. बुद्धीची चमक अधिक दाखविणारी शेवटची ओळ लिहिणाराला मोठे बक्षीस मिळे. लिम्‌रिक हे उपहासाचे साधन असल्याने महत्त्वाच्या व्यक्ती, संस्था, राजकारण आणि स्त्रीपुरुषसंबंध यांच्यावर कवींनी शरसंधान केले. इंग्रजीमध्ये रोसेटी, स्विनबर्न, रस्किन, वॉल्टर द ला मेअर, टी. एस्. एलियट, डब्ल्यू. एच्. ऑडन यांसारखे कवी या प्रकाराकडे आकृष्ट झाले.

मराठीमध्ये ‘वात्रटिका’ या काव्यप्रकाराचे मूळ साधारणपणे १९५४ च्या आसपास सदानंद रेगे यांनी लिहिलेल्या ‘किंचित काव्य’ या प्रकारात आढळते. पण हा काव्यप्रकार मुख्यत्वे प्रतिष्ठित केला, तो ⇨मंगेश पाडगावकर यांनी. त्यांचा वात्रटिका हा संग्रह १९६४ मध्ये प्रसिद्ध झाला. सामान्यपणे त्यांच्या वात्रटिकांची सुरुवात –‘एक होती/आहे…’ या वाक्यांशाने होते व व्यक्ती वा स्थळ या नावाने पहिल्या ओळीचा शेवट होतो. मंगेश पाडगावकरांनी बाई, बाटली, ब्रह्मचारी, पुजारी, मुका, काका, न्हावी, निजाम, शेटजी, गवई, पंडित, शायर, पुढारी, पोपट, कावळा, कोकिळा, पावटा, बेदाणा अशा असंख्य विषयांवर वात्रटिका रचल्या. नमुन्यादाखल पाडगावकरांची ‘नाते’ ही वात्रटिका पाहता येईल :

‘एक आहे पाववाला
तो माझा गाववाला
एक म्हातारी विकते भाजी
ती माझ्या एका दोस्ताची आजी
आणि एक आहे समोर देखणी बाई
ती मात्र अजून माझी कोणी नाही’

कमीत कमी शब्द,नवशब्द निर्मिती,  गंमतीशीर यमके, विक्षिप्त व वैचित्र्यपूर्ण अशी कल्पनाचमत्कृती, अतिशयोक्ती, विडंबन, मिस्किलपणा, थट्टेखोरपणा, मर्मांवर बोट ठेवण्याची वृत्ती,दांभिकतेवर प्रहार, अधूनमधून द्वयर्थी वाक्यरचना ही त्यांच्या वात्रटिकांची लक्षणीय वैशिष्ट्ये होत. अलीकडे फ. मुं. शिंदे, रामदास फुटाणे,सूर्यकांत डॊळसे,भारत सातपुते,संजय वरकड,हेरंब कुलकर्णी,विलास फुटाणे इ. कवींनी वात्रटिका हा प्रकार विशेषत्वाने हाताळला आहे. त्यातही रामदार फुटाणेआणि सूर्यकांत डॊळसे यांचे राजकीय-सामाजिक व्यंग्यपर वात्रटिका –वाचनाचे जाहीर प्रयोग खूपच लोकप्रिय ठरले आहेत.
आज मराठी दैनिकांमध्ये पहिल्या पानावर ठळकपणे वात्रटिकांचे दैनिक स्तंभ दिसतात.सूर्यकांत डॊळसे यांनी दै.झुंजार नेता या दैनिकात सलग एकाही दिवसाचा खंड न पाडता १५ वर्शे वात्रटिका लेखनाचा विक्रमच ठरवा असा स्तंभ लिहिणे आजही चालू आहे.दै.पूण्यनगरी मधील सूर्यकांत डोळसे यांचा "चिमटा” हा वात्रटिका स्तंभ तर संपूर्ण महाराष्ट्रा लोकप्रिय ठरला आहे.आजच्या घडीला वात्रटिकेला वाहिलेले ब्लॉग बघायला मिळत्तात.
सूर्यकांत डॊळसे यांनी खास मराठी वात्रटिकांसाठी सुरू केलेले मराठीतील पहिले ऑनलाईन साप्ताहिक...सा.सूर्यकांती वात्रटिकेची ही चळवळ जोपासण्याचे ऐतिहासिक काम करीत आहे.
आज सूर्यकांत डॊळसे यांनी वात्रटिकेला एक नवे परीमाण देण्याचे कौतुकास्पद काम केलेले आहे.

खरे तर वात्रटिका हा अँग्लो-अमेरिकन संस्कृतीचा एक भाग; पण या वात्रटिकांचा जगभराच्या अनेक भाषांमध्ये संचार दिसतो. परिणामी त्या जागतिक संस्कृतीचाच एक भाग बनलेल्या आहेत. वात्रटिका जरी लिखित रूपात अवतरत असल्या, तरी त्यांचे तालबद्ध ठेक्यात जाहीर वाचन होऊ शकते. त्यांचे मूळ रूप हे मौखिक असल्याने या यंत्रयुगात लोककाव्याचा हाच कदाचित शेवटचा जिवंत प्रकार म्हणता येईल.

संकलन,संग्रहन आणि लेखन-सूर्यकांत डॊळसे,मोबा.९९२३८४७२६९

संदर्भ : Rosenbloom, Joseph, A Book of Limerick, 1982.मराठी विश्वकोश,मराठी विनोद,सा.सूर्यकांती,

सरकारी दसरा


ऑपरेशन मार्च एंड....


बिहार पॅटर्न .... मराठी वात्रटिका

  आजची वात्रटिका --------------------- बिहार पॅटर्न जसे कर्म तसे फळ, हे लगेच प्रत्यक्षात आले. महाराष्ट्रात जे कमावले, ते बिहारमध्ये गमावले ग...