Friday, December 31, 2010

2010 चा निरोप

2010 चा निरोप

’घोटाळे..घोटाळे’ असे ऐकून
मी पुरता विटलो आहे.
अखेर माझेच दिवस भरले
मी एकदाचा सुटलो आहे.

उगवत्याला अंत असतो,
ही किमया काळाची आहे !
मला माझी काळजी नाही,
काळजी 2010 ह्या बाळाची आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, December 30, 2010

कलंकशोभा 2010

भ्रष्टाचाराचा कलंक
एकाहून एक ठळक आहे.
’घोटाळ्यांचे वर्ष’
ही 2010 ची ओळख आहे.

करणारे करून गेले,
कलंक 2010 च्या माथी आहे !
खाऊन खाऊन जातील कुठे?
अंतिम सत्य माती आहे !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, December 29, 2010

नथुरामचे स्मरण

वध..वध...असा जप करीत
नथुरामचे उदात्तीकरण होते.
संमेलनाच्या स्मरणिकेत
म्हणूनच त्याचे स्मरण होते.

हे काही नवे नाही,
हे पारंपारिक खूळ आहे !
हे अनावधान नाहीच नाही,
हे उठलेले पोटशूळ आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

इतिहासाचा स्वभाव

इतिहासाचा स्वभाव

इतिहास बहूमत नाही,
इतिहास पुरावे मागत असतो.
वर्तमान काहीही सांगो,
इतिहास स्वत:ला जागत असतो.

भेसळखोर वाढले की,
इतिहास भेसळला जातो !
लबाड वर्तमानावरती मग
इतिहास उसळला जातो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

आधुनिक भामटे

आधुनिक भामटेच तर
फार गाजावाजा करतात.
मुद्दा शिळा असला तरी
त्यालाच ते ताजा करतात.

भामटे नवे असले तरी,
त्यांची जुनीच चाल आहे !
सांगण्याची तर्‍हा निराळी;
ते म्हणती,आमचीच लाल आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, December 24, 2010

ग्राहका जागा हो...

भक्त ग्राहक झाले म्हणूनच
इथे धर्म विक्रीला मांडला जातो.
देवांचा बाजार झाल्यानेच
इथे देव देवळात कोंडला जातो.

व्याजावरती व्याज मिळते,
सहीसलामत मुद्दल असते !
दुकानदारांना तोटाच नाही,
गिर्‍हाईकांना कुठे अद्दल असते?

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, December 23, 2010

सा.सूर्यकांती अंक ३० वा


कांद्याच्या निमित्ताने

पेट्रोलचीही भाववाढ झाली,
पण कांद्याएवढी चर्चा नाही.
प्रसार माध्यमांचाही
पेट्रोलकडे मोर्चा नाही.

खोटे का होईना
भाववाढीचे समाधान मिळू द्या !
आपल्या मालाला भाव मिळू शकतो
शेतकर्‍याला तरी कळू द्या !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

ऐतिहासिक पराक्रम

इतिहासकारांचे पराक्रम असे की,
इतिहासालाही धूळ चारली जाते.
ओळखूही येणार नाही
अशीच पाचर मारली जाते.

इतिहास घडला एक,
दुसरा इतिहास घडविला जातो !
काजव्यांच्या पाठीमागे
प्रत्यक्ष सूर्य दडविला जातो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, December 22, 2010

कांदे-पुराण

भजे कुरकुरत म्हणाले,
कांद्याशिवाय मजा नाही.
पत्ता कोबी कोंबण्याएवढी
तळतळणारी सजा नाही.

भजे-कांद्याएवढीच दु:खी
हातगाड्यावरची भेळ आहे.
उतप्पा आंबट चेहर्‍याने म्हणाला,
माझ्यावरही तीच वेळ आहे.

खाणारापेक्षा पिकविणाराचेच
सगळीकडूनच वांधे आहेत !
जणू व्यवस्थेच्या डोक्यामध्ये
बटाटे आणि कांदे आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, December 21, 2010

दोघात तिसरा

कुणालाच कळेना
भेटीत काय ’राज’आहे?
कधी नव्हे तेवढी अस्वस्थता
युतीमध्ये आज आहे.

राजकीय दबावतंत्राचाच
जणू हा आसरा आहे !
अजपर्यंत कधीच नव्हता
तो दोघात तिसरा आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, December 19, 2010

भ्रष्टांची सारवासारव

आमच्यापेक्षा तुमचा मोठा
आमच्याविरूद्ध बोलू नका.
आम्ही कमी,तुम्ही जास्त
आमची पोल खोलू नका.

भ्रष्टांवर भ्रष्टांची
अशी राजकीय मात आहे !
जनता वेडी नाही
तिला सगळेच ज्ञात आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

शतकांचे अर्धशतक

तुमच्या आमच्या सारख्यांची
शतकांसाठी हाव आहे.
सचिन तेंडूलकर हे तर
विक्रमांचे दूसरे नाव आहे.

शतकांचे अर्धशतक
ही काय चेष्टा आहे ?
या विक्रमाचा पाया
सातत्य आणि निष्ठा आहे !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

बाटगे विचारवंत

उंदराला मांजर साक्ष,
टपलेले बोके आहेत.
ज्यांनी बोलले पाहिजे
तेच आज मुके आहेत.

गैरसमज करून घेऊ नका,
त्यांच्या जिभा छाटल्या आहेत !
एकवेळ छाटणे परवडले,
पण त्यांच्या जिभा बाटल्या आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, December 18, 2010

विकिलिक्सची भांडेफोड

कळेना काय उघड?
काय गुपित आहे?
इंटरनेटचे वरदान
जन्मत:च शापित आहे.

संगणक की मानव?
कोण कुणाचा मालक आहे ?
विकिलिक्सची भांडेफोड
ही तर निव्वळ झलक आहे !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, December 17, 2010

आमचा गौप्यस्फोट

नेमके काहीच कळेना
कोण काय काय बोलतो आहे ?
गौप्यस्फोटांच्या हादर्‍यांनी
कोण कुणाची पोल खोलतो आहे ?

गौप्यस्फोटांचे राजकारण
अधिकच प्रचलित होते आहे !
खरा गौप्यस्फोट असा की,
लोकांचे लक्ष विचलित होते आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, December 15, 2010

डेअरिंगबाज चोर

चोर ते चोर
वर शिरजोर्‍या करू लागले.
आता तर शनिशिंगणापूरातच
चोर्‍या करू लागले.

देवाबरोबर माणसांचाही
विश्वास डळमळीत होतो आहे !
किमान आंधळा भक्त तरी
हळुहळू कळीत होतो आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, December 12, 2010

भोंदू रे भोंदू

भोंदूना भोंदू म्हटले तर
भोंदूना राग येऊ लागले.
दोन तोंडांची गांडूळं
जहरी नाग होवू लागले.

आंधळ्या भक्तीचे जहर
लोकांना चढवित आहेत.
अधर्म..अधर्म..म्हणीत
भामटे ऊर बडवित आहेत.

ज्याचे त्यालाच कळेना
बोलून उपयोग काय आहे ?
कसायांचा दोष नाही,
त्यांनाच धार्जिन गाय आहे !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

हुतात्म्यांची शपथ

दुश्मनांनी एकदाच मारले
तुम्ही पुन्हा पुन्हा मारू नका.
आमच्या हौतात्म्याची शपथ आहे,
आमचे राजकारण करू नका.

हे असेच चालत राहिले तर
बलिदानाला किंमत उरणार नाही !
आमचे राजकारण बघून
देशासाठी कुणीच मरणार नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, December 11, 2010

विटाळ

देशाचे विचारचक्रच
घोटाळ्यांभोवती घोटाळू लागले.
पावित्र्याचा आव ज्यांचा
असे सारेच विटाळू लागले.

कोणी म्हणतो,राजकीय सुपारी;
कोणी म्हणतो,हे किटाळ आहे !
पण देशात सर्वत्र
घोटाळ्यांचा विटाळ आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, December 10, 2010

सशस्त्र व्हा...

घोटाळे लपूनछ्पून नाही
लोकांच्या उरावर केले जातात.
कुणाचे डोळ्यावर हात,
कुणी बिच्चारे भ्याले जातात.

पूर्वी आपण नि:शस्त्र होतो
आता माहिती अधिकार हाती आहे !
चला दाखवून देऊ
आपलीही ताकद किती आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, December 9, 2010

घोटाळ्यांचे टिमवर्क

सरकारी खुराकावर
पोसलेले कठाळे आहेत.
तुही खा,मीही खातो
घोटाळ्यावर घोटाळे आहेत.

खाणारे खात राहतात,
समिती चौकशीत गर्क असते !
घोटाळा एकट्याचे काम नाही,
घोटाळा म्हणजे टिमवर्क असते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, December 8, 2010

थंडोत्सव

कुणाला थंडी नकोनकोशी,
कुणाला थंडी हवीहवीशी वाटते.
ज्याला थंडी साजरी करता येते
त्याला थंडी नवीनवीशी वाटते.

थंडी जाणवते,थंडी मानवते,
थंडी एवढी काही दुष्ट नाही !
थंडी गुलाबी,थंडी शराबी,
एकट्याने साजरी करण्याएवढी
थंडी साधीसुधी गोष्ट नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, December 7, 2010

जिरायती दु:ख

अस्मानाकडून अन्याय होतो,
सुलतानाकडूनही अन्याय होतो.
बागयतदार व जिरायतदारांचा
एकाच मापाने न्याय होतो.

ही न्यायिक समता असेलही,
पण त्यात समतेला वाव नाही !
सब घोडे बारा टक्के
जिरायती दु:खालाही खरा भाव नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, December 6, 2010

दाम ले के बोल

कुणी तळ्यात आहे,
कुणी मळ्यात आहे.
खरी मौज अशी की,
लवासाच तळ्यात आहे.

कुणी तर्‍हेवाईक आहेत,
कुणी पर्यावरणाचे पाईक आहेत.
दाम ले के बोल
बोलायला माईक आहेत.

वर निळू निळू आकाश,
खाली निळू निळू पाणी असेल !
ज्याला बुद्धीभेद जमला
तोच सर्वांपेक्षा ज्ञानी असेल !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, December 4, 2010

पावसाची नसबंदी

पावसाला पाझर फोडता येतो,
त्याची नसबंदीही करता यावी.
पावसाची अवकाळी मस्ती
ढगातल्या ढगात जिरता यावी.

जसा कृत्रिम पाऊस पाडता येतो,
तसा जर थांबवता आला असता !
तर कोरड्यासारखा ओलाही
दुष्काळ लांबवता आला असता !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, December 3, 2010

व्वा रे धंदा !

शेतकर्‍यांचा माल स्वस्त,
व्यापार्‍यांचा महाग असतो.
चुकीच्या धोरणांचाच
हा सगळा भाग असतो.

एकाने रक्त ओकायचे,
एकाने महाग विकायचे,
हा चांगलाच धंदा आहे !
वर परत मखलाशी
तू जगाचा पोशिंदा आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

लोकशाहीचा रास्ता रोको

कुणाच्या पायी राज्यघटना,
कुणाच्या हाती राजदंड असतो.
कुणा कुणाला दोष द्यावा?
आपल्याला लोकशाहीचा कंड असतो.

कुणाला चर्चा हवी आहे,
कुणाला चर्चा नको आहे !
हा गोंधळातला गोंधळ म्हणजे
लोकशाहीचा रास्ता रोको आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, December 2, 2010

नाका-बंदी

तिथे तिथे वाटमारी असेलच
जिथे जिथे संधी आहे.
काही का होईना टोलवाल्यांची
आता नाकाबंदी आहे.

उपोषणाच्या इशार्‍याचे
असे त्वरित फळ आहे !
उपोषणाची चेष्टा नको
त्यात नैतिक बळ आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, November 30, 2010

बघा बुवा !

दवा पाहिजे,दवा देतात,
दुवा पाहिजे,दुवा देतात.
मुलंबाळं नसणार्‍या भक्तांना
मुलंसुद्धा बुवा देतात.

भक्त सोसतात,भक्त फसतात
तरीही अंधविश्वास ठाम आहे !
पटले तरच होय म्हणा,
आमचे बुवा सांगणे काम आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, November 29, 2010

न्यूज चॅनलचा बकासूर

बातम्यांच्या नावाखाली
२४ तास काहीतरी द्यायला लागते.
न्यूज चॅनल नावाच्या बकासूराला
सारखे काहीतरी खायला लागते.

नाहीच मिळाले काही तर
तेच तेच चघळत असतो !
बकबक करीत बकासूर
तेच तेच उगळत असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, November 27, 2010

ते आणि आपण

शे-पन्नास रूपये वर देऊन
नंबरशिवाय गॅस घेतोच ना?
एखादे काम पटकन होण्यासाठी
आपण शे-पाचशे देतोच ना?

ते कागदावर घरं बांधतात,
आपण अनुदान लाटतोच ना?
कागदावर विहिरी,तळी खांदून
बोगस बिलांचा नोह सुटतोच ना?

सांगा नेमका कोणता भेद
त्यांच्यात आणि आपल्यात असतो !
त्यांच्याएवढाच आपलाही
सहभाग गफल्यात असतोच ना ?

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, November 26, 2010

लोककलेचा ’विठठल’ गेला...

२६/११ ची तक्रार

एवढा मोठा धोका होवूनही
अजून काहीच शिकला नाहीत.
खर्‍या-खुर्‍या सत्यावरती
अजूनही प्रकाश टाकला नाहीत.

असे बेसावध राहिलात तर
पुन्हा कुणीतरी येऊन जाईल !
पुन्हा एखादी २६/११
बघता-बघता होवून जाईल !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, November 25, 2010

बिहारचा ऐतिहासिक निकाल

आपल्याच जाळ्यात
लालुंना फसावे लागले.
राजपुत्रालाही बिहारमध्ये
हात चोळीत बसावे लागले.

सामोश्यात आलू असतानाही
बिहारमध्ये लालु नाही !
ज्याची त्याला जागा कळाली
आपण काही बोलू नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

सावधान....

***** आजची वात्रटिका *****
**********************

सावधान....

आदर्श घोटाळ्याचा फटका
तुम्हांलाही बसू शकतो.
सावधान,तुमच्याही नावावर
सोसायटीत फ्लॅट असू शकतो.

हा काही कल्पनाविलास नाही,
प्रत्यक्षात असे घडलेले आहे !
भ्रष्टाचारी हरामखोरांनी
बिल दुसर्‍यांच्या नावे फाडलेले आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, November 24, 2010

बातम्यांचे मोजमाप

न्यूज राहिल्या बाजूला
व्ह्युज छापून येत आहेत.
प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिकवाले
सगळेच मापून घेत आहेत.

आर्थिक तर आहेच आहे,
हा वैचारिक भ्रष्टाचार आहे !
कुर्‍हाडीच्या दांड्यांचा
गोतावरतीच वार आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, November 23, 2010

रिअ‍ॅलिटी

राखी का इन्साफ
न्यायालयालाही मान्य आहे.
बिग बॉसची रिअ‍ॅलिटी बघून
प्रेक्षकही धन्य धन्य आहे.

टीआरपीच्या वाढीसाठीच
मालिकेत सगळा मसाला असतो !
कोल्हे मोकाट सुटलेले
बंदोबस्त मात्र ऊसाला असतो !!


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, November 22, 2010

हर्षद मेहताचा निरोप

माझ्याच पायावरती
नवे कळस चढवित आहात.
स्वत:चे घर भरून
देशाला बुडवित आहात.

माणसाची लालसाच
या सर्वांचे कारण होते !
एकदा आठवून बघा
कसे माझे मरण होते ?

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, November 21, 2010

सहकारनामा

गाई आटल्या,
कोंबड्या खुडूक.
सूत गिरण्यांपुढे
अंधार बुडूक.

सहकारी संस्थांना
स्वाहाकाराची फूस.
मुळासकट खाल्ला
कारखान्यांनी ऊस.

शुगर कमी,
कारखाने आजारी.
पेशंट वाढता
डॉक्टरची बेजारी.

दुसर्‍याचे बघतो कोण?
प्रत्येकजण खुद्दार !
मागच्या पिढीकडून
सात पिढ्यांचा उद्धार !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

मोबाईल घोटाळा

Saturday, November 20, 2010

खातेवाटप

हे नको;ते हवे,
प्रत्येक मंत्री कुंथत असतो.
मालदार खात्यामध्येच
सर्वांचा जीव गुंतत असतो.

शेवटी मिळेल ती जबाबदारी
पार तर पाडली जाते !
खाते भाकड असले तरी
त्यातून मलई काढली जाते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, November 19, 2010

लोकशाहीच्या वल्गना

बाप केंद्रात,मुलगा राज्यात,
जिल्हा परिषदेत नातू असतो.
कुणी म्हणायला गेले तर
जनकल्याण हाच हेतू असतो.

उरलेल्या ठिकाणी
लेकी-सुना बसवल्या जातात !
लोकशाहीच्या वल्गना
पद्धतशीर प्रसवल्या जातात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, November 18, 2010

भ्रष्ट तुलना

आमचा छोटा,तुमचा मोठा
घोटाळ्यांच्या तुलना चालल्या आहेत.
रूचल्या तरी पचणार नाहीत
अशासुद्ध गोष्टी खाल्ल्या आहेत.

तेच आता उघडे पडलेत
जे जे पाप झाकणारे आहेत !
लोकांनाही दिसू लागले
कोण कोण पांघरूण टाकणारे आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, November 17, 2010

रेकॉर्ड ब्रेक घोटाळे

षंढालाही चीड यावी
एवढे अतिरेक होत आहेत.
घोटाळ्यांनीच घोटाळ्यांचे
रोज रेकॉर्ड ब्रेक होत आहेत.

लाज-लज्जा आणि नैतिकता
यांना केंव्हाच ’टाटा’आहे !
आजचा घोटाळा पाहिला की वाटते,
कालचा कितीतरी छोटा आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, November 16, 2010

डिजिटल राजे

पासंगालाही पुरणार नाहीत
एवढे नेते खुजे आहेत.
तरीही महाराष्ट्रामध्ये
जाणते राजेच राजे आहेत.

कार्यकर्त्यांच्या अजाणतेपणात
जाणत्या राजांचे मूळ आहे !
बावळ्यांच्या मावळेपणात
डिजिटल बॅनरचे खूळ आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

टाटांचा गौप्यस्फोट

एखादे काम फुकटात झालेय
असे कधीच घडले नाही.
प्रत्यक्ष टाटांनासुद्धा
लाच मागायचे सोडले नाही.

जिथे टाटांना भ्याले नाहीत
तिथे आमच्यासारख्यांचे काय आहे?
टाटांकडे तरी पैसा आहे,
आमच्याकडे खायला हाय आहे !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, November 14, 2010

घोटाळ्यांचा दूरसंचार

गॉड आणि फादर

वरचेही पोसावे लागतात,
खालचेही पोसावे लागतात.
राजकारणात गॉड आणि फादर
दोन्हीही असावे लागतात.

राजकीय भवितव्याचा खेळच
शाप आणि उ:शापांचा असतो !
प्रत्येक राजकीय पक्षच
अनेक बापांचा असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, November 13, 2010

सरकारी ’बाबू’राव


आबूराव सोकलेले आहेत,
खाबूराव सोकलेले आहेत.
सरकारी कार्यालयांमधून
’बाबू’राव सोकलेले आहेत.

आबूरावांचा बळी दिला जातो,
खाबूरावांचा बळी जातो !
बाबूरावांच्या हातावर
बाबूराव टाळी देतो !!


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, November 12, 2010

वेडी आशा

कितीही काढायचे म्हटले तरी
आमच्या मनातून जात नाही.
दिल्लीने दाखवून दिले
महाराष्ट्रात स्वच्छ ’हात’नाही.

’गर्जा महाराष्ट्र माझा’म्हणण्याची
काही सोय उरली  नाही !
बरबटलेल्या राजकारणातही
आम्ही हिंमत हारली नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, November 11, 2010

प्रश्नांकित बदल

नांदेडला शोककळा,
सारार्‍यात धामधूम झाली.
बारामतीत दिवाळी तर
नाशिकला सामसूम झाली.

सामाजिक समतोलाचा मुद्दा
दुमता-तिमता आहे !
परिषद विचारू लागली,
हीच का ’समता’ आहे ?

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, November 10, 2010

दुहेरी खांदेपालट

कुणाला कुटाण्यावारी जावे लागले,
कुणाला फुटाण्यावारी जावे लागले.
’दादा’गिरीपुढे अनुभवाला,
अगदी वाटाण्यावारी जावे लागले.

एकीकडे पृथ्वी-राज,
दुसरीकडे अजित पॉवर आहे !
खांदेपालटीचा खरा साक्षीदार
आदर्श सोसायटीचा टॉवर आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, November 9, 2010

आदर्श ते आदर्श

अशोकपर्वाचा अस्त

प्रशासनापेक्षा शासनाचाच
गाजावाजा जास्त झाला.
आदर्शाचा पहिला बळी म्हणून
अशोकपर्वाचा अस्त झाला.

अशोकपर्वाचा अस्त होताच,
बाकीचेही बुजले आहेत !
हे विसरूण चालणार नाही,
सोसायटीला ३१ मजले आहेत !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, November 8, 2010

ओबामांचे प्रमाणपत्र

आम्ही म्हणतो,महासत्ता व्हायचे आहे;
ते म्हणाले,महासत्ता बनला आहे.
त्यांच्या या धूर्तपणातला
मतलब आम्ही जाणला आहे.

याचा अर्थ असा नाही,
त्यांचे थोडेफारही खरे नाही !
मात्र मेंढीसारखे हूरळून
वाघाच्या नादी लागणे बरे नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, November 6, 2010

ओबामा भेट

ओबामाच्या भेटीचा
केवढा गाजावाजा आहे?
यातून हाच संदेश मिळतो
मीच जगाचा राजा आहे.

आम्ही मोजीत बसलो
भेटीचा खर्च किती आहे ?
जगाचा राजा असला तरी
त्याला जीवाची भीती आहे !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, November 4, 2010

आक्र ss मण......!!

वळवळणारी खेळपट्टीही
सपाट होवू लागते.
फलंदाज ठोकायला लागला की,
झकत साथ देऊ लागते.

विचार नको ट्वेंटी20,
वन डॆ की टेस्ट असते ?
कुठल्याही खेळामध्ये
आक्रमणच बेस्ट असते !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, November 2, 2010

घरगुती फटाके

बायको अ‍ॅटमबॉम्ब असेल तर
नवर्‍याचा नक्की भुईनळा होतो.
तिच्या आवाजापुढे
बिच्चार्‍याचा खुळखुळा होतो.

तो सुतळी बॉम्ब असेल तर
ती सुतासारखी सरळ होते !
टिकल्या तर वाजणारच
प्रदर्शन मात्र विरळ होते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, October 30, 2010

राजकीय भूकंप

धक्क्यावर धक्के
नांदेडला भूकंपाचे धक्के आहेत.
तेच दूरचे नातेवाईक ठरले
खरोखर जे सख्खे आहेत.

भ्रष्टाचार आणि जमीनीचे
पारंपारिक नाते आहे !
जो आपल्याला खाईल
त्याला जमीन खाते आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, October 29, 2010

सोसायटीचे आदर्श

भ्रष्टाला भ्रष्ट भेटला की,
कायद्यालाही फसवले जाते.
आडवे तिडवे कामसुद्धा
सरळ नियमात बसवले जाते.
ते काम चुटकीसरशी होते

जिथे हरामखोरांचे स्पर्श होतात !
आजच्या सोसायटीमध्ये
असेच लोक आदर्श होतात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, October 27, 2010

अरूंधती (ची) राय

काश्मिर  भारताचा भाग नाही
हा देशद्रोह नाही तर काय आहे ?
बुकर विजेत्या अरूंधतीची
ही स्फोटक राय आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे
हे स्वैराचारी रूप आहे !
त्यांनी तोंडाला आवर घातला तरी
आमच्यासाठी खूप आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, October 22, 2010

नरबळींचा संदेश

आम्ही मेलो ते मेलो,
उरलेल्यांना तरी वाचवू शकता.
पुरोगामित्त्वाचा संदेश
तुम्ही घरोघरी पोचवू शकता.

अंधश्रद्धा निर्मुलन कायदा
जर प्रत्यक्षात आला असता.
कदाचित आम्हां दुर्दैवी जीवांना
त्याचा नक्की फायदा झाला असता.

सांगणारा मूर्ख आहे,
कायदा धर्माच्या आड येतो आहे !
तुमचा बळी गेल्यावर समजेल
तो धर्माच्या नावाने भाड खातो आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, October 21, 2010

ताजमहालाचे सत्य

प्रेमाच्या प्रतिकालाही
द्वेषाने ठोकरू लागले
गाडलेले मुडदेही
परत परत उकरू लागले.

ताजमहाल ही तेजोमहाल?
ही भ्रामक खबर आहे !
काहीही असले तरी
शेवटी ती कबर आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, October 20, 2010

घराणेशाहीची व्याख्या

पोरांसोबत नातवा-पतवाच्याही
पक्षात जागा पक्क्या करू लागले.
आपल्याच सोयीनुसार
घराणेशाहीच्या व्याख्या करू लागले.

आपली ती लोकशाही,
दुसर्‍याची ती घराणेशाही आहे !
हा नवा साक्षात्कार तर
राजकारणात ठायी ठायी आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

’कसाब’गिरी

शेपूट वाकडे आहे
म्हणून तर तो भुंकतो आहे.
जिवंत ठेवला म्हणून तर
कॅमेर्‍यावर थुंकतो आहे.

आपली न्यायप्रियता
कसाबसाठी शोभादायक नाही!
कसाबच सिद्ध करतोय
तो दयेच्या लायक नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, October 17, 2010

आवाजाचा डेसिबल

नवर्‍याचा चढला की,
बायकोचा चढत असतो.
घरातल्या घरात
सारखा डेसिबल वाढत असतो.


कुठे तिचा दाबला जातो,
कुठे त्याचा दाबला जातो!
जिथे परस्परांना मोजले जाते
तोच संसार निभला जातो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

वडीलोपार्जित धंदा

इथुन-तिथुन सारेच
पोरासोरांसाठी अंध होत आहेत.
घराणेशाहीविरूद्ध बोलणारे
आवाज बंद होत आहेत.

कालपर्यंत जो बोलत होता
तोच आज मिंधा झाला आहे !
राजकारण म्हणजे
वडीलोपार्जित धंदा झाला आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, October 15, 2010

झेंडा मार्च

झेंडा मार्चच्या अगोदरच
नको ते झेंडे लावले गेले.
कुणी चतुर(वेदी)पणा केला तरी
विरोधकांचे आयते फावले गेले.

लाईनवर येता येता
’नियती’वर अडले आहे !
कितीही ’माणिक’ झाकले तरी
सगळेच उघडॆ पडले आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, October 13, 2010

गॉडफादरचा शोध

मातोश्रीला सोडून दिले
आता गॉडफादर शोधीत आहेत.
मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेने
ते चांगलेच बाधीत आहेत.

सोलापूरपासून लातूरपर्यंत
गॉडफादरचा शोध जारी आहे !
स्वाभिमानाचे दर्शन घडवित
अधूनमधून दिल्लीचीही वारी आहे !!


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

लेडीज फर्स्ट

Tuesday, October 12, 2010

तेंडूलकरची ’सचिन’ता

सचिन सचिन आहे
हे सचिन सिद्ध करतो आहे.
स्वत: तरूण होताना
टिकाकारांना वृद्ध करतो आहे.

काही पावलांवर तर
शतकांचे शतक आहे !
जुन्या दारूची नशा काही औरच
सचिन त्याचेच द्योतक आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

अर्जुन पॅटर्न

तिकडे सचिन शतक ठोकतोय
इकडे शाब्दिक हल्ले होवू लागले.
शेंबडी शेंबडी पोरंसुद्धा
आपल्या बापाला सल्ले देवू लागले.

यशस्वी’अर्जुन पॅटर्न’ची अशी
सर्वत्र सही सही नक्कल आहे !
मातोश्रींचा जुनाच सूर असतो
त्यांना कुठे अक्कल आहे ?

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड) .

कर्नाटकीय तमाशा

राजकीय नाट्याचा
बघता बघता तमाशा झाला.
एक अभूतपूर्व अनुभव
बघता बघता देशा आला.

जिथे वाकयुद्ध रंगावे
तिथे खरोखर युद्ध झाले !
बहुमताबरोबरच
आणखी बरेच काही सिद्ध झाले !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, October 11, 2010

रास-गरबा

गरबात आणि गर्भात
उगीचच साम्य नाही.
दांडीयाची ’रास’लीला
निसर्गाला क्षम्य नाही.

मना-मनाबरोबर
तना-तनातही गरबा रंगला जातो !
आपला ढोल वाजू नये म्हणून
पालकांचा जीव टांगला जातो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, October 9, 2010

स्त्रीशक्ती

युवा सेना

घराणेशाहीच्या परंपरा
सर्व पक्षात जपल्या जातात.
पोरा-सोरांच्या सोयीसाठी
पक्षीय संघटना स्थापल्या जातात.

राजकीय वारसदारीचाच
सर्वपक्षीय हेतू असतो !
आजोबा आणि मुलानंतर
नेता म्हणून नातू असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, October 8, 2010

राहूलचे मिसटायमिंग

सिमी आणि संघात
धार्मिकता हे ’मूलतत्त्व’ आहे.
राहूलच्या बोलण्यातले
हेच खरे सत्त्व आहे.

दहशतवादाची तुलना मात्र
खरोखरच चुकली आहे !
बोलायाला हरकत नव्हती
पण वेळ मात्र हूकली आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, October 7, 2010

’नंबरी’पणा

आपल्या नेत्यावरच्या निष्ठेचे
प्रदर्शन अगदी थेट असते.
दुचाकी असो वा चारचाकी,
त्यावर नेत्याची नंबर प्लेट असते.

हा साधासुधा नाही
तर दस ’नंबरी’पणा आहे !
कायदा तिथे पळवाटा काढण्याचा
हा शुद्ध डांबरीपणा आहे !!


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

काय राव तुम्ही?

नावात काय आहे?
असा शेक्सपियरचा शंख आहे.
मात्र नामांतर नाट्याचा
महाराष्ट्रात नवा अंक आहे.

नाव बदला,भविष्य बदला,
हा काही बडेजाव नाही !
विचारू नका आमच्या नावापुढे
अजून कसे ’राव’ नाही ?


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, October 4, 2010

पितृपक्षाची दूसरी बाजू

जिवंतपणी ज्यांच्या खाण्या-पिण्याची
टंगळ-मंगळ होत असते.
पितृपक्षात त्याच ’बाप’माणसांची
अगदी चंगळ होत असते.

वरच्यांना खाली जेवू घालतात
आम्हांला म्हणती बावळे आहेत !
या उलट्या न्यायाचे
खरे साक्षीदार कावळे आहेत !!


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, October 3, 2010

कॉमन वेल्थचा संदेश

जरी मावळत्याकडे कानाडोळा
उगवत्याला सलाम होतात.
तरी राष्ट्र्कुल स्पर्धा सांगते,
तुम्ही कधीकाळी गुलाम होतात.

खिलाडूपणा दाखविला तरी
हा गुलामीचाच आरसा आहे !
गोर्‍यांऐवजी काळ्यांच्या हाती
आज इंग्रजांचा वारसा आहे !!


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, October 2, 2010

बोनस

रामनामाचा जप करीत
विरोधकांनी घाम पुसला.
भाजपाला आपल्या मुद्द्यात
पुन्हा नव्याने ’राम’ दिसला.

अयोध्येच्या निकालानंतर
हेच रामचरित-मानस आहे !
भाजपाच्या पदरात तर
आयताच बोनस आहे !!


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, September 30, 2010

रामबाण निकाल

आपली जबाबदारी

अफवा पसरवू नका,
अफवा उठवू नका.
अतिरेक्यांची भूमिका
उगीच वठवू नका.

न्यायालयाचे दरवाजे
कुणालाही बंद नाहीत !
संधी आली सिद्ध करा
आपण धर्मांध नाहीत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

सर्वोत्तम निवड

मूठभर मतदारांचा निर्णय
आम्हांला चंद्रकुमार न,लगे.
कांबळेच ’उत्तम’ आहेत,
गिरिजाताईंची तर भुल गे.

झाले तेच ’उत्तम’ झाले,
नाहीतर किर-किर वाढली असती !
नव्या वादावादाची छाया
साहित्य संमेलनावर पडली असती !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, September 29, 2010

माहितीचा अधिकार

कुणासाठी वांधा झाला,
कुणासाठी धंदा झाला.
माहितीचा अधिकार म्हणजे
फाशीचाच फंदा झाला.

माहितीचा अधिकार
तुम्हां-आम्हांसाठी चांगला आहे !
ज्यांनी ज्यांनी वापरला
त्यांच्यासाठी चांगला आहे.

त्या हुतात्म्यांचे बलिदान
व्यर्थ जाता कामा नये !
भ्रष्टाचार्‍यांच्या हातावर
रूपयाही देता कामा नये !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)

Tuesday, September 28, 2010

तारीख पे तारीख

देव असो वा माणूस असो
सर्वांना न्याय सारखा देतात.
माणसांप्रमाणे देवानांही
इथे तारखांवर तारखा देतात.

’देर हैं लेकीन अंधेर नही’
वर पुन्हा अशी खुट्टी आहे !
न्यायदेवतेलाही हे बघवत नाही
म्हणूनच डोळ्यावर पट्टी आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

माहितीचा अधिकार

कुणाचा वांधा झाला,
कुणाचा धंदा झाला.
माहितीचा अधिकार म्हणजे
फाशीचा फंदा झाला.

माहितीचा अधिकार
तुम्हां-आम्हांसाठी चांगला आहे.
ज्यांनी ज्यांनी वापरला
त्यांच्या रक्ताने रंगला आहे.

त्या हुतात्म्यांचे बलिदान
व्यर्थ जाता कामा नये !
भ्रष्टाचार्‍यांच्या हातावर
रूपयाही देता कामा नये !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, September 27, 2010

बाप रे बाप

भ्रष्टाचाराचे आरोप होवूनही
कलमाडी सर्वांचे बाप निघू लागले.
कॉमन वेल्थ व्हिलेजमध्ये
आजकाल साप निघू लागले.

आता देवपूजा सुरू झाली,
करून करून भागले आहेत !
तिथे तिथे साप निघणारच
जिथे जिथे उंदीर लागले आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Saturday, September 25, 2010

राम-रहिम संवाद

तुझ्या माझ्या नावावरती
लोक आपसात वाद घालतात.
वेगवेगळ्या नावाने
आपल्यालाच साद घालतात.

खर्‍या धर्मापेक्षा खोट्या धार्मिकतेचे
आपल्याला खरे भय आहे !
लोक विसरून जातात
वरतीही एक न्यायालय आहे !!


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, September 22, 2010

एस.एम.एस.बॉम्ब

अतिरेक्यांनी जे करायचे
तेच धर्मांध करायला लागले.
अफवांचे एस.एम.एस.बॉम्ब
मोबाईले पेरायला लागले.

यावरूनच लक्षात येईल
अतिरेकी किती निकट आहेत !
मोबाईल टू मोबाईल
एस.एम.एस.बॉम्ब फुकट आहेत !!


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, September 21, 2010

गुप्तदानाचे रहस्य

भक्तांकडून देवांचाही
चांगलाच कस पाहिला जातो.
कधी कधी गुप्तदानाच्या नावाखाली
ब्लॅक मनीही वाहिला जातो.

गुप्तदानाच्या मध्यमातून
एक प्रकार मात्र वाईट होत असेल !
पुण्य मिळेल तेंव्हा मिळेल
पण ब्लॅकचा व्हाईट होत असेल !!


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, September 16, 2010

चक्रव्यूहातले अभिमन्यू

मुलं म्हणजे जसे काय
प्रयोगशाळेतील उंदरं आहेत.
अमके संस्कार,तमके संस्कार
गर्भसंस्कारांचीही केंद्र आहेत.

एकाचे पाहून दुसर्‍याच्या
डोक्यात संस्कार घुसतो आहे !
अपेक्षांच्या चक्रव्यूहात
आजचा अभिमन्यू फसतो आहे !!


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, September 15, 2010

काव्य-दर्शन

आपला मुक्तछंदीपणा
मराठी कवितेला नडतो आहे.
आडवे निबंध उभे करून
कुणी कविता पाडतो आहे.

वृत्तांची गुलामी नको,
छंदिष्टपणाची हौस नको.
पावसाच्या कविता असाव्यात
कवितांचा पाऊस नको.

कविता रूचावी,कविता पचावी,
कवितेत आमचे तुमचे नकोत !
कवितेच्या आस्वादाला
समीक्षक नावाचे चमचे नकोत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, September 13, 2010

सल्लु ते उल्लु

२६/११ च्या बाबत
सल्लु उल्लुसारखे बोलून गेला.
त्याने माफी मागेपर्यंत
राजही शब्द झेलुन गेला.

२६/११ साधा हल्ला नव्ह्ता
ते देशाविरूद्धचे युद्ध होते !
त्यांच्या पोरकट विधानावरून
होवू नये तेच सिद्ध होते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, September 10, 2010

धार्मिक चकमक

आधिच धर्मा-धर्मात
धार्मिक तेढ असते.
त्यातच धर्म मार्तंडांना
धार्मिक वेड असते.

जेंव्हा एकाच्या धार्मिकता
दुसर्‍याच्या आड येतात !
तेंव्हा धर्मग्रंथ म्हणजे
निव्वळ एक बाड होतात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, September 9, 2010

यू-टर्न

श्रेष्टींनी ’यू यू’ म्हणताच
नेता माघारी फिरला जातो.
आश्चर्याचा धक्का बसावा
असा ’यू टर्न’ मारला जातो.

श्रेष्टी सांगतील तसेच
नेत्यालाही बोलावे लागते !
गोंडा घोळता घोळता
नको तिथे शेपूट घालावे लागते !!


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, September 8, 2010

बैलोबाचा संसार

तुला म्हणून खरे सांगते
अगं,पहिलेच दिवस बरे होते.
आमचे हे म्हणजे ना,
अगदी अवखळ गोर्‍हे होते.

माझ्या हाती कासरा आला
त्यांना बैलोबा करून टाकले आहे !
सत्ताधारी असतानाही
मी खर्‍या आनंदाला मुकले आहे !!


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, September 7, 2010

राष्ट्रवादीचा झेंडा

राष्ट्रवादीच्या जन्माचे निमित्त
विदेशीचा मुद्दा आहे.
राष्ट्रवादीची शाखा तर
अमेरिकेतसुद्धा आहे.

खाली देशीवादाचे मूळ
वर विदेशीचा शेंडा आहे !
कसा का होईना मराठी माणसाचा
अटकेपार झेंडा आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, September 5, 2010

आदर्शांचे चिंतन

आदर्श शिक्षक पुरस्कार
ही तर एक मौज आहे.
शिक्षक दिनालाच कळते
आपल्याकडे आदर्शांची फौज आहे.

कुणी ओढलेले आहेत,
कुणाच्या गळ्यात पडलेले आहेत.
स्पर्धेत जिंकता जिंकता हरले
असे कितीतरी दडलेले आहेत.

पुरस्कार आणि शैक्षणिक दर्जा
यांचा मेळ कसाच जुळत नाही !
तरीही भारत महासत्ता होणार
हे काही कळता कळत नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, September 4, 2010

सोनिया ते गांधी

बोलून काही उपयोग नाही
विरोधकांना कळून चुकले आहे.
गरज म्हणून का होईना,
त्यांना ’गांधी’ करून टाकले आहे.

एकानंतर दुसर्‍या गांधीचा
कॉंग्रेसच्या हातात बोर्ड आहे !
कॉंग्रेस हे युजर नेम,
तर ’गांधी’ हा पासवर्ड आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, September 3, 2010

पारंपारिक सातत्य

घराणेशाहीच्या पायावर
लोकशाहीचे उदक आहे.
आईच्या अध्यक्षपदाला
पोरगाच अनुमोदक आहे.

हे भाग्य पिढ्यानपिढ्या लाभो
त्यांचे हात जोडून नवस आहेत !
आता कॉंग्रेसच्या नशिबात
पुन्हा सोनियाचेच दिवस आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, September 2, 2010

शैक्षणिक ’फी’तुरी

सरकारची मान्यता लागते
पण ते नियंत्रण ठेऊ शकत नाही.
फि वाढीचे वाढते गणित
कुणाच्या ध्यानात येऊ शकत नाही.

शैक्षणिक दुकानदारीला
न्यायालयाचा हिरवा झेंडा आहे !
विद्यार्थ्यांच्या पायावरती
आता अधिकृत धोंडा आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, September 1, 2010

हे मनमोहना....

भावनिक कोमलता

आजकाल कुणाच्याही भावना
जास्तच कोमल होऊ लागल्या.
किरकोळ कारणांवरूनही
भावना दुखावल्या जाऊ लागल्या.

जाती-धर्माच्या नावावर तर
लोक ठार वेडे होतात !
सामाजिक भावनांबाबत मात्र
लोक पार रेडे होतात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, August 31, 2010

तोडपाणी

हे दिवसच जणू
परस्परांची स्तुती गाण्याचे आहेत.
नीट पाहिले की कळते,
हे दिवसच तोडपाण्याचे आहेत.

कुठे उघड,कुठे छुपे
सोईप्रमाणे तोडपाणी आहे !
जनतेला सांगायची गरज नाही
जनता तर सर्वज्ञानी आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, August 30, 2010

मॅच फिक्सिंग

क्रिकेट आणि जुगाराची
जेंव्हा जेंव्हा मिक्सिंग होते.
तेंव्हा तेंव्हा सामन्याची
हमखास फिक्सिंग होते.

सभ्य माणसांचा खेळ मग
असभ्यपणे खेळला जातो !
नेहमीपेक्षा जास्त पैसा
न खेळताही मिळला जातो !!


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, August 29, 2010

शिक्षक दिनाची चाहूल

कुणी अंधारात,कुणी उजेडात,
कुणी देतो आहे,कुणी घेतो आहे.
हळुहळू कळू लागते
शिक्षक दिन जवळ येतो आहे.

कुणी करतो ऒढाओढी
कुणाच्या गळ्यात टाकला जातो !
आदर्श पुरस्कारांच्या भानगडीत
काळ वरचेवर सोकला जातो !!


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, August 28, 2010

दहशतवादाची रंगबाजी

दहशतवादाच्या राक्षसाला
रंगामध्ये रंगवायला लागले.
आपल्या सोईचे रंग वापरून
लोकांना भिंगवायला लागले.

ज्याच्या त्याच्या हातामध्ये
आपल्या आवडीचा रंग आहे !
हे दुसरे तिसरे काही नाही
हा असंगाशी संग आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, August 26, 2010

उंचीचे मोजमाप

आर्थिक पाठबळ असेल तरच
राजकारणात दाळ शिजली जाते.
डिजिटलच्या उंचीवरूनच
राजकीय उंची मोजली जाते.

डिजिटल नेत्यांचे
प्रकारच हाय-फाय आहेत !
त्यांचीच राजकीय उंची खरी
ज्यांचे जमिनीवर पाय आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, August 25, 2010

अति तिथे माती

वाढत्या वृत्तपत्रीय स्पर्धेमुळे
वाचकांची सद्दी आहे.
जेवढे पेपरचे बील येते
तेवढ्याची तर रद्दी आहे.

वृत्तपत्र विक्रेत्यांचे मरण
वाचक काही तोट्यात नाही !
एखादे बक्षिस लागले की,
वाचन काही घाट्यात नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, August 23, 2010

भांडा सौख्यभरे

खड्डॆशाही

खड्डॆशाही
लहान पडतात,मोठे पडतात,
तरूंणाबरोबर बुढ्ढे पडतात.
रस्त्यावरचे खड्डॆ बघून
पोटामध्ये खड्डॆ पडतात.
सिंमेट,डांबर,खडीबरोबर
कुठे कुठे रस्ताच खाल्ला आहे !
रस्त्यावरचे खड्डॆ सांगतात,
बघा देश कुठे चालला आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-2326
दैनिक पुण्यनगरी
3ऑगस्ट2010
----------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले
--------------------------------
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com/

Sunday, August 22, 2010

पिपली लाईव्ह

जिकडे तिकडे लाईव्ह,
जिकडे तिकडे ’पिपली’ आहे.
गिधाडांची नजर तर
शिकारीवरच टपली आहे.

" सर्वात आधी,सर्वात प्रथम"
असे ढोल बडवल्या जातात.
दाखवायला काही नसेल तर
बातम्यासुद्धा घडविल्या जातात.

न्यूज चॅनलची जीवघेणी स्पर्धा
पत्रकारितेला लाजरे करते आहे !
आनंद तर साजरा करावाच,
पण दु:ख देखील साजरे करते आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, August 21, 2010

झोपडपट्टीचे मनोगत

आपली वैचारिक ’किर’ कोळता
वेशीला टांगायची गरज नव्हती.
प्रतिभा कुठे असते ? कुठे नसते?
हे सांगायचीच गरज नव्हती.

पोटातल्या गोष्टी अशा
सहज ओठावर येऊन जातात !
आपल्या हाताने आपल्या प्रतिमेच्या
ठिकर्‍या-ठिकर्‍या होऊन जातात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

खासदारांची पगारवाढ

खासदारांची पगारवाढ

पगार आणि महागाईचे नाते
अगदीच सख्खे आहे.
खासदारांची पगारवाढ तर
थेट तिनशे टक्के आहे.

महागाई प्रचंड वाढलीय
याची ही तर हमीच आहे !
अजूनही असंतुष्टांचे दावे
ही पगारवाढ कमीच आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, August 20, 2010

लोडशेडींग मुक्ती

गणपती म्हणाला उंदराला,
अंधाराचे जाळे फिटले आहे.
लोडशेडींगचे प्रकरण
आपल्यापुरते तरी मिटले आहे.


यावर उंदीर उत्तरला,
बाप्पा,आंब्याऐवजी ही कोय आहे !
आपल्या नावावर पत्ते खेळणारांची
ही आयतीच सोय आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

गिरिजात्मक किर-किर

झोपडीत प्रतिभेचा स्पर्श नसतो
गिरिजाताई किरकिरल्या आहेत.
अध्यक्षीय लढाई अगोदरच
उगीच वाकड्यात शिरल्या आहेत.

प्रतिभा म्हणजे माणूस नाही
ती असली शिवाशिव पाळू शकते !
कितीही सावरासावर केली तरी
किरकिरीतली भावना कळू शकते !!


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, August 18, 2010

खळ्ळऽऽ खटाक....

काकाची मदत घेणारे
पुतण्याची मदत घेऊ लागले.
कानामागुन येणारे आवाज
मल्टिप्लेक्स मधून येऊ लागले.

जरी त्यांचे राजकीय वजन
छटाक-दीड छटाक आहे !
मल्टिप्लेक्स मधून आवाज येतो
तो खळ्ळऽऽ खटाक... आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

(त्यांचे=दगडांचे)

Tuesday, August 17, 2010

युवा नेत्यांची फॅक्टरी

भारत ह तरूणांचा देश आहे
याची खात्री पटायला लागली.
युवा नेत्यांच्या बॅनर्सनी
गावच्या गावं नटायला लागली.

बॅनरवर कुठे म्हातारे,
कुठे शेंबडी पोरं आहेत !
युवा नेते म्हणून मिरवायची
ही पदरची थेरं आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, August 15, 2010

हे स्वातंत्र्य दिना....

असा सुट्टीच्या दिवशी
पुन्हा कधी येत जाऊ नकोस.
आमची हक्काची सुट्टी
अशी खात जाऊ नकोस.

आज कितीतरी सरकारी जीव
सुट्टी गेल्याने तळमळत असतील.
सांग,त्यांच्या या भावना
तुला कुठे रे कळत असतील ?

शनिवारी नको,रविवारी नको,
जरा सणसुद पाळीत जा !
यायचे तर सुट्ट्यांना जोडून ये
त्यासाठी जरा कॅलेंडर चाळीत जा !!


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड) .

Thursday, August 12, 2010

आपला भारत देश महासत्ता होणार आहे....

जातिनिहाय जनगणना

जातिनिहाय जनगणना

जी पाळली जात होती
ती आता मोजली जाईल.
निश्चित अशा आकडेवारीने
जत नव्याने सजली जाईल.

जातिनिहाय जनगणनेमुळे
पश्चातापाची पाळी येऊ नये !
आकड्यांचे विकासकारण व्हावे
फक्त राजकारण होऊ नये !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, August 10, 2010

गटारी:एक निमित्त

कोंबड्या-बक‍र्यांचा आक्रोश,
जियो और जिने दो
खाणार्‍या-पिणा‍र्यांचा जल्लोष,
पियो और पिने दो.

खाणारे खातात,पिणारे पितात,
बळी जाणारे बळी जातात !
गटारीच्या अधिकृत निमित्ताने
बाटल्याही गळी जातात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

दारू’डे’

आपली डे संस्कृती तर
पाश्चिमात्यांच्याही पुढे आहे.
गटारी अमावस्या म्हणजे
देशी दारू ’डे’ आहे.

देशी की विदेशी?
याचे गटारीला भान नसते !
जणू संस्कृतीच्या नावाखाली केलेले
मद्यपान हे मद्यपान नसते !!


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, August 9, 2010

भ्रष्टकुल स्पर्धा

मिडीयाच्या बातम्या
भ्रष्टाचाराने नटू लागल्या.
राष्ट्रकुल स्पर्धा
भ्रष्टकुल स्पर्धा वाटू लागल्या.

सरकारी तिजोरीला
जणू चोरांचाच पहारा आहे ?
आता आरोपींना फक्त
काटेरी कुंपणाचाच’सहारा’ आहे !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

ढगफुटी

ढगफुटी आपल्याला नवी नाही
नेते सुसाट सुटत असतात.
आश्वासनांचे असेच ढग
प्रचारामध्ये फुटत असतात.

मतांच्या जोगव्यासाठी
पसरलेली परडी असते!
आश्वासनांची ढगफुटी
ओली नाही,कोरडी असते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, August 7, 2010

लोकशाही आदर्श

दिल्लीतले पाहूनच
गल्लीतले शिकत असतात.
खासदार विकतात म्हणूनच
ग्राम पंचायत सदस्य विकत असतात.

दिल्लीचा आदर्श असा
गल्लोगल्ली पाळला जातो आहे!
कुठे ग्राम पंचायत लिलाव,
कुठे पक्षादेश टाळला जातो आहे !!


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड) .

Friday, August 6, 2010

कॉमन (वेल्थ+सेन्स)

राष्ट्र्कुल स्पर्धे अगोदरच
लांड्यालबाड्यांचा खेळ रंगला आहे.
पुसल्यावरती सांगा,
कोणता टिश्यू पेपर चांगला आहे ?

लांड्यालबाड्यांचा विक्रम
स्पर्धे अगोदरच नोंदल्या जातील !
याच पैशातून आज नाही,
कल माड्या बांधल्या जातील !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड) .

फोटो-कॉप्या

एकाच फोटोच्या
दोन-दोन कॉप्या आहेत.
मराठीच्या नावावर
लोकांना टोप्या आहेत.

एक टिपतो फोटो,
दुसरा व्यंग टिपतो आहे !
एकच माल असा
दोन दुकानातून खपतो आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, August 5, 2010

ग्रीन टॅक्स

शासनाचा निर्णय
थेट हृदयालाच शिवला आहे.
प्रदूषणकारक वाहनांवर
ग्रीन टॅक्स लावला आहे.

या ग्रीन टॅक्सच्या कक्षा
अजून रूंद व्हायला पाहिजेत !
गांज्या-बिडी-सिगारेट्फुके
सगळेच यात यायला पाहिजेत !!


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, August 3, 2010

रेव्ह पार्टी... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------
रेव्ह पार्टी
रस्त्यावर होतो तो तमाशा,
आडोशाला पार्ट्याअसतात.
त्यात पिचाळलेली कार्टी,
पिचाळलेल्या कारट्या असतात.
झिंगलेल्या पार्ट्यांमध्ये,
तन-मन-धन उधळून देतात.
आई-बापाच्या श्रीमंतीवर,
कार्टी पाहिजे तेवढे खिदळून घेतात.
रेव्ह पार्ट्यांच्या ठरावीक अटी,
बापकमाईच्या धुंद्या पाहिजेत,
अंगावरती फार कपडे नकोत,
असतील त्या चिंध्या पाहिजेत.
मना-मनात माज पाहिजे,
तना-तनात खाज पाहिजे!
गरिबारिबांचे काम हे नाही,
पार्ट्यांना श्रीमंतीचा बाज पाहिजे!!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-2310
दैनिक पुण्यनगरी
4 ऑगस्ट 2010

कॉमन-वेल्थ

कॉमन वेल्थपूर्वीच
मैदानं गाजू लागले.
झालेला खेळखंडोबा बघून
भारतीय लाजू लागले.

खायचे तेवढे खाऊन घ्या
ही तर कॉमन-वेल्थ आहे !
जो फुकटचे खाईल
त्याचीच तगडी हेल्थ आहे !!


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, August 2, 2010

फ्रेंडशिप (वे) डॆ

मैत्रीसारख्या मैत्रीलाही
पाश्चिमात्य ट्रेंड आहे.
सांगायलाच कशाला हवे ?
मी तुझा फ्रेंड आहे.

मैत्रीला ’बॅंड’ नाही तर
स्टॅंड असावा लागतो !
मैत्रभाव मिरवण्यापेक्षा
निभावताना दिसावा लागतो !!


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, August 1, 2010

चलाखी

परंपरांच्या नावाखाली
आपापल्या सोई लावल्या आहेत.
आपल्याला कळतही नाहीत
अशा खुट्ट्या मारून ठेवल्या आहेत.

या खुट्ट्यांच्या विरोधात
जरा कुठे आवाज उठतो आहे !
तिकडून अफवा उठू लागतात,
आपला धर्म बाटतो आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, July 31, 2010

लग्नाचा 'रिअ‍ॅलिटी’ शो

हे मात्र खरे आहे की,
जिथे पिकते तिथे विकत नाही.
रिअ‍ॅलिटी शो मधले लग्न
अगदी हमखास टिकत नाही.

उथळ पाण्याचा असा
नको तेवढा खळखळाट असतो !
लगलेल्या लग्नालाही
अनेक जणांच तळतळाट असतो !!


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, July 29, 2010

कैद्यांचे मनोगत

आम्ही सामान्य कैदी असलो तरी,
तुमच्या नजरा तुच्छ असतात.
आबु सालेममुळे तरी कळाले,
कैद्यांचे टॉयलेट स्वच्छ असतात.

आम्हीपण माणसे आहोत
एकावरती एक कोंबू नका !
नट्यांचे उघडॆ फोटो नकोत
पण अंधारकोठडीत डांबू नका !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

रतिबाचे दूध

Tuesday, July 27, 2010

साप्ताहिक सूर्यकांती:वात्रटिकांचा नजराणा चा ९ वा अंक.


नमस्कार,
हा आहे साप्ताहिक सूर्यकांती:वात्रटिकांचा नजराणा चा ९ वा अंक.
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव साप्ताहिक !
१)हा अंक वाचण्यासाठी http://weeklysuryakanti.blogspot.com/ इथे क्लिक करा.
२) यापूर्वीचे सर्व अंक डाऊनलोड करण्याची तिथेच सोय आहे.
३)आपण http://sites.google.com/site/suryakantdolase/vatratika इथूनही सर्व अंक डाऊनलोड करू शकता.
बघा...वाचा...अभिप्राय नोंदवा !
हा उपक्रम आवडला तर आपल्या मित्रांनाही नक्की पाठवा.
तुम्हाला नियमित अंक हवे असतील तर

Sunday, July 25, 2010

फुs मंतर

ज्यांना गुरू म्हटले जाते,
तेच अजून शंकीत आहेत.
अडल्या-नडल्या शिष्यांचे
तेच कान फुंकीत आहेत.

शिष्यांबरोबर गुरूंचीही
लोकसंख्या वेगाने वाढते आहे !
सांगायचीच सोय नाही,
भक्तांना आंधळेपण नडते आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, July 23, 2010

एकीचे बळ

जिकडे वजन पडेल
तिकडे तराजू झुकवला जातो.
पळवाटांचा फायदा घेऊन
इथे कायदा वाकवला जातो.

व्यवस्था सामिल असली की,
सर्वच कायद्यात बसवले जाते !
एवढेच नाही तर
चक्क वांझोटीलाही प्रसवले जाते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

फॉलोऑन

फक्त क्रिकेटमध्येच नाही,
तर सर्वत्र दिला जातो.
आपापल्या सवडीप्रमाणे
विरोधकाचा गेम केला जातो.

पराभवाची टांगती तलवार
विरोधकाच्या माथी असते !
जिंकणे आणि हरणेही
फॉलोऑन देणाराच्या हाती असते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, July 21, 2010

बिहार स्टाईल

चंद्रा-ग्रहण

संयमाचा बांध फुटला,
होऊ नये ते होऊ लागले.
बाभळीच्या पाण्यामध्ये
महाराष्ट्राला पाहू लागले.

आंध्राच्या चंद्राची प्रतिमा
बाभळीने डागाळली आहे!
हायटेक असणारी प्रतिमा
बाभळीने भेगाळली आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, July 20, 2010

पोटोबांचे अभंग

साप्ताहिक सूर्यकांती...वात्रटिकांचा नजराणा ८ वा अंक

सप्रेम नमस्कार,
साप्ताहिक सूर्यकांती...वात्रटिकांचा नजराणा
चा ८ वा अंक सोबत जोडलेला आहे.अंक वाचा प्रतिक्रिया कळवा...मित्रांनाही पाठवा.
आपण हा अंक http://weeklysuryakanti.blogspot.com/ इथेही वाचून ई-वाचनाचा अनोखा अनुभव घेऊ शकता.
नेहमी प्रमाणेच सहकार्य अपेक्षित आहेच.
कळावे,
आपला
सूर्यकांत डॊळसे,
संपादक-सा.सूर्यकांती
सूर्यकांती-ई-प्रकाशन
पाटोदा (बीड)महाराष्ट्र
email-suryakant.dolase@gmail.com

Saturday, July 17, 2010

चंद्रा-बाबू

ज्या गावच्या बोरी
त्याच गावच्या बाभळी आहेत.
तरी आपल्या शेजार्‍यांना
शेजारपणाच्या उबळी आहेत.

आप्पापेक्षा बाबू
भलताच चंद्रा दिसतो आहे!
एक करतो नाटक,
दुसरा बळेचच घुसतो आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

होम डिलिव्हरी

ज्यांच्याकडे पैसे आहेत,
त्यांचा मनस्ताप टळणार आहे.
आता जादा पैसे मोजून
गॅस घरपोच मिळणार आहे.

सरकारचा गैरसमज असा की,
आपली योजना भारी आहे !
खरे वास्तव असे की,
हे आधीपासूनच जारी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Friday, July 16, 2010

कोंबडीचा सवाल

नवा ’रूप’या

हम भी कुछ कम नही
भारतीय रूपयाचं म्हणणं आहे.
भारतीय रूपयाला
आता स्वत:चे चिन्ह आहे.

रूपया भारतीय असला तरी,
त्याला जागतिक लुक आहे !
जागतिक होतानाच
त्याला सांस्कृतिक भूक आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Thursday, July 15, 2010

पालखी सोहळा

विटलेल्या लोकांच्या
प्रतिक्रिया बोलक्या असतात.
मंत्र्या-संत्र्यांचे दौरे म्हणजे
बारामाही पालख्या असतात.

पुढे-मागे भोई,आत मंत्री-संत्री,
वर लाल दिवा फिरत असतो !
"यांच्यापासून सावध रहा"
जणू हाच इशारा करत असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

.
Wednesday, July 14, 2010

न्यायदान

अन्याय झाल्यावर वाटते,
असे कसे काय होते?
जसे असतात पुरावे
तसाच कोर्ट न्याय देते.

घटनेपेक्षा पुरावे,
पुराव्यांपेक्षा मांडणी मोठी ठरते !
’देर हैं,लेकीन अंधेर नही’
ही विश्वासार्हता खोटी वाटते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

ऑल दि बेस्ट

बेस्ट ऑफ फाईव्हचा मुद्दा
कोर्टाला पचला गेला.
नव्या गुणपत्रिकांचा
खर्च सुद्धा वाचला गेला.

बेस्ट ऑफ फाईव्हचा असा
एक वर्षीय कदम ताल आहे !
अकरावीच्या प्रवेशाला
अखेर पुढची चाल आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Sunday, July 11, 2010

फुटबॉलचा बेरंग

स्वैराचाराचे भूत

अभिव्यक्तीच्या नावाखाली
नको नको ते छाटीत आहेत.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे
हातानेच गळे घोटीत आहेत.

अभिव्यक्ती आणि निषेधाची
सारखीच गत होऊ नये !
स्वातंत्र्याच्या अंगामध्ये
स्वैराचाराचे भूत येऊ नये !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Saturday, July 10, 2010

फेलोशिपचे फॅड

पुरस्कारानंतर आता
फेलोशिपचे फॅड आहेत.
देणारांपेक्षा घेणारेच
खरोखर मॅड आहेत.

फेलोशिपची खैरातही
शेकड्यांनी वाटली जाते !
मासे गळाला लागले की,
त्याची किंमतही लाटली जाते !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

पुन्हा जेम्स लेन

अभिव्यक्ति स्वातंत्र्याचे
नको ते फलित आहे.
पुन्हा एकदा उपलब्ध
जेम्स लेनचे कोलित आहे.

आपल्या गळ्यात
आपलीच तंगडी आहे.
सुप्रिम कोर्टाचा निर्वाळा
तुमची बाजूच लंगडी आहे.

बाजू रस्त्यावर नाही,
कोर्टात मांडली गेली पाहिजे !
त्याचे राजकारण करणार्‍यांना
पुन्हा आठवण करून दिली पाहिजे !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Friday, July 9, 2010

विवेकाचा अंत

कूणाच्या मरणावर हसू नये
हे आम्हांला समजते आहे.
मॉडेलच्या बॉयफ्रेंडची संख्या
त्यामूळे तरी समजते आहे.

कुणी म्हणतो प्रेम
कुणी म्हणतो लफडे आहे !
मृत्यूनंतरही चारित्र्याचे
जगजाहिर डफडे आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

ऑक्टोपसचे भविष्य

कशाला म्हणतात हात?
कशाला म्हणतात पाय?
फुटबॉलचे भविष्य
ऑक्टोपस सांगतो काय़ ?

भविष्यकथनाची गोष्ट तर
साधी-सरळ,सरधोपट आहे !
इथुन-तिथुन सगळ्यांचाच
जाहिरपणे पोपट आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Thursday, July 8, 2010

राजकीय वारी

राजकीय पालखी सोहळा
अगदी गल्लोगल्लीत असतो.
कुणाचा विठोबा मुंबईत,
कुणाचा विठोबा दिल्ली असतो.

नेतु नामाचा गजर होऊन
कुठे झेंडे फडकविल्या जातात.
निष्ठेच्या पताका तर
शहरोशहरी अडकविल्या जातात.

कधी दिल्लीत,कधी मुंबईत
वारीवर वारी असते !
विठोबा कोणताही असो
त्याला भक्ती प्यारी असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, July 7, 2010

कोर्ट मॅटर

माझ्या जीवाची काहिली
पुन्हा पुन्हा व्हायला लागली.
माझी मैना तर
गावाकडेच रहायला लागली.

भाषावार प्रांतरचना
केवळ नावालाच उरली आहे !
आमची मारायची राहिली
कोर्टानेच बिनी मारली आहे !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

बंदचा चालुपणा

बंद राजकीय पक्षांचा असतो,
बंद राजकीय लक्ष्यांचा असतो.
बंद व्यापार्‍यांचा असतो,
बंद राजकीय सुपार्‍यांचा असतो.

ज्याला साधायचा त्याने
स्वार्थ साधलेला असतो !
ज्याला उस्फुर्त बंद म्हणतात
जो प्रत्यक्षात लादलेला असतो !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, July 6, 2010

भारत बंद

५ जुलैचा बंद

सरकारला विरोधकांचा
रस्त्यावर चेक होता.
५ जुलैचा भारत बंद
सोळा पक्षात एक होता.

बंदच्या गालाला
मुद्दाम बोट लावले गेले.
बंदच्या नावावर
नको त्याचे फावले गेले.

इथुन-तिथुन प्रत्येकालाच
प्रत्येकाला आपले बळ दाखविता आले !
वाकलेल्या सामान्य माणसाला
आणखीनव वाकविता आले !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Monday, July 5, 2010

दंगल में मंगल

सामाजिक ऐक्याची
रक्तरंजित टिंगल असते.
राजकिय पक्षांसाठी
दंगल म्हणजे मंगल असते.

सर्वांचेच हात
रक्ताने माखले आहेत !
गुन्हेगार सिद्ध होत नाहीत
जरी खंडीभर दाखले आहेत !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Sunday, July 4, 2010

बंदचा मार्ग


त्याच्या विरोधात तिच्याकडून
वेगळाच मार्ग स्विकारला गेला.
बेबंदशाहीला विरोध म्हणून
अचानक बंद पुकारला गेला.

अत्यावश्यक सेवांचाही
बंदमुळे खेळखंडोबा झाला होता !
तिचा बंद यशस्वी होऊन
तो वठणीवर आला होता !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Saturday, July 3, 2010

अंदाज पावसाचा

जुळे भाऊ

***** आजची वात्रटिका *****
***************************

जुळे भाऊ

मी मोठ,तो छोटा
मोठेपणाचा बाऊ आहे.
दोघांचाही दावा
मीच मोठा भाऊ आहे.

एकमेकांच्या आधाराशिवाय
दोघेही लुळे आहेत !
छोटा-मोठा कुणीच नाही
दोघेही जुळे आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Friday, July 2, 2010

झाडा-झडती

***** आजची वात्रटिका *****
***************************

झाडा-झडती

झाडे लावा,झाडे जगवा
शासनाचा दट्टा असतो.
थुका लावा,अनुदान लाटा
लोकांचाही रट्टा असतो.

लाटा-लाटीत,वाटा-वाटीत
खाली फक्त गड्डा असतो !
पुन्हा नवी घोषणा होताच
पुन्हा तोच खड्डा असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Thursday, July 1, 2010

मिडीया मॉडेलिंग

***** आजची वात्रटिका *****
***************************

मिडीया मॉडेलिंग

एकीकडे शेतकर्‍यांच्या आत्महत्या,
एकीकडे मॉडेलची आत्महत्या आहे.
मिडीयाचे हे धोरण
खरोखरच मिथ्या आहे.

मिडीयाचा हा चटपटीतपणा
पत्रकारीतेचच मॉडॆल आहे !
गॉंव जले हनुमान बाहर
निरोच्या हाती फिडेल आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

राजकीय लाईन

***** आजची वात्रटिका *****
***************************

राजकीय लाईन

एकात राहून दुसर्‍याशी
संपर्क करणे चालु असते.
राजकीय नेत्यांचे असे
लाईन मारणे चालु असते.

राजकीय नैतिकता सोडून
नेत्यांची राजकीय लाईन आहे !
एक-एक नेता आतुन
अनेकांशी जॉईन आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, June 30, 2010

प्राचार्य....(श्रद्धांजली)

विलिनीकरण

***** आजची वात्रटिका *****
****************************

विलिनीकरण

येऊ नये त्यांच्या ओठी
विलिनीकरणाचे शब्द आले.
घड्याळातले लहान-मोठे काटे
जागच्या जागी स्तब्ध झाले.

बेदखल म्हणता म्हणता
त्यांची चांगलीच दखल आहे !
विलिनीकरणाच्या कोड्याची
वेगवेगळी उकल आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, June 29, 2010

लवचिकता

***** आजची वात्रटिका *****
*************************

लवचिकता

मतभेद झाले तरी
मतात भेद होऊ .नयेत.
आपल्याला देण्याऐवजी
विरोधकांना देऊ नयेत.

मतभेद असले तरी
मतांसाठी भेद झाकले जातात !
स्वत:ला ताठर समजणारेही
ऐनवेळी वाकले जातात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)