Showing posts with label फेरफटका.वात्रटिका. Show all posts
Showing posts with label फेरफटका.वात्रटिका. Show all posts

Thursday, March 8, 2012

ऐतिहासिक मांडणी

इतिहास  म्हणजे काही
कुणाच्या तोंडच्या वाफ़ा नसता
रिकाम्या जागा दिसल्या की,
कुणी मारलेल्या थापा नसतात.

इतिहास वेगळा,थापा वेगळ्या,
इतिहास म्हणजे कुचलाकुचली नाही.
चार आण्याच्या भांडवलावर
बारा आण्याची उचलाउचली नाही.

इतिहासाच्या पोटी वर्तमानाचे भविष्य
वर्तमानाला त्याच्या वेणा असतात !
इतिहासाच्या साक्षीला
भूगोलाच्या खाणाखुणा असतात !!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Sunday, February 12, 2012

झेरॉक्स

पक्षीय जाहिरनामे म्हणजे
जनतेला जाहिर टोप्या असतात.
जुन्याच जाहिरनाम्यांच्या
झेरॉक्स कॉप्या असतात.

एकमेकांच्या जाहिरनाम्याची
जाहिर झेरॉक्स काढली जाते !
एकाने सोडली की,
सगळ्यांकडून सोडली जाते !!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Sunday, February 5, 2012

मुद्द्याचे बोला

मुद्द्याची गोष्ट तर
ऐकायलाही मिळत नाही.
निवडणूका कोणत्या आहेत?
हे सुद्धा कळत नाही.

त्यांची खात्री अशी की,
जनता तर पागल आहे !
म्हणूनच कळीच्या मुद्द्यांना
बेमालुमपणे बगल आहे !!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Thursday, February 2, 2012

आगीतून फुपाट्यात

नेत्यांच्या बंडखोरीचा
कार्यकर्त्यांना फटका आहे.
सामान्य कार्यकर्ता
ना घरका ना घाटका आहे.

ति्कडॆ उपेक्षेचा फुपाटा
इकडे पश्चातापाची आग आहे !
निष्ठेच्या प्रदर्शनासाठी
सगळे सोसणे भाग आहे !!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Sunday, January 29, 2012

प्रश्नचिन्ह

सर्वात आधी,सर्वात प्रथम
वाट्टेल ते बकू लागतात.
उतावळ्या पत्रकारीतेमुळे
बातम्यांचे ’टाईम्स’चुकू लागतात.

अंदाज आणि बातमी
हे दोन्हीही खूप भिन्न आहे !
तिला बातमी कसे म्हणावे ?
जिच्यासमोर प्रश्नचिन्ह आहे !!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Friday, January 27, 2012

दगाबाज

फटाफट फुटतोय
तो विश्वासाचा फुगा आहे.
विश्वासही बसत नाही
त्यांच्याकडूनच दगा आहे.

पिसाळांच्या सूर्याजीची
आठवण आज आहे !
कालपर्यंतचा निष्टावंतच
खरा दगाबाज आहे !!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Wednesday, January 18, 2012

मुद्द्यावरून गुद्द्याकडॆ

काय केले? काय राहिले?
याचा कुठे लेखाजोखा असतो?
परस्परांच्या बदनामीवरच
प्रचारामध्ये ठोका असतो.

मुद्द्यावरून गुद्द्याकडे येवून
मुद्दे अडगळीत पडल्या जातात !
सामाजिक मुद्दे सोडून
निवडणूका लढल्या जातात !!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Saturday, January 14, 2012

निळे दु:ख

दलित मतांची फाटाफूट
ज्याला त्याला हवी आहे.
डोक्यात ’प्रकाश’ पडला
नामदेव नेता नाही,कवी आहे.

कुणी महाआघाडीत,
कुणी महायुतीत आहे.
नेत्यांच्या फाटाफूटीने
जनता मात्र व्यथित आहे.

असा एकही जण नाही,
जो सत्तेसाठी झुरला नाही !
एकेकाळच्या वाघांचा
म्हणूनच धाक उरला नाही !!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Sunday, August 28, 2011

लालू उवाच

भ्रष्टाचारावर बोलण्याचा
लालूस अधिकार कुठला होता?
लोकसभेत एव्हढा बरळला की,
जसा चारा खाऊन उठला होता.

अण्णा जिंकले,देश जिंकला
ज्याच्या त्याच्या तोंडी साखर आहे !
लोकपाल चर्चेतून सिद्ध झाले
लालू पक्का जोकर आहे !!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Friday, August 5, 2011

ग्लोबल महागाई

दररोजचा दिवस ढकलताना
सामान्य माणूस अगतिक आहे.
त्यालाच सांगणे बरे नाही
महागाईची समस्या जागतिक आहे.

समस्या जागतिक असो,
वा स्थानिक असो
ज्याची त्याला झळ आहे !
लागल्याशिवाय कळत नाही
महागाईची केवढी कळ आहे !!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Wednesday, August 3, 2011

सारेच चमत्कारीक !

इथे चमत्कारांना कमी नाही
मोठा चमत्कारीक देश आहे.
नव नव्या चमत्कारांचा नमुना
न चुकता पेश आहे.

ना चौकशी,ना चिकित्सा,
लोकच दूधखुळे आहेत !
लोक अज्ञानाच्या जिवावरच
चमत्कारीक चाळे आहेत !!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Saturday, July 2, 2011

आधुनिक कॉलीदास

त्याचा तिला,तिला त्याचा
निरोपांचा उत असतो.
कालीदासाचा तो मेघदूत,
यांचा’मोबाईल दूत’ असतो.

आषाढाची वाट कुणाला?
प्रत्येक क्षण प्यारा असतो !
एस.एम.एस.च्या जोडीला
मिसकॉलचा मारा असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, June 10, 2011

सुगीचे दिवस

साठेबाजांच्या मढयावर
घालायचे ते घातले जाते.
खताबरोबर बियाणेही
मागच्या दाराने घेतले जाते.

कडू बेण्यांचे नशीबच
साठेबाजीमुळे फळफळले जाते !
सरकारी सौजन्यानेच
काळ्याबाजाराला
खतपाणी मिळले जाते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, June 3, 2011

उपोषण

बायको स्वयंपाक करेना,
रागावणार नाही तो नवरा कसला?
उपोषणाच्या बातम्या ऐकून
नवराही उपोपोषणाला बसला.

तसाही उपवास घडला असता,
असाही उपवास घडला गेला !
उपासमारीचा प्रसंग
उपोषणाच्या नावे पडला गेला !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, May 8, 2011

आक्रीत लोक-रीत

लोकांशी इमानदारीने वागा,
लोक तुम्हांला हसू लागतात.
लोकांशी बेइमानीने वागा,
लोक सहज फसू लागतात.

ना नवल,ना खंत,
सगळेच कसे आक्रीत आहे !
चुकीची असली तरीही
शेवटी हीच लोक-रीत आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, May 5, 2011

मरणोत्तर शंका

अफवा,प्रश्न आणि शंकांना
फा मोठा उत आहे.
ओसामा लादेन मेला तरी
जिवंत त्याचे भूत आहे.

"हा जागतिक शांततेसाठीचा लढा"
जरी ओबामा वदला आहे !
जगाने सुटकेचा नि:श्वास टाकला
तरी हा वैयक्तिक बदला आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, April 30, 2011

दैनिक फोडाफोडी

राजकीय पक्ष फोडावा तसा
पेपरवालेही पत्रकार फोडतात.
रस्सीखेच वाढली की,
किंमत देऊन पत्रकार ओढतात.

ओढाओढी आणि फोडाफोडीची
पत्रकारीतेलाही बाधा आहे !
सबसे बडा रूपय्या
व्यवहार एकदम साधा आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

दुष्काळी पाहुणचार ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- दुष्काळी पाहुणचार दुष्काळ पाहणी दौरा बघून, आमचे मतही ठाम झाले. एकाचा पाहुणचार करताना, दुसरेच हकन...