Monday, January 31, 2011

थेट-भेट

या गुहेतून त्या गुहेत
पुन्हा जुनाच कित्ता आहे.
भगव्या वाघाच्या भेटीला
निळा निळा चित्ता आहे.

सांगता येत नाही
कुणाच्या चित्तात काय घोळू शकते ?
आज तर कुणाच्याही गुहेमध्ये
कुणीही आरामात लोळू शकते !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, January 30, 2011

नैतिक उंची

भ्रष्टाचाराची टाळी कधी
एका हाताने वाजत नाही.
कुणी घेताना तर
कुणी देताना लाजत नाही.

घेणारे बिनलाजे असतील तर
देणारेही बिनलाजे आहेत !
नैतिक उंचीपुढे
घेणारे-देणारेही खुजे आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

भेसळीचा कारभार

भेसळीची भीती कुणाला?
भेसळखोर बेदरकार आहे.
मुंबई असो वा दिल्ली
भेसळीचेच सरकार आहे.

जसे काय भेसळ म्हणजे
जीवनाचा अविभाज्य घटक आहे?
भेसळीच्या कारभाराची
लोकशाहीलाही चटक आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, January 29, 2011

छापा-छापी

कुठे कापाकापी चालु आहे,
कुठे ढापाढापी चालु आहे.
लुटुपुटुची का होईना
सर्वत्र छापाछापी चालु आहे.

हप्ते न देणारांना शिक्षा,
हप्तेखोरांना सरळ माफी आहे !
समजणारांना समजलेच असेल
त्यांच्यासाठी इशाराही काफी आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, January 27, 2011

सामाजिक मस्ती

दिशा देणारांकडे कानाडोळा,
दशा करणारांशी दोस्ती आहे.
दुसरे तिसरे काही नाही
ही सामाजिक मस्ती आहे.

"आपल्याला काय त्याचे?"
ही मस्ती तुम्ही टाळू शकतात !
नसता उद्या मनमाड सारखे
तुम्हां-आम्हांलाही जाळू शकतात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, January 26, 2011

प्रजासत्ताकाचे वास्तव

प्रजासत्ताकाची वाटचाल
मतसत्ताकाकडे होते आहे.
ज्याच्यावर भरवसा ठेवावा
ते कुंपणच शेत खाते आहे.

मतसत्ताक ते टोळीसत्ताक
हे प्रजासत्ताकाचे रूप आहे !
ज्याच्या ताटात पोळी
त्याच्याकडेच तूप आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, January 25, 2011

धार्मिक दांभिकता

आपली ती धार्मिकता,
दुसर्‍याचा तो धर्मप्रचार असतो.
ज्याच्या त्याच्या धार्मिकतेचा
असा स्वार्थी विचार असतो.

दुसर्‍याच्या धर्माविषयी
मनात पक्का विखार असतो !
संकुचित धार्मिकतेला
दांभिकतेचा विकार असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, January 24, 2011

हिची चाल तुरू तुरू

हिची चाल तुरू तुरू

जीवनावश्यक वस्तुंमध्ये
महागाई चढाओढ लावू लागली.
तुरीची डाळही
पुन्हा तुरू तुरू धावू लागली.


महागाईचे दु:ख असे
घासा-घासाला गिळावे लागते!
डाळ शिजली नाही तरी
पापी पोटाला जाळावे लागते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

हिची चाल तुरू तुरू

***** आजची वात्रटिका *****
**********************

हिची चाल तुरू तुरू

जीवनावश्यक वस्तुंमध्ये
महागाई चढाओढ लावू लागली.
तुरीची डाळही
पुन्हा तुरू तुरू धावू लागली.


महागाईचे दु:ख असे
घासा-घासाला गिळावे लागते!
डाळ शिजली नाही तरी
पापी पोटाला जाळावे लागते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, January 23, 2011

सरकारी खिसेकापू

सरकारी कार्यालये म्हणजे
भ्रष्टाचाराचे टापू आहेत.
टेबला-टेबलावर बसलेले
अट्ट्ल खिसेकापू आहेत.

सरकारबरोबर लोकांचेही खिसे
बेमालुमपणे कापले जातात !
खिसेकापूंच्याच मागे
खिसेकापू लपले जातात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, January 22, 2011

देशभक्तीची लाज

शालेय वयात जमते तर
महाविद्यालयातही जमले पाहिजे.
तिथे प्रतिज्ञेच्या सोबतीने
राष्ट्र्गीतही घुमले पाहिजे.

संबंध सक्तीचा नाही,
संबंध युवाशक्तीचा आहे !
त्यात लाज कशाला बाळगायची?
जिथे संबंध देशभक्तीचा आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, January 21, 2011

’स्वाभिमाना’ची गोष्ट

पक्षापेक्षा संघटनांचेच
स्वाभिमान जागू लागले.
संघटनावाले पक्षांशी
दादागिरीने वागू लागले.

मुलांना वडीलांकडूनच
दादागिरीचे शिक्षण आहे !
हात तिच्या आयला
हे तर अवलक्षण आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, January 20, 2011

नंबर पोर्टेबिलिटी

कुणाकुणाच्या नेटवर्कचा
कव्हरेज एरियाच भारी आहे.
त्यांची नंबर पोर्टेबिलिटी
आधीपासूनच जारी आहे.

नंबर तोच असला तरी
त्यांची ’कंपनी’वेगळी असते !
ज्यांना हे जमते
त्यांची मजाच आगळी असते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, January 19, 2011

गोल्डन चान्स

भ्रष्टाचाराने बरबटलेले
आदर्शचे इमले आहेत.
घोटाळेबहाद्दर सोडून
पर्यावरणात रमले आहेत.

आदर्शचा पर्यावरणाला,
भ्रष्टांचा व्यवस्थेला धोका आहे !
मुळापासून नष्ट करण्यासाठी
हाच सर्वोत्तम मोका आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

नैसर्गिक न्याय

आदर्शचा टॉवर उंच
लवासाचे पाणी खोल आहे.
पर्यावरणाच्या नावाने
दोन्हीकडेही ढोल आहे.

निसर्गच सांगेल
कोण किती पाण्यात आहेत?
पोवाडे गाणारे गातीलच
त्यांचे फायदेच
पोवाडे गाण्यात आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, January 18, 2011

कांदा एके कांदा

कधी कांदा हसवतो,
कधी कांदा रडवतो.
आपल्याला झळ बसताच
आपण ऊर बडवतो.

ज्याला खरी झळ बसते
त्याला गृहीत धरीत नाहीत !
कांदा उतरला-चढल्याने
आपण आत्महत्या करीत नाहीत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

कथा चीनच्या कांद्याची

मेड इन चायनाच्या
चर्चाच फार असतात.
कांद्यांचेही तसेच आहे,
एका किलोत चार बसतात.

नाक मुरडत का होईना
चिनी कांदा घ्यावा लागेल !
एक-एक कांदा मग
सात दिवस खावा लागेल !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, January 17, 2011

इज्जत का सवाल

आयटम सॉंगच्या ओळी
तापदायक ठरू लागल्या.
इज्जतीपोटी मुन्नी आणि शीला
आपले नामांतर करू लागल्या.

त्यांच्या मानसिकतेची कल्पना करा
ज्यांचे नाव मुन्नी आणि शीला असेल !
उद्या आपल्याही लेकीबाळींवर
पुन्हा हीच बला असेल !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, January 16, 2011

पेट्रोलवर संक्रांत !

पेट्रोलवर संक्रांत !

गाढवावरची संक्रांत
पेट्रोलवर बसली आहे.
त्यांना दिसत नसली तरी
आम्हांला महागाई दिसली आहे.

महागाईचे वाढते ओझे
नाविलाजे झेलावे लागेल !
तोंड कडू झाले असले तरी
गोड गोड बोलावे लागेल !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, January 15, 2011

संक्रांत-फ़ल

संक्रांत सांगण्याची कथा
जरी वर्षानुवर्षे फसलेली असते.
तरीही पुन्हा पुन्हा संक्रांत
कशावर तरी बसलेली असते.

तिळागुळाच्या गोडीला
सांस्कृतिक ओल आहे !
सत्य,शिव,सुंदराचे संक्रमण
हे खरे संक्रांत फ़ल आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, January 14, 2011

कांदेचोर

वाढती महागाई बघून
लोक दात कोरायला लागले.
आजकाल चोरसुद्धा
चक्क कांदे चोरायला लागले.

ज्यांचा धंदाच लुटालुटीचा
त्यांचेच हे काम आहे !
कुणाची कांदेचोरी छुपी,
कुणाची खुलेआम आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, January 13, 2011

महागाईचे राजकारण

एकमेकांच्या डोक्यावर
महागाईचे खापर फोडू लागले.
महागाई रोखायची सोडून
आपले तारतम्य सोडू लागले.

दोषारोपांच्या स्वस्ताईने
सरकार त्रासलेले आहे !
जनतेबरोबर सरकारही
महागाईने ग्रासलेले आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, January 12, 2011

तारूण्याची जबाबदारी

तरूण असून उपयोग नाही,
तारूण्य कळले पाहिजे.
तारूण्य साचलेले नको,
तारूण्य सळसळले पाहिजे.

नवी आव्हाने पेलताना
माय-मातीची लाज नको.
तारूण्याचा उत्साह असावा
तारूण्याचा माज नको.

तनात असले तरी
मनात तारूण्य पाहिजे !
वेधक असावे,भेदक असावे,
नजरेतही कारूण्य पाहिजे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, January 11, 2011

भ्रष्टाचाराचा ट्वेंटी-20

क्रिकेटसारखे भ्रष्टाचाराचे
नवे रूप समोर येऊ लागले.
पहिले कसोटीसारखे खायचे
आता ट्वेंटी-20 सारखे खाऊ लागले.

दम खायला वेळ कुणाला?
सगळे कसे झट की पट आहे?
ऑलराउंडर खेळाडूंचा तर
सगळीकडेच जबर वट आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

सा.सूर्यकांती अंक ३३ वा.


Monday, January 10, 2011

राजकीय खुलेपणा

ऊठसूठ तुटण्याएवढे
पक्षीय पाश ढिले असतात.
सर्वच पक्षांचे दरवाजे
येणारा-जाणारांना खुले असतात.

राजकीय खुलेपणामुळेच
राजकीय समतोल राखला जातो !
पाहिजे तो पक्षीय स्वाद
त्यामुळेच तर चाखला जातो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

आदर्श शाखा:पुणे

हौतात्म्य आणि विश्वास
दोन्हीलाही धोका आहे.
मुंबईनंतर पुण्यातही
आदर्श घोटाळ्याची शाखा आहे.

घोटाळ्यांचा हैदोस तर
जिकडे तिकडे वाढला आहे !
केवळ मुंबईच नाही
देशसुद्धा विकायला काढला आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, January 9, 2011

आय.पी.एल-4

बेभरवश्याच्या खेळात
भरवश्याच्या लक्ष्मणला भाव नाही.
प्रत्यक्ष महाराजाचे तर
लिलावतच नाव नाही.

गौतमची गंभीरता वाढली,
वाळीत गेल आणि लारा टाकला.
धावणार्‍या घोड्यांनाच
मालकांनी चारा टाकला.

खेळाडूंबरोबर इज्जतीचाही
हा जाहीर लिलाव आहे !
क्रिकेटच्या बोन्सायचे
ट्वेंटी-20 हे नाव आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, January 8, 2011

थंडीची लाट

कधी उष्णतेची,
कधी थंडीची लाट असते.
माणसाची निसर्गाशी
कायमचीच गाठ असते.

उष्णतेने पारा चढतो,
थंडीने पारा उतरत असतो.
निसर्ग माणसावर
सकारण बिथरत असतो.

लाट कोणतीही असो
माणसे त्यावर स्वार होतात !
आईसक्रिमच्या कपापेक्षा
बाटल्यांचेच खळखळाट फार होतात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, January 7, 2011

जातीवाचक ओळख

जसे ढोपरता येतील तसे
महापुरूष ढोपरले जातात.
जसे वापरता येतील तसे
महापुरूष वापरले जातात.

जातीय चौकटीचा विळखा
महापुरूषांसाठी जाचक आहे !
दुर्दैवाने महापुरूषांची ओळख
सध्या तरी जातीवाचक आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, January 6, 2011

जाहिर कबुली

इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमाने
पत्रकारिता देखणी झाली.
गुळ्गुळीत कागदी स्पर्शाने
बुळबुळीत लेखणी झाली.

कुणाच्या देखणेपणाला
कमी लेखण्याचा हेतू नाही.
सत्ता-संपत्तीपर्यंत पोहोचण्याचा
पत्रकरिता हा सेतू नाही.

धंदेवाईकपणा कबुल करा
सतीसावित्रीचा आव नको !
एकमेकांचे डोळे झाकून
आंधळ्या कोशिंबीरीचा डाव नको !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, January 5, 2011

26/11 ची जखम



26/11 ने देश ढवळून निघाला
राजकारणही ढवळून निघले आहे.
ज्याला राजकीय मुद्दे पाहिजेत
त्यांचेही आयतेच भागले आहे.

त्यामुळेच 26/11 ची जखम
पुन्हा पुन्हा चिदगळते आहे !
ज्याचे त्याला कळत असूनही
स्वार्थापोटी कुठे वळते आहे ?

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, January 3, 2011

सावित्रीचे देणे

नवरा-बायको नोकरीला
पगारही डबल आहेत.
वरवरचा अर्थ असा की,
महिलाही सबल आहेत.

हे विसरून चालणार नाही
हे सावित्रीचे देणे आहे !
आर्थिक सबलता आली तरी
वैचारिक सबलता येणे आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, January 2, 2011

इशाराही काफी है

दहशतवादाचा अर्थ
सोसणारालाच कळू शकतो.
दहशतवादाचा राक्षस
पोसणारालाच गिळू शकतो.

अमेरिका,पाकिस्तान
हे त्याचे जिवंत दाखले आहेत !
आम्हांला काय म्हणायचे आहे,
कळणारे कळून चुकले आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, January 1, 2011

पेताडोत्सव

नवे वर्ष येते म्हणजे
नेमके काय घडत असते?
पेतांडांच्या उत्सवात
एकाची भर पडत असते.

ग्लोबलतेचे वारे असे
पेताडांच्या पथ्यावर पडत आहेत !
पेताडांचे उत्सव तर
दिवसेंदिवस वाढत आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

daily vatratika...19march2024