Wednesday, March 31, 2010

काटा-काटी

काटा-काटी

जसा जसा जिनिंगवर
कापसाचा साठा वाढला जातो.
तसा तसा शेतक‍र्‍यांचा
काट्याने काटा काढला जातो.

काटाकाटीचा हा धंदा
बिनधास्त आणि बेडर असतो !
या काटाकाटीच्या साक्षीला
जिनिंगवरचा ग्रेडर असतो !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, March 30, 2010

कमांडची हाय

***** आजची वात्रटिका *****
**********************

कमांडची हाय

हायकमांडचा आदेश येताच
कार्यकर्त्यांकडून हाय खाल्ली जाते.
हिटलरशाहीविरूद्धची नाराजी
ओठांतल्या ओठांत बोलली जाते.

मर्जी न सांभाळणारा कार्यकर्ता
पक्षातून हाकलला जातो !
हायकमांडचा आदेश नसेल तर
मधुचंद्रही पुढे ढकलला जातो !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Monday, March 29, 2010

गुटखा ते मधुशाला

***** आजची वात्रटिका *****
**********************

गुटखा ते मधुशाला


संमेलनच्या परंपरेप्रमाणे
वादावर वाद जुंपले गेले.
गुटख्याने सुरू होऊन
मधुशालेने संपले गेले.

बिग तो बिगच ठरला,
बाकी अजूनबी खुजे झाले !
आपण तळतळून फायदा नाही
ज्यांचे व्हायचे त्यांचे भजे झाले !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Sunday, March 28, 2010

पक्षीय कोंडमारा

***** आजची वात्रटिका *****
**********************

पक्षीय कोंडमारा

श्रेष्ठींनी घोळ म्हटले की,
गोंडा घोळणे भाग असते.
आदेश हा आदेश असतो,
तोही घोळणे भाग असते.

दिलेल्या पदाला,
आलेल्या शब्दाला जागावे लागते !
वैयक्तिक आयुष्यालाही
पक्षशिस्तीने भागावे लागते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Saturday, March 27, 2010

भक्ती(भेद)भाव

***** आजची वात्रटिका *****
***********************

भक्ती(भेद)भाव

भक्तांची श्रीमंती
देवालाही कळू शकते.
पैसे मोजले की
झटपट दर्शन मिळू शकते.

देवा,तुझ्या दारामध्ये
बड्यांचा बडेजाव आहे !
तुझ्या नावावरती
फक्त भेदच नाही तर,
सरळ सरळ भाव आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

सोय-गैरसोय

***** आजची वात्रटिका *****
**********************

सोय-गैरसोय

जशी उमेदवारी
नेत्याच्या पोराला मिळू शकते.
तशी उमेदवारी
एखाद्या चोराला मिळू शकते.

आपली लोकशाहीच
चोरां-पोरांच्या हवाली आहे !
अट्टल मवाल्यालाही
म्हणता येईना,हा मवाली आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Friday, March 26, 2010

अमिताभ आणि पाहूणचार

***** आजची वात्रटिका *****
***********************

अमिताभ आणि पाहूणचार

अमिताभची उपस्थिती
हेही राजकारण ठरू लागले.
जणू पाहूण्याच्या काठीने
सगळे साप मारू लागले.

पुलाखालचे पाणी असे
पुलावरून जात आहे !
"मे ऑंगणे मे,
तुम्हारा क्या काम हैं?"
कुणी मनातल्या मनात गात आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Thursday, March 25, 2010

कविसंमेलनांचे दुर्दैव

***** आजची वात्रटिका *****
***********************

कविसंमेलनांचे दुर्दैव

संमेलनात वर्णी लागणे
हा कविंसाठी सट्टा असतो.
तेच कवी,त्याच कविता
बदललेला कट्टा असतो.

नवे काही लिहित नाहीत,
त्याच कविता वाचल्या जातात !
एकमेकांना साह्य केले की,
जुन्याच कविता पचल्या जातात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, March 24, 2010

खुशबू ते बदबू

***** आजची वात्रटिका *****
**********************

खुशबू ते बदबू

खुशबूच्या कबुलीजबाबातून
बदबू यायला लागली.
विवाहपूर्व संबंधांची
ती कबुली द्यायला लागली.

कोर्टाने तिला पाठींबा देताना
नवाच पेच टाकला आहे !
खुशबूच्या बदबूला
राधा-कृष्णाचा दाखला आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

लिव्ह इन रिलेशनशिप

***** आजची वात्रटिका *****
**********************

लिव्ह इन रिलेशनशिप

तो असतो ठेवलेला,
तिही ठेवलेली असते.
विवाहसंस्थेची वाट
दोघांनी मिळून लावलेली असते.

प्रेम,विश्वास,जबाबदारी
यांचे काहीही बंधन नसते !
फक्त गरजेपोटी
शरीरच शरीराला आंदण असते

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Monday, March 22, 2010

संमेलनाचा नैतिक विजय

वादाने वाद वाढत गेला
म्हणूनच ही घटका आली.
माणिकचंदच्या गुटख्यातून
संमेलनाची सुटका झाली.

प्रतिष्ठेचे बुरखे असे
टराटरा फाडले पाहिजेत !
सहित्य संमेलनातून
पेताड साहित्यिकही
असेच बाहेर काढले पाहिजेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

कॉपीमुक्ती

***** आजची वात्रटिका *****
**********************

कॉपीमुक्ती

कॉपी म्हणजे चोरी,
ती केवळ नक्कल नाही.
आपणच सिद्ध करतो,
आपल्याला अक्कल नाही.

नक्कल ती नक्कल,
अस्सल ते अस्सल असते.
गुणवत्ता म्हणजे,
स्वत:शीच टस्सल असते.

चला आपण सारे
गुणवत्तेचे भक्त होऊ या !
कॉपीमुक्ती करण्यासाठी
आपण कॉपीमुक्त होऊ या !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Sunday, March 21, 2010

प्रायोजित साहित्य संमेलन

***** आजची वात्रटिका *****
**********************


प्रायोजित साहित्य संमेलन

साहित्य निर्मिती म्हणजे
त्यांचा रिकामपणाचा छंद आहे.
संमेलनाचे प्रायोजकच सांगतात,
उँचे लोग,उँची पसंद आहे.

सोयीनुसारच बोलायचे
एवढे सगळे चाभरे आहेत !
आता तर तोंडामध्ये
माणिकचंदचे तोबरे आहेत !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

फ्री-हीट

***** आजची वात्रटिका *****
**********************


फ्री-हीट

इनस्विंग टाकता टाकता
तो आऊटस्विंग टाकू लागतो.
यॉर्करसारखा यॉर्करही
नेमका लाईन हुकू लागतो.

त्याच्या सततच्या नोबॉलचा
तिला वीट येत असतो !
अंदर की बात अशी की,
तो तिला’फ्री-हीट’ देत असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Saturday, March 20, 2010

चित्रपट पुरस्कार

***** आजची वात्रटिका *****
**********************

चित्रपट पुरस्कार

जरी सर्व विभागांना
चित्रपट पुरस्कार दिला जातो.
तरी चित्रपट पुरस्कारात
नट्यांवर अन्याय केला जातो.


नट्यांच्या धाडसीपणाबद्दल
विशॆष सत्कार व्हायला हवा !
कपड्यांच्या काटकसरीसाठी
एखादा पुरस्कार द्यायला हवा !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Thursday, March 18, 2010

राजकीय ’योगा’योग

***** आजची वात्रटिका *****
**********************

राजकीय ’योगा’योग

देशाच्या राजकारणामध्ये
राजकीय ’योगा’योग येतो आहे.
रामदेव बाबांचा पक्ष
राजकारणात भाग घेतो आहे.

काहीतरी चांगले घडेल
अशी आशा धरायला
हरकत तर काहीच नाही !
योगासना एवढे सोपे
निवडणूकासन तर नाहीच नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

मायावतींची ’हारा’ किरी

***** आजची वात्रटिका *****
**********************

मायावतींची ’हारा’ किरी

त्या नोटा,नोटा उरल्या नव्हत्या
त्या नोटांची फुले झाली होती.
सत्काराच्या हाराची बनवाबनवी
सर्वांच्या लक्षात आली होती.

नोटांचे हे असले प्रदर्शन
कुठल्याही क्षणी सार्थ नाही !
कावळे टपलेले असताना
ह्या ’हारा’किरीत अर्थ नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, March 17, 2010

मार्च एण्ड

***** आजची वात्रटिका *****
**********************

मार्च एण्ड

आकड्यांचा आकड्यांना
बरोबर मेळ घातला जातो.
महिण्याच्या सुरूवातीपासूनच
मार्च एण्ड चा घोळ घातला जातो.

मार्च एण्ड्च्या खेळाला
कोणत्याच वर्षी खंड नसतो !
एप्रिल संपला तरी
त्यांचा आपला मार्च एण्ड असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, March 16, 2010

चर्चांची ’पोल’खोल

***** आजची वात्रटिका *****
**********************

चर्चांची ’पोल’खोल

सोयीचे पाहूणे बोलवून
सोयीच्या चर्चा घडवल्या जातात.
निरपेक्षतेच्या टिर्र्‍या
जगजाहिर बडवल्या जातात.

कुणायचे वाजवायचे आहे
यासाठी ढोल बदलले जातात !
रंगलेल्या चर्चेचेही
शेवटी पोल बदलले जातात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

नोटांचा हार

***** आजची वात्रटिका *****
**********************


नोटांचा हार

मायावतींवरच्या मायेचा
एकच तर सार होता.
फुलांचा नाही तर
तो नोटांचा हार होता.

जर नोटांच्या हाराऐवजी
हत्तीवरून साखर वाटली असती !
नसता झाला गाजावाजा,
ना शत्रुंना संधी भेटली असती !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Monday, March 15, 2010

गिर्‍हाईक ते मामा

***** आजची वात्रटिका *****
**********************

गिर्‍हाईक ते मामा

बिचार्‍याला ग्राहकाला तर
चुकून राजेपण जाणवले जाते.
राजा,राजा म्हणीत त्याला
राजरोस गिर्‍हाईक बनवले जाते.

कधी ग्राहक गिर्‍हाईक,
कधी ग्राहक मामा असतो !
या बनवाबनवीच्या साक्षीला
जाहिरातींचा जाहिरनामा असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Sunday, March 14, 2010

राजकीय ट्वेटी-20

***** आजची वात्रटिका *****
**********************

राजकीय ट्वेटी-20


आदेश पाळतो कोण?
सगळे आदेश देते होतात.
कार्यकर्ता म्हणून झिजतो कोण?
सगळेच थेट नेते होतात.

पक्षीय परंपरांना
ही तर धोक्याची घंटी आहे !
दुसरे तिसरे काही नाही
हे राजकीय ट्वेटी-20 आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Saturday, March 13, 2010

स्ट्राईक रोटेट

***** आजची वात्रटिका *****
**********************

स्ट्राईक रोटेट

त्याचा वन डे चा खेळ
ती कसोटी मागते.
पिचवर टिकताना
त्याची कसोटी लागते.

कधी तो,कधी ती
डाव सांभाळून नेतात !
स्ट्राईक रोटेट केली की,
आपोआप धावा होतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Friday, March 12, 2010

टॅक्स बचाव

***** आजची वात्रटिका *****
**********************

टॅक्स बचाव

नको नको ते पर्याय
सल्लेबहादूर सुचवू लागले.
वाचवता येईल तेवढा
लोक टॅक्स वाचवू लागले.

करोडपती बिनधास्त,
हजारोपतींचा दंगा असतो !
बुडवणारे तर बुडवतातच
इमानदारांच्या मागे भुंगा असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Thursday, March 11, 2010

जाहिरातींची अर्धांगी

***** आजची वात्रटिका *****
**********************

जाहिरातींची अर्धांगी

जरा सावकाश बघा
फार काही घाई नाही
अशी जाहिरात दाखवा
ज्या्मध्ये बाई नाही.

जाहिरातीतल्या बाईला
कपड्यांचीही तंगी असते !
जणू बाई म्हणजे
जाहिरातींची अर्धांगी असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

प्रशासकीय कारभार

***** आजची वात्रटिका *****
**********************

प्रशासकीय कारभार

बैल गेल्यावरतीच
झोपा करायचे सुचले जाते.
वरातीमागुन घोडे तर
अगदी हमखास नाचले जाते.

जिकडे तिकडे बसलेले
उंटावरचे शहाणे असतात.
नाचायचेच नसल्याने
वाकड्या अंगणाचे बहाणे असतात.

अडल्या नारायणाला मग
गाढवांचेच पाय धरावे लागतात !
गोपाळराव म्हणून चालत नाही
त्यांचे हातही ओले करावे लागतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, March 10, 2010

इतिहासाचे भविष्य़

***** आजची वात्रटिका *****
**********************

इतिहासाचे भविष्य़

महिला आरक्षण विधेयकामुळे
इतिहास नक्की घडला जाईल.
पुरूषांबरोबर महिलांचाही
राजकारणात सहभाग वाढला जाईल.

महिला प्रतिनिधी वाढतील,
त्यांचे प्रमाणही पक्के असेल !
घराणेशाहीचे प्रमाण मात्र
कमीत कमी ३३ टक्के असेल !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

भितीदायक आनंद

***** आजची वात्रटिका *****
**********************

भितीदायक आनंद

महिला आरक्षणाचे फायदे
बघा नेमके कुणा आहेत ?
उमेदवारीच्या शर्यतीत
त्यांच्याच लेकी-सुना आहेत.

महिला आरक्षणाचे विधेयक
अवघड जागेचे दुखणे होऊ नये !
बायकांचा पदर धरून
नवी घराणेशाही येऊ नये !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, March 9, 2010

मिस-कॉल

***** आजची वात्रटिका *****
**********************

मिस-कॉल

त्याची आठवण होताच
ती मिसकॉल द्यायची.
मोबाईलच्या पडद्यावर
दोघांची भेट व्हायची.

मिसकॉल देता देता
ती मिसेस झाली होती !
घंट्या वाजवायची वेळ
त्याच्यावर आली होती !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

________________

कठीण शब्दांचे अर्थ-

घंट्या=मिसकॉल

Monday, March 8, 2010

महिला आरक्षण

***** आजची वात्रटिका *****
**********************

महिला आरक्षण

अडगळीत पडलेले विधेयक
सोयीनुसार बाहेर काढले जाते.
एक घेतो उपयोग करून,
बील दुसर्‍याच्या नावे फाडले जाते.

यादव कुळाचा आरोप,
आरक्षणाचा प्रयत्न तोकडा आहे !
३३ च्या आकड्यापायी
त्यांच्यात ३६ चा आकडा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

ट्रॉफी ते सोनोग्राफी

***** आजची वात्रटिका *****
**********************

ट्रॉफी ते सोनोग्राफी

महिला दिनाच्या निमित्ताने
तिच्या हाती ट्रॉफी असते.
मुलगी नको,मुलगा हवा
यासाठीच तर सोनोग्राफी असते.

एकीकडे कौतुक,
दुसरीकडे स्त्रीत्त्व हा शाप आहे !
अबलीकरणाचे सबलीकरण
ही निव्वळ तोंडाची वाफ आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Sunday, March 7, 2010

महिला दिनाचे संकल्प

***** आजची वात्रटिका *****
**********************

महिला दिनाचे संकल्प

आयांनी संकल्प करावा
पून्हा खून करणार नाही.
कुणाच्या सांगण्यावरून
गर्भातल्या लेकी मारणार नाही.

बायकांनी ठरविले पाहिजे
नवर्‍याला छळणार नाही.
सासवांनीही ठरविले पाहिजे
सूनांना जाळणार नाही.

हक्कांपेक्षा जबाबदारी
जोपर्यंत कळणार नाही !
महिला दिनाचे औचित्य
तोपर्यंत कळणार नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

साधूत्वाचे ऑंखोदेखा-हाल

***** आजची वात्रटिका *****
*********************

साधूत्वाचे ऑंखोदेखा-हाल

जिथे रामलिला रंगावी
तिथे कामलिला रंगू लागल्या.
भक्तांच्या भोळ्या श्रद्धा
तिथे रंगेहात भंगू लागल्या.

धर्माचे दलाल आता
वेश्यांचे दलाल बनत आहेत !
तन-मन- धन लुटून
संधीसाधू मालामाल बनत आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड) .

Saturday, March 6, 2010

लग्नांच्या मालिका

***** आजची वात्रटिका *****
**********************

लग्नांच्या मालिका

तिघी-तिघीला हळद लावून
लग्नापूर्वी फिरता येत नाही.
रिऍलिटी शोमध्ये काय होईल ?
याची इमॅजिन करता येत नाही.

रिऍलिटी शो म्हणजे
त्यात सगळेच जालिम असते !
हनिमूनच्या सीनचीही
त्यात रंगीत तालिम असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Friday, March 5, 2010

संतांची ’काम’ गिरी

***** आजची वात्रटिका *****
**********************

संतांची ’काम’ गिरी

काय भक्तांचे सेवाभाव?
काय संतांचे वट आहेत?
संतांच्या ’काम’गिरीला
साक्षीदार मठ आहेत.

संतांच्या ’काम’गिरीसाठी
सेवा नावाची शक्कल असते !
त्यात त्यांचा काय दोष ?
गरजवंताला अक्कल नसते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Thursday, March 4, 2010

देवाच्या दारी

***** आजची वात्रटिका *****
**********************

देवाच्या दारी

देवाच्या दारी जेंव्हा
भक्ती चेंगरली जाते.
श्रद्धाळू भक्ती तेंव्हा
खरोखर गांगरली जाते.

देवाच्या दारी जेंव्हा
प्रत्यक्ष मृत्यु गाठू लागतो.
नास्तिकांबरोबर अस्तिकांचाही
विश्वास तेंव्हा उठू लागतो.

आपणच आपल्या भक्तीची
आता लाज राखली पाहिजे !
देवाच्या दारातली गर्दी
होईल तेवढी रोखली पाहिजे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

नटी आणि अटी

***** आजची वात्रटिका *****
**********************

नटी आणि अटी

नटी व्हायचे असेल तर
थोडीशी वाकडी वाट धरावी लागते.
थोडेसे कष्ट,
जास्त ’अंग’ मेहनत करावी लागते.

ज्यांना’अंग’ मेहनत जमते
त्याच यशस्वी नट्या आहेत !
अभिनय वैगरे गोष्टी
सध्या तरी निव्वळ खोट्या आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, March 2, 2010

जन्मतारीख:एक संवाद
जन्मतारीख:एक संवाद

मॉंसाहेब,
आम्ही असलो छत्रपती,
तरी आम्हांला आता भिती आहे.
तुम्हीच आठवून सांगा,
आमची जन्मतारीख किती आहे?

शिवबा,तुमची जन्मतारीख
आम्ही मुद्दाम सांगत नाहीत.
इथले इतिहाचार्य,बुद्धिवादी
यांची अब्रु वेशीला टांगत नाहीत.

राजांची भिती,
मॉंसाहेबांची इच्छा,
आता आता आम्हांला कळत आहे !
कुत्र्याने पीठ खाऊनसुद्धा
आंधळे पुन्हा पुन्हा दळत आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
१७-२-२०००

Monday, March 1, 2010

तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा....

तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा....

तुकोबा,होऊ नये तो
सगळ्याचाच कळस झालाय.
ज्याचा येऊ नये
त्याचाच किळस आलाय.

पूर्वी कधीच नव्हता
असा भक्तीचा बाजार आहे.
श्रद्धा-ब्रिद्धा सबकुछ झुठ,
हा मानसिक आजार आहे.

आम्ही सगळे ओळखलेय
दंभाला भक्तीची
रंगरंगोटी आहे.
हे सगळेच नाठाळ,
यांना कासेची लंगोटी नको;
यांच्या बाळबुद्धीला
फक्त तुम्ही नाठी म्हणा.
तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा....

यांना अजून माहित नाही,
बोलले तसे वागले पाहिजे.
किर्तनातल्या शब्दा-शब्दाला
प्रत्यक्षात जागले पाहिजे.

तुमच्या भागभांडवलावरच
जोरात यांचा धंदा आहे.
यांच्या दर्शनासाठीही
पायावरती चंदा आहे.
यांची ही बाबागिरी आणि बंडलबाजी
तुम्ही एकदा खोटी म्हणा.
तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा....

उगीच कुणाचा कधी
उगीच तुकोबा होत नाही.
त्यासाठी मोह,माया,वासना,
मूळापासून झडवाव्या लागतात.
वाटलेल्या कर्जाच्या खतावण्या
इंद्रायणीत बुडवाव्या लागतात.

वरून अंगाला नाही,
मनाला राख फासावी लागते.
कुणाच्या शाही नजराण्याची
आसक्ती नसावी लागते.

आजकाल मात्र
जरा वेगळीच खोड आहे.
अध्यात्म आणि राजकारण
जणू दंवडीची जोड आहे?

जो राजाश्रयाला भुलला,
तो काही साधु नाही.
कुणावरही आपले
गुरूत्व कधी लादू नाही.

राम-कृष्ण-हरीचा मंत्र
एकदा यांच्यासाठी म्हणा.
तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा....

अजूनही त्यांचा
पून्हा तोच दावा आहे.
वेदांचा खरा अर्थ,
आम्हांलाच ठावा आहे.

ते सांगतात तोच धर्म,
ते सांगतील तोच देव आहे.
जसे काय ज्ञान म्हणजे,
त्यांच्या बापाचीच ठेव आहे.

पंढरीच्या वाळवंटी
आम्ही नाचतो आहोत.
नव-नवे अर्थ शोधत
गाथा पुन्हा वाचतो आहोत.

एक कौतुकाची थाप
आमच्याही पाठी हाणा.
तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा....

अध्यात्माच्या क्षेत्रात
आज ज्याचा त्याचा टापू आहे.
रोज नवा बाबा,नवा महाराज,
रोज नवी मॉं,नवा बापू आहे.

मी मोठा की तु मोठा?
याचे स्तोम तर फार आहे.
भक्तांच्या टोळ्या-टोळ्यात
आज जणू गॅंग-वॉर आहे?

जुना भक्त नवा गुरू,
उगवत्याला वंदन असते.
ओव्हरडोस होईल असे,
सत्संगाचे चंदन असते.

याला अध्यात्माचे राजकारण,
नाही तर कुणी अध्यात्मिक खुटी म्हणा.
तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा....

कुणी आपल्या बडेजावात
भक्तांना चूर करतोय,
कुणी भोळ्या भक्तांचे
दु:ख इथे दूर करतोय.

कुणी लावतोय अंगारा,
कुणी भक्तांचे कान फुंकतोय.
कुणी अफू-गांजाच्या नशेत
मठा-मठात छान झिंगतोय.

कुणी झाले मांत्रिक,
कुणी झाले तांत्रिक.
कुणी पट्टीचा ऍक्टर आहे.
रोग्यांची संख्या वाढ्ताच,
कुणी चक्क डॉक्टर आहे.

रोग कोणताही असो
त्यांच्याकडे उपचार हजर आहेत.
अडल्या-नडल्या भक्तांचे
त्यांच्याच नावाने गजर आहेत.

व्याकूळलेल्या भक्तांना
जो तो अध्यात्माची भूल देतोय.
एवढेच काय?
ज्यांना होत नाही,
त्यांना चक्क मूल देतोय !

झोपलेल्या या भक्तांना
तुम्ही एकदा उठी उठी म्हणा.
तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा....

गुरूंबरोबर भक्तांनाही
आज अध्यात्माची नशा आहे.
वरून वरून किर्तन,
आतून मात्र तमाशा आहे.

बुवा तिथे बाया,
बाया तिथे बुवा आहे.
एकांतात गुरूची सेवा,
एकांतातच दूवा आहे.

किर्तनाची बिदागी तर
विचारू नका किती आहे.
अध्यात्मिक चंगळवादात
बिचारी श्रद्धा सती आहे.

घेणारांना गोड वाटते,
देणारांनाही गोड वाटते.
जेव्हढी बिदागी जास्त,
तेवढी किर्तनाची ओढ वाटते.

याला धंदा म्हणा, नाही तरी
कुणी लुटा-लुटी म्हणा.
तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा....

आता पाप पाप म्हणून
कुणी उर बडवू शकत नाहीत.
कुणाच्याही गाथा,
पुन्हा इंद्रायणीत बुडवू शकत नाही्त

सदेह वैकुंठाचा अर्थ
हळूहळू का होईना कळतो आहे.
तरीही एखादा मंबाजी,
जमेल तसा छळतो आहे.

खोटा इतिहास पुन्हा
कुणी लिहू शकत नाही.
आणायचे म्हटले तरी
ते विमान पुन्हा येऊ शकत नाही.

तुकोबा तुमचा वारसा
आमच्या ठायी ठायी आहे !
आजकाल आमच्या लेखणीत
तुमचा आशिर्वाद अन
वॉटरप्रुफ शाई आहे !!

वज्राहून कठीण,
मेणाहून मऊ आहोत.
केला होता अट्टहास यासाठी म्हणा.
तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा....

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
मोबा.९९२३८४७२६९

फुटबॉल आणि क्रिकेट

***** आजची वात्रटिका *****
**********************

फुटबॉल आणि क्रिकेट

त्याला आवडतो फुटबॉल,
तिला आवडतो क्रिकेट.
कधी होतो गोल,
कधी पडते विकेट.

तेंव्हा त्यांच्या लक्षात आले
संसार म्हणजे खेळ नसतो !
आवडी-निवडी वेगळ्या तरी,
तो दोन जीवांचा मेळ असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

ऐतिहासिक विकृती...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- ऐतिहासिक विकृती एकीकडे खोट्या इतिहासाशी, खऱ्या इतिहासाचे लढणे चालू आहे. दुसरीकडे विकृत इतिहासाच्या, व...