Monday, February 28, 2011

इमानदारीच्या ’आय’ ला.....

उपकारादाखल इमानदारांना
आयकरात सुट असते.
बेइमानदारांकडून देशाची
लुटीवरती लुट असते.

बेइमानदारांकडून राजरोस
इथे देश फसवला जातो !
जे इमानदारीने भरतात
त्यांच्यावरच कर बसवला जातो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

पदराआडचे राजकारण

महिला आरक्षणाचे धोरण
पुरूषांच्या पथ्यावर पडले आहे.
पदराआडचे राजकारण
तेंव्हापासूनच वाढले आहे.

महिला सबलीकरणाचा गवगवा
जगजाहिरपणे करता येतो !
महिला आरक्षणाची ढाल घेऊन
नथीतून तीर मारता येतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, February 27, 2011

चिरंजीव मराठी

मराठी वाचवा,मराठी वाचवा,
ओरडणारांचा एक घोळका आहे.
इंग्रजाळलेल्या माणसांना
माय मराठीचा पुळका आहे.

माय मराठीला सुगंध
कष्टकर्‍यांचा घामाचा आहे.
माय मराठीला पाया
ज्ञाना-तुका-नामाचा आहे.

इंग्रजाळलेल्या एवढीच
हिंदाळलेल्यांची कीव आहे !
माय मराठीची चिंता नको
माय मराठी चिरंजीव आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, February 26, 2011

पोलिसदादा...

पोलिसदादा,पोलिसदादा,
सांगा अजून काय बाकी आहे?
गुन्हेगारीने बरबटलेली
अंगावरची खाकी आहे.

कधी काळे,कधी ढवळे,
खाक्या वर्दीचे धंदे आहेत !
चार-दोन नासक्या कांद्यांमुळे
इमानदारांचे वांधे आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

रेल्वे अर्थसंकल्पाची दिशा

पूर्वीपासून जे झाले
तेच पुन्हा पुन्हा होवू लागल्रे.
रेल्वेचे गाडीचे डबे
उत्तरेकडून पश्चिमेकडे धावू लागले.

रेल्वे अर्थसंकल्पाचे
चित्र अगदी साफ आहे !
ज्या राज्याचा रेल्वेमंत्री
त्यालाच झुकते माप आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, February 22, 2011

चमत्कारांचे विज्ञान

चमत्कारांमागे चमत्कारांच्या
वावड्यावर वावड्या उडतात.
चमत्कारांचा फुगा फुटताच
चमत्कारांच्या रेवड्या उडतात.

चमत्कारांमागे विज्ञान,
नाहीतर बनवाबनवी असते !
हातचलाखी मागे जी असते,
ती शक्ती तर मानवी असते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, February 21, 2011

टगे आणि बघे

जिकडे बघावे तिकडे
टगे आणि टगे आहेत.
टग्यांचे फावण्यास कारण की,
सगळीकडे बघे आहेत.

टगेगिरी आणि बघेगिरीचे
जाहिर रूणानुबंध आहेत !
बघेगिरी वाढल्यानेच
टगे टगेगिरीत धुंद आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

रनर

राजकारण आणि क्रिकेट
यांचे नाते काही नवे नाही.
दोन्हीकडेही ’रनर’ लागतात
हे काय आम्हांला ठावे नाही?

असे ’रनर’ घेऊनच
आघाडी सरकार धावत असते !
जेवढी विरोधकांची फिल्डिंग टाईट,
तेवढे ’रनर’ चे फावत असते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, February 20, 2011

धावचित

तिच्यासाठी त्याची धावाधाव
थ्रो मात्र अवचित येतो.
ऐन मोक्याच्या क्षणी
तो नक्की धावचित होतो.

अवचित झालेल्या धावचितचा
दोष दुसर्‍याला देता येत नाही !
हा खेळच असा की,
इथे रनरही घेता येत नाही !!


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

भविष्याचा अंदाज

जेंव्हा कधी एकत्र
भगवा आणि निळा असेल.
तेंव्हा कार्यकर्त्यांच्या कपाळी
जांभळ्या रंगाचा टिळा असेल.

निळा+भगवा=जांभळा
ही तर निसर्गाची जादू आहे !
येणारा काळच सांगेल
कोण किती संधीसाधू आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, February 19, 2011

होम-क्रिकेट

पोरांची बॅटींग जोरदार,
त्यांचा रन मागे रन असतो.
आईची फिल्डिंग ढिल्ली,
बाप तर ’नाईट वॉचमन’ असतो.

घरातल्या घरामध्ये
असे क्रिकेटचे मॅच होतात !
पिचचा अंदाज आला नाही की,
पोरांचे मग कॅच जातात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, February 18, 2011

दुधी विष

पैशापुढे कशाचीच
त्यांना सुध-बुध नाही.
शुद्धतेची खात्री द्यावी
असे आज दुध नाही.

दुधास दुध कसे म्हणावे?
हे तर विषाचे प्याले आहेत !
कर्ते आणि करविते
एकमेकांचे साले आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, February 17, 2011

झंडू बाम आणि डोकेदुखी

दोघांमध्ये तिसर्‍याचे
सांगा काय काम आहे?
आता आम्हांला कळाले
नेमके कोण ’झंडू बाम’ आहे?

राम नाम सोडून,
राज नाम मुखी आहे !
दोघांमधल्या तिसर्‍यासाठी
उगीचच डोकेदुखी आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, February 16, 2011

प्रेमाचा गुलकंद

व्हॅलेंटाईन डे काही
त्याच्या मनासारखा गेला नाही.
त्याच्या एकाही गुलाबाचा
कुणीच स्विकार केला नाही.

” मत रो मेरे दिल ” असे म्हणत
आपले अश्रू रोखत असतो !
हल्ली नाकारलेल्या गुलाबाचाच
तो गुलकंद चाखत असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, February 15, 2011

प्रेमानुभव

व्हॅलेंटाईन डे च्या मुहूर्तावर
तिला एवढे काही गुलाब आहे.
प्रेमाची शिसारी येऊन
तिला उलट्या आणि जुलाब झाले.

तिच्या या अनुभवावरून
प्रेमवेड्यांना तरी हुशारी यावी !
ते प्रेमच खरे नाही
ज्याची किळस आणि शिसारी यावी !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, February 14, 2011

मोबाईल लव्ह

तरूणाईच्या मानगुटीवर
व्हॅलेंटाईनचे भूत आहे.
हल्ली मोबाईल म्हणजे
प्रेमाचाच दूत आहे.

ज्यांच्या हाती मोबाईल
त्यांना तर भलताच चेव आहे !
आजकालचे प्रेम म्हणजे
शब्दश:’मोबाईल लव्ह’ आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, February 13, 2011

झाकीव सत्य

रस्त्यावरून चालताना
आम्हांला कोड्यात टाकलेले असते.
जिकडे बघावे तिकडे
हल्ली तोंड झाकलेले असते.

हे चेहरे झाकलेले
असे काय सोशित असतात?
त्यांचे उत्तर असे की,
आजकाल वातावरणच नाही
तर नजराही दूषित असतात !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, February 11, 2011

काकांचा माफीनामा

जे इतिहासात झाले नाही
ते वर्तमानात होवून आले.
’काका मला वाचवा’म्हणण्याआधीच
प्रत्यक्ष काका धावून आले.

पुतण्याच्या दादागिरीपेक्षा
माफीनामा शेलका आहे !
जे कॅमेर्‍यात कैद नाही,
त्याचाच जादा गलका आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, February 10, 2011

उंदीर बोले गणपतीला

प्लॅस्टर ऑफ पॅरिसमधून
आपली आता सुटका असेल.
भक्तांच्या धार्मिक भावनांना
निश्चित थोडाफार फटका बसेल.

बाप्पा,योग्य प्रबोधन झाले तर
हे लोकांच्या पचनी पडेल !
मात्र यात राजकारण घुसले तर
नक्की धार्मिक प्रदूषण वाढेल !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

पेट्रोल म्हणाले कांद्याला

तू जसा आहेस तसा,
मी काही नासका नाही.
भाव वाढून उतरायला
मी काही फुसका नाही.

तुझ्यामुळे फक्त डोळ्यात पाणी,
माझ्यामुळे खिश्याला आग आहे !
मी चढतच जाणार,
तरीही मला घेणे भाग आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, February 9, 2011

राजे चला,तुम्हांला तुमचा महाराष्ट्र दाखवितो..

आपला ’शॉकप्रुफ’पणा

घोटाळा केवढाही असो
तो रेकॉर्डब्रेक असत नाही.
घोटाळ्यांचे आकडे ऐकून
आजकाल धक्काही बसत नाही.

कारण घोटाळेसम्राटांच्या देशात
आपण जन्माला आलो आहोत !
धक्के एवढे बसलेत की,
आपण ’शॉकप्रुफ’झालो आहोत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

एस.बॅंड घोटाळा

ए.राजाच्या बेंडबाजानंतर
नवा एस.बॅंड वाजू लागला.
हजारोंच्या नंतर लाखोंचा
महाघोटाळा गाजू लागला.

खरे काय?खोटे काय?
वास्तव ’देवास’ ज्ञात आहे !
लोकांच्या इस्त्राळूपणाचा
घोटाळ्यांच्या मागे हात आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, February 8, 2011

युतीचे भवितव्य

रेल्वेच्या इंजिनाला
हिरवा झेंडा दाखवू लागले.
नाथा पुरे आता,म्हणण्याएवढे
राजकीय गणित शिकवू लागले.

आपल्या वर्मी बाण लागल्यावर
वाघ कसा स्तब्ध राहिल?
रिमोटवरच चालते युती,
त्यांचाच अंतिम शब्द राहिल !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, February 7, 2011

धुंदी आणि बंदी

टाळ्याला जीभ लावून
वाट्टेल ते बोलू शकता.
घालायची असेल तर
मिडीयावर बंदी घालू शकता.

आपलेच साम्राज्य,
साक्षीला ’सकाळ’ आहे !
दादागिरी आणि उर्मटपणाचा
उगीचच सुकाळ आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, February 6, 2011

ज्योतिषाची शास्त्रीयता

ज्योतिषाच्या नावाने
ओरडून काही फायदा नाही.
आता आमच्या पाठीमागे
पाठीराखा कायदा नाही.

कायद्याला विरोध करण्याचे
आमचे काय कारण आहे ?
न्यायप्रियतेच्या ओझ्याखाली
विवेकबुद्धी मात्र तारण आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, February 5, 2011

आरोपी नं.२

नंबर दोनच्या धंद्यात
नंबर एक सुटला जातो.
त्याच्या पापाचा घडा
दुसर्‍याच्या माथी फुटला जातो.

त्यामुळेच आभाळातून पडल्यासारखे
साठेबाज सापडले जातात !
गोडाऊन मालक सुरक्षित,
काउंटरवरचे झापडले जातात !!


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, February 4, 2011

भ्रष्टाचारी कवी

कवी फक्त कविताच नाही,
भ्रष्टाचारही करू शकतो.
देशातला सर्वात मोठा भ्रष्टाचारी
चक्क कवीच ठरू शकतो.

आमच्या या विधानाला
तुम्हांला पुष्टी हवी आहे ?
अटकेतला ए.राजा
हा तर मूळचा कवी आहे !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, February 2, 2011

जळजळीत सत्य

मनमाड जळीत प्रकरणामुळे
एक गोष्ट साफ आहे.
लोकांच्या मनात हळहळ
अधिकारी वर्गात थरकाप आहे.

लोकांमध्ये हळहळ असली तरी
अधिकार्‍यांविषयी माया नाही !
ज्यांचे जळते त्यांनाच कळते,
लाचखोरांविषयी दया नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, February 1, 2011

राजकीय भेसळ

तत्त्व,धोरण आणि निष्ठांची
सगळी मिसळामिसळ आहे.
आघाड्या आणि युत्या म्हणजे
राजकीय भेसळ आहे.

एकमेकांची अशुद्धता
आजकाल कुणाला जाचत नाही !
भेसळ अपरिहार्य झाल्याने
राजकीय शुद्धता पचत नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

दैनिक वात्रटिका19मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -286वा

दैनिक वात्रटिका 19मार्च2024....वर्ष- तिसरे.. अंक -286वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1-fbx6QEScldHj2QiABT650...