Showing posts with label limeric. Show all posts
Showing posts with label limeric. Show all posts

Friday, May 4, 2012

आवडता दुष्काळ


दुष्काळाचा फायदा घेत
पंप हात मारू लागले.
टँकर्सही चेष्टा करीत
आल्यासारखे करू लागले.

भलत्याच खुशीमध्ये
टँकर लॉबी आहे.
पिकांच्या आणेवारीपुढे
दुष्काळाची समस्या उभी आहे.

टंचाई असो वा दुष्काळ?
आलेली संधी सोडतो कोण?
दुष्काळ आवडे सर्वाना
नसल्या भानगडीत पडतो कोण?

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Saturday, April 28, 2012

पुरस्कारांची हौस



भारतरत्न पुरस्कार मिळालेलेही
गल्लीरत्नाला नाही म्हणत नाहीत.
देणारे देतात, घेणारे घेतात,
कुणालाच कुणी काही म्हणत नाहीत

एकदा भारतरत्न मिळाले की,
बाकी पुरस्कारांची गरजच काय आहे?
खर्‍या गरजवंतावरती
हा सरळ सरळ अन्याय आहे!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

Sunday, March 18, 2012

जातीचा 'राखीव' चमत्कार

कुणाच्या जातीवर जाऊ नये 
पण जातीची बातच आगळी असते.
दोन सख्ख्या भावांचीही
इथे जातच वेगळी असते.

एकाची जात एक असते,
दुसर्‍याची जात दुसरी असते!
जातीय चमत्कार असा की,
बापाची जात तिसरी असते!!


- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Tuesday, February 14, 2012

प्रेमसूत्र

प्रेमाच्या गावाकडे जाणारे
फाटेच फाटे असतात.
वर गुलाब फुलले तरी
खाली काटेच काटे असतात.

ना ट्वेंटी-ट्वेंटी, ना वन-डे,
प्रेम म्हणजे 'टेस्ट' असते!
तावून सुलाखून निघालेलेच
प्रेम ऑल दी बेस्ट असते!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Monday, September 5, 2011

पुरस्कार बोध


आदर्शाची निवड अशी की,
पुरस्कार मागायला लावतात.
कितीही नि:संशय झाले तरी
संशयाने बघायला लावतात.

आदर्श शिक्षक पुरस्कारांचा
वरचेवर विनोद होतो आहे!
खर्‍या आदर्शाचे हे काम नाही
दुर्दैवाने हाच बोध होतो आहे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Sunday, September 4, 2011

आदर्शाची आडवाट


नाकर्त्याला पुरस्कार,
कर्त्याला वनवास भोगावा लागतो.
आदर्श शिक्षक पुरस्कार
अक्षरश: मागावा लागतो.

आदर्श असून चालत नाही,
प्रामाणिकपणाही नडला जातो!
डाव-प्रतिडाव टाकले तरच
पुरस्कार पदरी पडला जातो!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Tuesday, August 9, 2011

भ्रमाचा भोपळा


सुशिक्षितांच्या घरामध्ये
जरी भोपळा हजर आहे.
तरीही त्यांना दृष्ट लागेल
अशी आमची नजर आहे.

घरातला भोपळाच
सगळे धाब्याला टांगतो आहे!
ज्याच्या त्याच्या अकलेचे मोजमाप
भोपळा बरोबर सांगतो आहे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Thursday, June 2, 2011

प्या आणि पाजा

एकविसला बियर,
पंचविसला दारू.
पेताडांनो पिताना
विचार नका करू.

ही वयाची अट आहे,
हा दारूचा भाव नाही !
सरकारी उदारतेपुढे
दारूबंदीचे नाव नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, June 1, 2011

नामांतर ते नामविस्तार

पुरूषप्रधान संस्कृतीचे वर्चस्व
अगदी गृहीत धरलेले असते.
लग्नानंतर स्त्रियांचे नामांतर
अगदी पक्के ठरलेले असते.

दोन-दोन आडनावे लावण्याचा
स्वाभिमानी स्त्रियांना मोह असतो !
राजकारणाप्रमाणे संसारातही
नामांतराच्या प्रसंगाला
नामविस्ताराचा शह असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, May 30, 2011

मोस्ट वॉंटेड

पाकिस्तानचा भारतद्वेष
अगदी गॅरंटेड आहे.
खरे तर अख्खा पाकिस्तानच
मोस्ट वॉंटेड आहे.

त्यामुळेच आपली यादी
नक्क्कीच चुकीची आहे !
पाकिस्तानची भूमिका तर
निव्वळ फेकाफेकीची आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, May 11, 2011

(रि) पब्लिकचा सवाल

शेळी होवून जगण्यापेक्षा
पॅंथर वाघाशी दोस्ती करू लागला.
आपली घटलेली किंमत
आणखीनच सस्ती करू लागला.

कालच्या आणि आजच्या भूमिकेत
खूप टोकाचे अंतर आहे !
पब्लिक विचारू लागली,
हाच का तो पॅंथर आहे ?

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, May 7, 2011

मोहन जोशी (ला)

सतीशने अकलेचे ’तारे’ तोडले,
मोहनही ’जोशी’ला आहे.
मराठी नाटकांचा तमाशाच
आजकाल नशीला आहे.

एकच प्याल्याचा मोह न पड्तो तर
पुढचा तमाशा घडला नसता !
अध्यक्षपदाचा अबलख घोडा
देशोदेशी उडला असता !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, May 2, 2011

एका लादेनचा अंत

लपाछपीच्या खेळात अखेर
लपणाराच हारला गेला.
ओसामा बीन लादेन
पुन्हा एकदा मारला गेला.

लादेनच्या मृत्यूबरोबरच
आणखी एक गोष्ट चांगली आहे !
पाकिस्तानची हरामखोरी
पुन्हा एकदा वेशीवर टांगली आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, April 27, 2011

वैचारीक उधारी

वर्गणी रोख,
विचार उधार असतो.
जयंतीच्या मंचाला
राजकीय आधार असतो.

प्रायोजकांची उधारी
वेळच्या वेळी चुकवावी लागते !
अवसान उसने असले की,
मान तर झुकवावी लागते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, April 16, 2011

भ्रष्टाचाराचे लॉजिक

कुणालाच वाटत नाही
आपले काही चुकले जाते.
त्यामुळेच जे पाहिजे ते
इथे ब्लॅकने विकले जाते.

दुसरे-तिसरे काही नाही
ही तर ’ब्लॅक-मॅजिक’ आहे !
ब्लॅकच्या देवाण-घेवाणीतच
भ्रष्टाचाराचे लॉजिक आहे !!

सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, March 9, 2011

महिला-मुक्ती

महिला मुक्तीच्या धोरणाची
घरा-घरात भक्ती केली जाते.
जन्माला येण्याअगोदरच
कायमची मुक्ती दिली जाते.

महिला मुक्तीच्या धोरणाची
घराघरात विकृत तर्‍हा आहे !
मुक्तात्मे म्हणत असतील,
इथे जन्म न घेतलेलाच बरा आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, February 20, 2011

भविष्याचा अंदाज

जेंव्हा कधी एकत्र
भगवा आणि निळा असेल.
तेंव्हा कार्यकर्त्यांच्या कपाळी
जांभळ्या रंगाचा टिळा असेल.

निळा+भगवा=जांभळा
ही तर निसर्गाची जादू आहे !
येणारा काळच सांगेल
कोण किती संधीसाधू आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, February 19, 2011

होम-क्रिकेट

पोरांची बॅटींग जोरदार,
त्यांचा रन मागे रन असतो.
आईची फिल्डिंग ढिल्ली,
बाप तर ’नाईट वॉचमन’ असतो.

घरातल्या घरामध्ये
असे क्रिकेटचे मॅच होतात !
पिचचा अंदाज आला नाही की,
पोरांचे मग कॅच जातात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, February 16, 2011

प्रेमाचा गुलकंद

व्हॅलेंटाईन डे काही
त्याच्या मनासारखा गेला नाही.
त्याच्या एकाही गुलाबाचा
कुणीच स्विकार केला नाही.

” मत रो मेरे दिल ” असे म्हणत
आपले अश्रू रोखत असतो !
हल्ली नाकारलेल्या गुलाबाचाच
तो गुलकंद चाखत असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

दुष्काळी पाहुणचार ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- दुष्काळी पाहुणचार दुष्काळ पाहणी दौरा बघून, आमचे मतही ठाम झाले. एकाचा पाहुणचार करताना, दुसरेच हकन...