Monday, November 30, 2009

अहवालांचे नशिब

***** आजची वात्रटिका *****
**********************

अहवालांचे नशिब

चौकशी अहवालांचा काळ
हमखास वाढवला जातो.
एकाने दडवला जातो,
दुसर्‍याकडून फोडला जातो.

वाढणे,दडणे आणि फोडणे
हे आयोगाच्या भाळी असते !
आ वासून बघण्याची
जनतेवरती पाळी असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

प्रगतीचे राजमार्ग

***** आजची वात्रटिका *****
***********************

प्रगतीचे राजमार्ग

मिंधेजी व्हा,लाचारेश्वर व्हा,
प्रगतीचे मा्र्ग खुले होतील.
तुमच्यावरच्या टिकांचे
आपोआप मग फुले होतील.

कणा मोडलेला असतानाही
देखाव्यापुरते ताठ व्हा.
तुमचे पोवाडे ऐका्यचे तर
तुम्ही दु्सर्‍याचे भाट व्हा.

खर्‍याचे काहीच खरे नसते
खोटेपणा करता आला पाहिजे !
नाक घासता घासताच
लाळघोटेपणा करता आला पाहिजे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Saturday, November 28, 2009

सारेच ’स्मिता’स्पद

***** आजची वात्रटिका *****
*********************

सारेच ’स्मिता’स्पद

घर फिरले की,
घराचे वासे फिरू लागतात.
एकाने काही केले की,
दुसरेही तसे करू लागतात.

आंधळ्या कोशिंबिरीचाच
सगळा हा खेळ आहे !
भाऊबंदकीच्या राजकारणात
ही ’स्मिता’स्पद वेळ आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

बळीच्या बकर्‍याचे मनोगत

***** आजची वात्रटिका *****
*********************

बळीच्या बकर्‍याचे मनोगत

हा निव्वळ योगायोग
माझ्यात खूप मांद आहे.
त्यांना खुणावतोय तो
माझ्या माथीचा चांद आहे.

सार्‍यासोबत मीसुद्धा
शेवटी अल्लास प्यारा होईल !
हजारोंची देऊन कमाई
माझा मरणसोहळा न्यारा होईल !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

हल्ला-गुल्ला

***** आजची वात्रटिका *****
*********************

हल्ला-गुल्ला

पत्रकारच पत्रकारितेला
पाण्यात पाहू लागले.
वैयक्तिक शत्रूत्त्वावरून
पत्रकारितेवर हल्ले होऊ लागले.

शत्रूने शत्रूवर केलेला हल्ला
पत्रकारितेवरचा हल्ला नसतो !
हाती डफडे असल्यामुळे
उगीचच आपला कल्ला असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Friday, November 27, 2009

ॠणमुक्ती

***** आजची वात्रटिका *****
*********************

ॠणमुक्ती

चांगली भाषणं झॊडली म्हणजे
आपण देशभक्त होत नाही.
फक्त श्रद्धांजल्या वाहून
आपण ॠणमुक्त होत नाही.

देशभक्ती प्रासंगिक नको
ती मनामनात भिनली पाहिजे !
ती दाखवायची गरज नाही
बघणार्‍यांनी जाणली पाहिजे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Thursday, November 26, 2009

ज्वाला बने ज्योती

***** आजची वात्रटिका *****
*********************

ज्वाला बने ज्योती

२६/११ नंतर पेटलेली
ती आग,आग राहिली नाही.
तेंव्हा जी आली होती
ती जाग,जाग राहिली नाही.

हा महिमा काळाचा की,
आम्हीच विसराळू आहोत?
आम्हांस ना देणे-घेणे कशाचे
आम्ही फक्त दिवसपाळू आहोत?

त्या लवलवत्या ज्वालांच्या
पुन्हा ज्योती झाल्या आहेत.
नका करू कुणी खुलासे,
सार्‍या गोष्टी ध्यानी आल्या आहेत.

झटका भोवतालची राख
आतले निखारे धगधगु द्या !
दुश्मनांची हिंमत होईल कशी?
त्यांना हे निखारे बघू द्या !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)

Wednesday, November 25, 2009

चौकशी अहवाल

***** आजची वात्रटिका *****
***********************

चौकशी अहवाल

नवर्‍यावर विश्वास नसतो,
बाकी जगाचा मात्र आदर करते.
नवर्‍याच्या चौकशी अगोदरच
बायको कृती अहवाल सादर करते.

बायकोचा एकसदस्यीय आयोग
तसा पूर्वग्रह्दुषित असतो
ठरवून काढलेले निष्कर्ष
नवरा बिचारा सोशित असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, November 24, 2009

चुकीचा संदेश

***** आजची वात्रटिका *****
******************* **

चुकीचा संदेश

जिवंत समाधी घेणे
ही संतपदाची अट असू नये.
कुणी समाधी घेतली की,
त्याचे संतपद घट असू नये.

एकाचे पाहून दुसरा
जिवंत समाधी घेऊ शकतो !
कुणाची इच्छा नसली तरी
चुकीचा संदेश जाऊ शकतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

मुद्दयाची गोष्ट

***** आजची वात्रटिका ******
************************

मुद्दयाची गोष्ट

राजकारण्यांची जातच
नको तेवढी चाभरी असते.
कधी चर्चेत मंदिर,
कधी चर्चेत बाबरी असते.

जीवन-मरणाचे प्रश्न
बाजूला ठोकरले जातात !
राजकीय डावपेच म्हणून
सोयीचे मुद्दे उकरले जातात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Monday, November 23, 2009

स्त्रीमुक्तीची व्याख्या

****** आजची वात्रटिका *****
***********************

स्त्रीमुक्तीची व्याख्या

नवर्‍यापासून मुक्त होण्यालाच
आज स्त्रीमुक्ती म्हटले जाते.
त्रासलेले नवरे भेटले की,
अनुभवाने अधिक पटले जाते.

स्त्रीमुक्तीबरोबर पुरूषमुक्तीचीही
आंदोलने उभी राहू लागली.
आमच्यासारख्या बघ्यांची तर
आयती करमणूक होऊ लागली.

फक्त नवर्‍यालाच नाही तर
परंपरेलाही नाकारायचे आहे !
मुक्त होणे म्हणजे तरी काय?
जे चांगले ते स्विकारायचे आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Sunday, November 22, 2009

रामशास्त्री ते दामशास्त्री

***** आजची वात्रटिका *****
**********************

रामशास्त्री ते दामशास्त्री

लोकशाहीचे आधारस्तंभ
पैशाला पासरी आहेत.
रामशास्त्री सांगु लागले,
आमच्यातच दामशास्त्री आहेत.

याचेच शास्त्रीय विश्लेषण
रामशास्त्री करायला लागले !
लेखणी नावाचे शस्त्र
बुमरॅंग ठरायला लागले !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Saturday, November 21, 2009

महानगर ते आयबीएन

***** आजची वात्रटिका *****
************************

महानगर ते आयबीएन

तेंव्हा घडले,आताही घडले
पुन्हा तेच सगळे आहे.
पत्रकारितेच्या हल्ल्यातले
फक्त माध्यम वेगळे आहे.

असल्या भ्याड विकृतीला
विचारांनीच झुकवायला हवे !
ठोकशाहीशी झुंजताना
आपल्याही आत डोकवायला हवे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Friday, November 20, 2009

२६/११ ते २०/११

***** आजची वात्रटिका *****
**********************

२६/११ ते २०/११

कुणाचाही कुणावर असो
शेवटी हल्ला हा हल्ला असतो.
आपण गप्प बसलो की,
भ्याडांचा असा पल्ला असतो.

हेही खरे की,
करावे तसे भरावे लागते.
दु:ख याचे की,पत्रकारालाच
हल्ल्याचे समर्थन करावे लागते.

विचारांनीच विचारांना
निश्चितपणे मारले पाहिजे !
आता पत्रकारांनीच
पत्रकारितेला तारले पाहिजे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Thursday, November 19, 2009

कपड्यांचे कुर्बान

***** आजची वात्रटिका *****
********************************

कपड्यांचे कुर्बान

पोस्टरवरुनच प्रश्न पडतो
पुढून कसे दिसत असेल?
जशी ज्याची नजर आहे
त्याला तसे दिसत असेल.

आपण बघतो;त्या दाखवतात,
लज्जेने नजर चोरली पाहिजे !
करिनाच्या उघड्या पाठीवर
कौतुकाची थाप मारली पाहिजे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

माकडमेवा

****** आजची वात्रटिका *****
**********************

माकडमेवा

सरकारी कार्यालयात
सामान्यांचे खिसे कापले जातात.
गांधी बाबांची माकडं होऊन
हितसंबंध जपले जातात.

कान,डोळे आणि तोंड
यांच्यावरती हात असतात !
टोळ्या-टोळ्यांनी माकडं
सरकारी मेवा खात असतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड).

Tuesday, November 17, 2009

स-माजवादी सत्कार

***** आजची वात्रटिका *****
**********************

स-माजवादी सत्कार

मुंबईत बेतालपणा,
लखनौ मध्ये गरळ आहे.
खाजवून खरूज काढल्याचा
अर्थ तर सरळ आहे.

भाषॆच्या नावावरती
विषारी फुत्कार केला गेला.
केवळ एका शपथेसाठी
जाहिर सत्कार केला गेला.

हा केवळ सत्कार नाही,
हे तर आगीत तेल आहे !
जे विकले जाते,
त्याचाच जहिर सेल आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

नोबॉल आणि फ्री ही्ट

***** आजची वात्रटिका *****
*********************


नोबॉल आणि फ्री ही्ट

सचिनचा योग्य चेंडूही
नोबॉल ठरवला गेला.
आंतर्राष्ट्रीय लौकिकही
राजकारणात हरवला गेला.

दोघांत सामना सुरू
तिसर्‍यावरती फ्री हीट आहे !
मराठीच्या संकुचितपणाचा
मराठी मनास विट आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Monday, November 16, 2009

व्होट बॅंक ऑफ मराठी

***** आजची वात्रटिका ****
*********************

व्होट बॅंक ऑफ मराठी

आपणच मराठीचे रक्षक
सैनिकांचे स्वत:कडे बोट आहे.
मराठीचा मुद्दा म्हणजे
जणू बॅंक ऑफ व्होट आहे.

सैनिकांच्या आंदोलनावरती
फार्सच्या शंका-कुशंका आहेत !
आता सैनिकांच्या टार्गेटवरती
रेल्वेनंतर बॅंका आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Sunday, November 15, 2009

नट्यांचे कपडे

***** आजची वात्रटिका *****
**********************

नट्यांचे कपडे

वरून खालीच नाही तर
खालुनही वर सरकू लागल्रे.
फॅशनच्या नावाखाली
नको नको तिथे टरकू लागले.

घालाणार्‍यांना नसली तरी
बघणार्‍यांना लज्जा वाटते आहे !
कुणाचे चेहरे आंबट तर
कुणाला फुकटची मज्जा वाटते आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

सांघिक निष्कर्ष

***** आजची वात्रटिका *****
*********************

सांघिक निष्कर्ष

पराभवाच्या कारणांचे
आत्मचिंतन रंगलेले आहे.
सांघिक निष्कर्ष निघाला
भाजपाचे घर दुभंगलेले आहे.

सर्जरीच्या सूचनेनंतर
हा मूळावरतीच घाव आहे !
टिकेची हौस भागवता भागवता
मिशीवरतीही ताव आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, November 14, 2009

पालकांसाठी.....

****** आजची वात्रटिका *****
***********************

पालकांसाठी.....

मुलांना बडवणे म्हणजे
मुलांना घडवणे नाही.
आपली स्वप्ने लादून
त्यांची उर्मी दडवणे नाही.

मुलांत मूल होऊन
मुलांना मुलवता यावे.
आकाशाची उंची दाखवून
मुलांना फुलवता यावे.

मुले रेसचे घोडे नाहीत
त्यांची दौड करू नका !
मुलांना मुलेच राहू द्या
त्यांना अकाली प्रौढ करू नका !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Thursday, November 12, 2009

विधानसभेची दैनंदिनी

***** आजची वात्रटिका *****
*********************

विधानसभेची दैनंदिनी

कधी यांचे सैनिक असतात,
कधी त्यांचे सैनिक असतात.
गोंधळाचे कर्यक्रम तर
विधानसभेत दैनिक असतात.

इतरांसाठी गोंधळ,
त्यांच्यासाठी त्या लढाया आहेत !
कुणी हारले नाही तरी
त्यांच्या जिकल्याच्या बढाया आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, November 11, 2009

बाळ-बुद्धी

***** आजची वात्रटिका *****
*********************

बाळ-बुद्धी

शपथेनंतर आता
वेगळीच आफत आहे.
बाळबुद्धीच्या उल्लेखाने
वातावरण तापत आहे.

न लागलेली चापटही
कानठाळीत बसली आहे !
नको नको त्यांचीही
बाळबुद्धी दिसली आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, November 10, 2009

अस्मितेचे नवनिर्माण

अस्मितेचे नवनिर्माण

कुणीही इथे येऊन
आज मी मी करतो आहे.
प्रादेशिक अस्मिता बाळगणे
हाही देशद्रोह ठरतो आहे.

पण मूळ मुद्दा सोडून
नको तो मुद्दा फोकस होवू नये !
आपल्या अस्मितेचाही
चूकुनसुध्दा आकस होवू नये !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

हाय अल्ला ‍ऽऽ

***** आजची वात्रटिका *****
**********************

हाय अल्ला ‍ऽऽ

आता मात्र पाकिस्तानची
खरोखरच कीव आहे.
अतिरेक्यांनी दाखवून दिले
पाकिस्तानचा केवढूसा जीव आहे.

वैर्‍याच्याही वाट्याला
असले दिवस येऊ नयेत !
आत्मघाती निर्णय
कधी चुकूनही घेऊ नयेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Monday, November 9, 2009

अशी ही खपवाखपवी

***** आजची वात्रटिका *****
**********************

अशी ही खपवाखपवी

भगवा खांद्यावर घेणारा
मराठी माणुस गुणाचा आहे.
पाठेत खुपसला खंजिर ज्याने
तो अग्रलेख कुणाचा आहे ?

माहित असले तरी
त्यास लपवू लागले !
कुणीही कुणाच्या नावावर
हल्ली अग्रलेख खपवू लागले !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Sunday, November 8, 2009

खाते वाटप

***** आजची वात्रटिका *****
**********************

खाते वाटप

जनतेपेक्षा नेतृत्वाशी
जशी जशी नाती असतात.
तशी तशी पदरात
मंत्रीपदाची खाती असतात.

पक्षीय दृष्टीकोन तर
सांगायला विहंगम असतो !
नात्या-गोत्या-खात्याचाच
खरा त्रिवेणी संगम असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Saturday, November 7, 2009

तोल मोल के बोल

***** आजची वात्रटिका *****
**********************

तोल मोल के बोल

मोबाईलच्या तालावर
लोक डॊलायला लागले.
अगदी सेकंदाच्या भावाने
लोक बोलायला लागले.

जरी बडबड कमी होऊन
आता दूरसंवाद वाढतो आहे !
तरी माणसापासून माणुस
मोबाईल हळुहळू तोडतो आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Thursday, November 5, 2009

सचिन नावाचा हिमालय

***** आजची वात्रटिका *****
***********************

सचिन नावाचा हिमालय

काढलेल्या प्रत्येक धावेला
विक्रमाचेच रूप घ्यावे लागते.
हे ऐर्‍या-गैर्‍याचे काम नाही
त्याला सचिनच व्हावे लागते.

सचिन बनणे सोपे असते,
सचिन म्हणून टिकता आले पाहिजे !
मास्टर-ब्लास्टर असूनही
रोज नवे शिकता आले पाहिजे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

सचिन नावाचा हिमालय

***** आजची वात्रटिका *****
***********************

सचिन नावाचा हिमालय

काढलेल्या प्रत्येक धावेला
विक्रमाचेच रूप घ्यावे लागते.
हे ऐर्‍या-गैर्‍याचे काम नाही
त्याला सचिनच व्हावे लागते.

सचिन बनणे सोपे असते,
सचिन म्हणून टिकता आले पाहिजे !
मास्टर-ब्लास्टर असूनही
रोज नवे शिकता आले पाहिजे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

वंदे मातरम

***** आजची वात्रटिका *****
**********************

वंदे मातरम

काही काही किडे
मुद्दाम डोक्यात सोडले जातात.
कुणी मानीत नसले तरी
उगीच फतवे काढले जातात.

सच्चा राष्ट्रप्रेमी
लावालावीला फसू शकत नाही !
देशापेक्षा मोठे
दुसरे काहीच असू शकत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, November 4, 2009

विजयी पराभव

***** आजची वात्रटिका *****
**********************

विजयी पराभव

निवडून आले म्हणजे जिंकले
या विधानात फारसे तथ्य नाही.
जी आकडेवारी मिरवली जाते
तिच्यातही फारसे सत्य नाही.

लोकशाहीत पद्धत म्हणून
हे असत्य स्विकारलेले आहे !
विरोधकांच्या मतांची बेरीज सांगते
त्यांना बहूमताने नाकारलेले आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

दक्षता सप्ताह

***** आजची वात्रटिका *****
**********************

दक्षता सप्ताह

सरकारी कार्यालयात
दक्षता सप्ता चालु असतो.
कार्यालयात देणे-घेणे बंद
घरी हप्ता चालु असतो.

दरवर्षी घेतलेली शपथ
आठवड्यानंतर मोडली जाते !
जशी दारूड्यांकडून दारू
वेळोवेळी सोडली जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Monday, November 2, 2009

एका गारूड्याचे मनोगत

***** आजची वात्रटिका *****
**********************

एका गारूड्याचे मनोगत

भोंदूबाबा आणि आमच्यात
असा कोणता फरक आहे ?
त्यांच्या वाट्याला स्वर्ग
आमच्या वाट्याला नरक आहे.

असे का म्हणून आम्ही
कधीच कुणाशी भांडत नाहीत !
हातचलाखीच्या जीवावर
धर्माचा बाजार मांडत नाहीत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

विधानसभेच्या ’वित्तं’ बातम्या

***** आजची वात्रटिका *****
************************

विधानसभेच्या ’वित्तं’ बातम्या

डोळे मिटून मांजरी
दूध पित होत्या.
बोक्यांच्या जाहिराती
प्रायोजित होत्या.

इलेक्शन स्पेशलचे
कव्हरेज पॅक होते.
बाजारबसवीपेक्षाही
यांचे धंदे झ्याक होते.

जिने बोंबाबोंब करायची
तीच तर मुकी होती !
पिवळीजर्द पत्रकारीता
हिच्यापुढे फिकी होती !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Sunday, November 1, 2009

भक्तीपुराण

***** आजची वात्रटिका *****
**********************

भक्तीपुराण

राजकारण्यांना नेहमीच
मागे कुणी तरी उभा लागतो.
अध्यात्माचे सोंग आणण्यासाठी
मागे कुणी तरी बाबा लागतो.


जेवढे भक्त मोठे,
तेवढा गुरु मोठा होत जातो.
भोवती पाळीव प्राणी जमताच
मठाचाही गोठा होत जातो.

आंधळे भक्त,आंधळी भक्ती
मेंदूचीही जागा मोकळी होते !
हवेतून आंगठीच काय ?
थेट सोन्याची साखळी येते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

दैनिक वात्रटिका19मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -286वा

दैनिक वात्रटिका 19मार्च2024....वर्ष- तिसरे.. अंक -286वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1-fbx6QEScldHj2QiABT650...