Saturday, December 31, 2011

लोकपाल भूमिका

कुणाला हवे, कुणाला नको,
कुणाचा तोंडावरती हात आहे.
दुरून मज्जा बघणारांमुळेच
घोडे पेंड खात आहे.

कोणती तरी भूमिका घ्या
भूमिकेला कुठे मना आहे?
ज्याला तटस्थपणा समजता
तो तर भित्रेपणा आहे!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

भ्रमनिरास

हे म्हणतात, त्यांनी येऊ दिले नाही
ते म्हणतात, यांनी येऊ दिले नाही.
येणार येणार म्हणता म्हणता
लोकपाल काही आले नाही.

आमच्या भाबडय़ा आशेचा
राज्यसभेत चक्काचूर झाला !
हे बुद्धिवंतांचे सभागृह आहे
आमचा ग्रह दूर झाला !!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Wednesday, December 28, 2011

रास्त अपेक्षा

कुणाला सशक्त वाटले,
कुणाला अशक्त वाटले.
लोकपाल पाहिजे म्हणता म्हणता
अण्णांचे रक्त आटले.

लोकशाहीचे पाविर्त्य जपा
अजून कुणाचे रक्त आटवू नका!
संविधानाची शपथ आहे
संसदेला पुन्हा बाटवू नका!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Tuesday, December 27, 2011

पुतण्यांचे बंड

काका कोणताही असो
त्याच्यावर प्रसंगच बाका आहे.
काकाला पुतण्यापासून
अगदी हमखास धोका आहे.

हातच्या काकणाला
आरसा कशाला पाहिजे?
पुतणे विचारू लागले,
मुलगा आणि मुलगीकडेच
वारसा कशाला पाहिजे?

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)

वरळी ते परळी

तिकडे काका आडवे होते,
इकडेही काका आडवे आहेत.
तिकडेही भोवती बडवे होते
इकडेही भोवती बडवे आहेत.

तिकडे बडव्यांविरुद्ध बंड होते,
इकडेही बडव्यांविरुद्ध बंड आहे!
परळी काय? वरळी काय?
एकच राजकीय पिंड आहे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Sunday, December 25, 2011

तिची ओळख

अमक्याची पत्नी, तमक्याची आई,
एवढीच तिची ओळख आहे.
महिला आरक्षणाच्या नावाने
अजून तरी काळोख आहे.

आरक्षणाच्या खेळामध्ये
तिला प्यादी म्हणून खेळवले जाते!
पुरुषी वर्चस्वाचे समाधान
लोकशाही मार्गानेही मिळवले जाते!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

राजकीय उदारीकरण

चांगली ऑफर असेल तर
मुळीच टाळली जात नाही.
पक्षीय स्पृश्य-अस्पृश्यता
मुळीच पाळली जात नाही.

नव्या पिढीचे, नव्या घडीचे
हेच तर धोरण आहे!
नव्या राजकीय परिभाषेनुसार
हे राजकीय उदारीकरण आहे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Saturday, December 24, 2011

लोकपालची चाहूल

लोकशाहीचे मारेकरी
थरथर कापायला लागले.
लोकपालाच्या चाहुलीनेच
लोकशाही जपायला लागले

लोकपाल विधेयकापासून
भ्रष्टाचार्‍यांचा पळ आहे!
हा लोकशाहीचा कळवळा नाही,
केलेल्या पापाचे फळ आहे!!-

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Friday, December 23, 2011

भारतरत्नाची दक्षता

भारत रत्नाच्या नियमावलीत
काहीही घुसवणे बरे नाही.
कुणाच्याही रांगेत
कुणालाही बसवणे बरे नाही.

भारतरत्नाची खिरापत
जर कुणालाही वाटली जाईल!
तर पूर्वीच्या भारतरत्नाची
किंमत नक्की घटली जाईल!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

आशावाद

कुणी झाले शरमिंदे,
कुणी रागाने लाल झाले.
हो...नाही...म्हणता म्हणता
अखेर लोकपाल आले.

कुठे माशी घोटाळेल,
कुठे माशी शिंकली जाईल !
रस्त्यावरची लढाई मात्र
संसदेतच जिंकली जाईल !!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

आधुनिक महाभारत

गोंधळून जायचा प्रसंग
गोपीनाथांवर बेतला आहे.
धनंजयाने तर म्हणे
झोपेत दगड घातला आहे.

कौटुंबिक महाभारत
रंगता रंगता रंगले आहे!
कुणी कुणाला गीता सांगायची?!!
न सांगितलेलेच चांगले आहे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Wednesday, December 21, 2011

'राज'कीय भूमिका

सीमावासीय राहिले बाजूला
मनसेच स्टार झाली.
'आहे तिथेच सुखाने राहा'
याचीच चर्चा फार झाली.

उपहास की उपरोध?
की हे शाब्दिक व्यंग आहे?
हीच राजकीय भूमिका असेल तर
हा अस्मितेचा मान भंग आहे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Tuesday, December 20, 2011

संमेलनाध्यक्ष निवड

कुणाला वाटले तर वाटू द्या
आमचे नेहमीच वाकडय़ात आहे
पण बारा कोटीच्या मराठीची
मतदार संख्या शेकडय़ात आहे

शेकडय़ांनी निवडलेला
कोटीवरती लादला जातो
घाणेरडे राजकारण करून
डाव बरोबर साधला जातो

प्रक्रिया सुधारली पाहीजे
निवडणूकीनंतरच बोलले जाते!
अध्यक्षपद पटकावले की,
तोंड बरोबर खोलले जाते!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

घोडे आणि बाजार

कुणी करतो जुळवाजळव,
कुणी नोटा मोजित असतो
सत्तास्थापनेच्या मुहूर्ताला
घोडेबाजार तेजीत असतो

घोडे जेवढे उधळतील
तेवढा माल द्यावा लागतो!
राजकीय रस्सीखेच अशी की,
नालीसाठीही घोडा घ्यावा लागतो!!-

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Friday, December 2, 2011

खड्डय़ांची 'डाग'डुजी

डांबरटपणा करून
रस्त्यांना सजवू लागले.
विचारल्यानंतर कळाले,
खड्डय़ांना बुजवू लागले.

खड्डे बुजले नाहीत
खड्डे केवळ झाकले आहेत!
आधीच बरबटलेले हात
पुन्हा नव्याने माखले आहेत!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

बंडखोरीचा अर्थ

आपल्या आणि परक्या बंडखोरांना
वेगवेगळा न्याय असतो.
पक्षीय बंडखोरीचा अर्थ
वेगवेगळा नाहीतर काय असतो?

दुसर्‍यासाठी पायघडय़ा घालतात,
आपल्यावरती शिस्तभंग असतो!
पक्षीय बंडखोरीला,
असा आवडीचा रंग असतो!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

बिहार पॅटर्न .... मराठी वात्रटिका

  आजची वात्रटिका --------------------- बिहार पॅटर्न जसे कर्म तसे फळ, हे लगेच प्रत्यक्षात आले. महाराष्ट्रात जे कमावले, ते बिहारमध्ये गमावले ग...