Monday, February 28, 2022

विज्ञान - प्रदर्शन... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

विज्ञान - प्रदर्शन

विज्ञानाचे प्रदर्शन होते,
पण दर्शन होताना दिसत नाही.
विज्ञान गिरवून आणि मिरवून,
वैज्ञानिक दृष्टिकोन मात्र,
फारसा येताना दिसत नाही.

बोले तैसा चाले,
हीच खरी विज्ञाननिष्ठता आहे.
तोच करू शकतो चिकित्सा,
जिथे वैचारिक स्पष्टता आहे.

विज्ञान सर्वव्यापी आहे,
विज्ञान म्हणजे सृष्टी आहे!
त्याची नजरबंदी शक्य नाही,
ज्याच्याकडे वैज्ञानिक दृष्टी आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6423
दैनिक पुण्यनगरी
28फेब्रुवारी 2022

 

चोर बाजार.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

चोर बाजार

आयत्या पिठावर रेघोट्या,
चोरटे कवी मारतात इथे.
कवितेसारख्या कविता,
भुरटे कवी करतात इथे.

वाचकांना कळत नाही,
कोणती कविता खरी आहे?
केवळ शब्दांची चोरी नाही,
प्रतिभेची चोरी आहे.

चोरलेल्या प्रतिभेवरती,
चोरट्यांची प्रतिमा आहे !
भल्या भल्या कवी लोकांचा,
चोरट्यांकडून मामा आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7856
दैनिक झुंजार नेता
28फेब्रुवारी 2022

 

Sunday, February 27, 2022

थेअरीचे प्रॅक्टिकल...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

थेअरीचे प्रॅक्टिकल

जरी ज्ञानभाषा झाली नाही,
अभिजात भाषा झाली नाही.
तरी गौरवाने सांगतो,
मराठी भाषा मेली नाही.

मराठी भाषा मेली नाही,
मराठी भाषा मरणार नाही.
तुम्ही आम्ही कुपुत्र आहोत,
जोपर्यंत काही करणार नाही.

सैद्धांतिक मांडणी होईलही,
त्याला प्रात्यक्षिकाची जोड पाहिजे!
मराठीचा फक्त पुळका नको,
मराठीची आंतरिक ओढ पाहिजे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7855
दैनिक झुंजार नेता
27फेब्रुवारी 2022

 

मराठमोळी अपेक्षा... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

मराठमोळी अपेक्षा

माय मराठी उजळावी म्हणून,
फक्त एकदिवसीय टेंभा नको.
अगदी बेंबीच्या देठापासून,
फक्त एकदिवसीय बोंबा नको.

एकदिवसीय गाथा गाऊन,
राजा, एरव्ही मात्र हाल नकोत.
इंग्रजीच्या आरत्या खुशाल गा,
मराठीसाठी फुगीर गाल नकोत.

मराठीचा उत्सव जरुर व्हावा,
पण त्यातून काही सुदबुध येवो !
माय मराठी अभिजात होईलच,
माय मराठी वाघिणीचे दूध होवो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269

 

मी मराठी, सही मराठी


 

Saturday, February 26, 2022

' ईडी ' चे व्याकरण...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

' ईडी ' चे व्याकरण

चौकशीच्या भूताने झपाटताच,
नको नको तो आळ येवू लागतो.
एकदा मागे ' ईडी ' लागले की,
वर्तमानाचा भूतकाळ होवू लागतो.

क्रिया- पद भूतकाळी होताच,
भविष्यही धोक्यात येऊ लागते !
चालत चालत ' ईडी ' चे व्याकरण,
बरोबर डोक्यात येवू लागते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7854
दैनिक झुंजार नेता
26फेब्रुवारी 2022

 

लोकशाही वाचवा...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
लोकशाही वाचवा
हा विनोद पचायला जड नाही,
हा विनोद हलका फुलका आहे.
लोकशाही वाचवा;
लोकशाही वाचवा,
असा सर्वपक्षीय गलका आहे.
खरे तर ही शोकांतिका आहे,
बघा विरोधाभास कसा आहे?
लोकशाहीच्या गळ्यात,
त्यांच्याकडूनच फासा आहे.
ज्यांच्या हाती लोकशाहीचा ससा,
आज तेच तर खरे पारधी आहेत !
जे मारतात उलट्या बोंबा,
आज तेच तर खरे गारदी आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6421
दैनिक पुण्यनगरी
26फेब्रुवारी 2022

 

Friday, February 25, 2022

लोक वर्तन... मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
----------------------------

लोक वर्तन

एकदा पद आले की,
त्याच्या पाठोपाठ प्रतिष्ठा येते.
चेले आणि झेले येतात,
त्यांच्या पाठोपाठ निष्ठा येते.

वाल्याचा होतो वाल्मिकी,
झाले गेले विसरू लागतात!
काल टिंगल-टवाळी होती,
आज पदर पसरू लागतात.

बदललेले लोकवर्तन,
हा मुद्दा जरी वादाचा असतो!
हा सगळा प्रभाव मात्र,
प्रतिष्ठा आणि पदाचा असतो!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7853
दैनिक झुंजार नेता
25फेब्रुवारी 2022

दैनिक वात्रटिका25एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 25एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -323 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Lj6fYs7HXzulsl3-eEaC...