Wednesday, October 26, 2011

दीपोत्सवाची अपेक्षा

दिवा दिपून ठेवावा
दिवा जपून ठेवावा.
दिव्या-दिव्याच्या तेजाने
दिवा आतला तेवावा.

तेवत्या दिव्यांनी
मग तेवते व्हावे.
अंधाराच्या दिशेने
त्यांनी धावते व्हावे.

जेव्हा उजळेल आकाश
उजळता प्रकाश दिसावा!
उजळत्या दीपोत्सवात
आपलाही दिवा असावा!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Tuesday, October 18, 2011

मौनाची भाषा

जे बोलून साधता येत नाही
ते मौनाने साधता येते.
मौनाची बाधाच अशी की
न बोलताही बाधता येते.

कुणी केले बंद कान
तेही उघडण्याची आशा असते
बहिर्‍यासही ऐकू येते
अशी मौनाची भाषा असते!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Saturday, October 15, 2011

यादी भावी पंतप्रधानांची

कुणी वादी आहे,
कुणी प्रतिवादी आहे.
भावी पंतप्रधानांची
आपल्याकडे यादीच यादी आहे.

एकाने नाव जाहीर केले की,
दुसर्‍याच्या काळजात घर पडते आहे!
त्यामुळे भावी पंतप्रधानांच्या यादीत
रोज नव्याने भर पडते आहे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Friday, October 14, 2011

आरक्षणाचा ड्रॉ

ऐका हो ss ऐका ss
आरक्षणाची गंमत ऐका.
जिथे नवरोबा उत्सुक
तिथे उभ्या राहणार बायका.

पदराआडचे राजकारण खेळून
नथीतून तीर मारावे लागतील!
गुडघ्याचे बाशिंग बायकोला बांधून
बुजगावणे उभे करावे लागतील!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Tuesday, October 4, 2011

भाऊराव ते खाऊराव

आजची वात्रटिका
_------------

भाऊराव ते खाऊराव

भाऊरावांचा महाराष्ट्र
खाऊरावांचा झाला आहे.
याचाच तर पडताळा
पटपडताळणीत आला आहे.

आम्हाला काय कुणाची भीती?
शिक्षणसम्राटांचा तोरा आहे!
शिकवा आणि कमवा
संस्थाचालकांचा नारा आहे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

daily vatratika...19march2024