Sunday, August 2, 2009

मैत्री : एक शोध

मैत्री : एक शोध

जेंव्हा जीवाचं शिवाला,
रंकाचं रावाला,
भक्ताचं देवाला,
न सांगताही कळलं जातं.
तेंव्हाच आपोआप...
मैत्रीचं नातं जुळलं जातं.

मैत्री मैत्री असते,
मैत्री जन्मदात्री असते,
मैत्री म्हणजे खात्री असते,
मैत्री म्हणजे पत्रापत्री असते,
मैत्री म्हणजे,
कधी तीची,कधी त्याची,
भर पावसात,
उन्हाळ्याच्या दिवसात,
दोघांत....
फक्त एकच छत्री असते.

मैत्री म्हणजे लुकलुकणारं चांदणं,
मैत्री म्हणजे हातावरचं गोंदणं,
मैत्री म्हणजे मना-मनातल्या
तणाचं वेळोवेळी निंदणं !
मैत्री म्हणजे,
एकमेकांच्या कुशीत स्फुंदनं !!

मैत्री रडवते,
मैत्री हसवते,
मैत्री सांगुन फसवते,
मैत्री मना-मनात नवा स्वर्ग वसवते !!

मैत्री विहिरीतला पारवा,
मैत्री रानातला सरवा,
मैत्री उन्हातला गारवा,
मैत्री मिसळीतला झणझणीत शरवा !!

राधेचा संग असते मैत्री,
मीरेचा रंग असते मैत्री,
द्रौपदीचे न उलगडलेले
गुढ अंग असते मैत्री.
सुदाम्याच्या किड्क्या पोह्या्त
कधी गुंग असते मैत्री.
कधी कर्ण दुर्योधनाच्या
प्रेमात दंग असते मैत्री.

मैत्री क्षणभर टेकायला हक्काचं स्थळ देते,
मैत्री लागेल एवढी कळ देते,
मैत्री जगायला आभाळाएवढं बळ देते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

केविलवाणी अवस्था...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------- केविलवाणी अवस्था जिकडे बघावे तिकडे, बंडाळी एके बंडाळी आहे. कुठे खूपसला पाठीत खंजीर, कुठे निष्ठेची ख...