Friday, April 1, 2016

काय होते बाबासाहेब

महाराष्ट्रातील प्रसिद्व व्याख्याते,मुक्त पत्रकार,कविवर्य सूर्यकांत डोळसे यांची विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना शब्दबद्ध करणारी अत्यंत प्रेरणादायी आणि प्रचंड लोकप्रिय अशी रचना खास 125 व्या जयंती निमित्त........

काय होते बाबासाहेब......

दीन,दलित,गोरगरीबांची
आई होते बाबासाहेब .
पिचलेल्या,ठेचलेल्यांची
दाई होते बाबासाहेब

दाबलेल्या आवाजाचा
हुंकार होते बाबासाहेब.
तार नसलेल्या विणेचा
झंकार होते बाबासाहेब.

प्रयत्न..प्रयत्न...प्रयत्न
यशस्वी प्रयत्न होते बाबासाहेब.
मोजून मोपून सांगायचे तर
अक्षरश: चौदावे रत्न होते बाबासाहेब.

अंधाराला प्रकाशाशी जोडणारी
नाळ होते बाबासाहेब.
दांभिकतेच्या कानाखालचा
जाळ होते बाबासाहेब.

प्रज्ञा,शील,करूणेचे
बीज होते बाबासाहेब.
सुभेदार रामजींच्या कष्टाचे
चीज होते बाबासाहेब.

बुद्ध,कबीर,फ़ुलेंचा
सार होते बाबासाहेब.
लवलवत्या लेखणीची
धार होते बाबासाहेब.

निद्रिस्त लाव्हा पाहून
खूप दु:खी होते बाबासाहेब.
संस्कृतीला ढुसण्या देणा्रा
ज्वालामुखी होते बाबासाहेब.

महाडच्या चवदार तळ्याची
निळाई होते बाबासाहेब.
डोळ्यातल्या आभाळाची
जळाई होते बाबासाहेब.

बुद्धांच्या करूणेचा
सागर होते बाबासाहेब.
शाहू महाराजांच्या लढ्याचे
आगर होते बाबासाहेब.

यारांचे यार आणि
दुश्मनांचे मित्र होते बाबासाहेब.
अजिंठा-वेरूळ्च्या लेण्यातील
कोरीव होते चित्र बाबासाहेब.

मनुस्म्रुतीला भस्म करणारी
आग होते बाबासाहेब.
शेळपट जिणं नाकारणारे
वाघ होते बाबासाहेब.

सवितेची कविता,
लेकरांची रमाई होते बाबासाहेब.
थकल्या-भागल्या जीवासाठी
प्रेमळ भिमाई होते बाबासाहेब.

किती सांगु?किती नाही?
काय होते बाबासाहेब?
नको नको रे हा नादानपणा
बघा वरुन पाहतात बाबासाहेब !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
   मोबाइल-9923847269
----------------------------------------
पूर्वप्रसिद्धी-
दै.पुण्यनगरी /दै.झुंजार नेता
---------------------------------------
आणखी कविता वाचण्यासाठी -suryakanti1.blogspot.in
-------------------------------------

या कवितेच्या पोस्टर साठी क्लिक करा
https://www.instagram.com/p/BDnUyUSsq8N/

No comments:

दैनिक वात्रटिका19मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -286वा

दैनिक वात्रटिका 19मार्च2024....वर्ष- तिसरे.. अंक -286वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1-fbx6QEScldHj2QiABT650...