Sunday, January 6, 2019

सांग दर्पणा,मी दिसते कशी?

















मालिका वात्रटिका

सांग दर्पणा,मी दिसते कशी?

हा दोष तुझाच
तु त्यांना रोखले नाही.
ज्यांने हे व्रत राखयचे
त्यांनी राखले नाही.

जरी टिळक,आगरकर,गोखले,
आंबेडकर मज लाभले.
आज बघ मला कसे
नको नको त्यांनी दाबले.

नको रागवू मला,
ही उद्ध्टपणे पुसते कशी?
सांग दर्पणा,मी दिसते कशी?

गल्ली दैनिकात चालते,
तेच दिल्ली दैनिकात चालते.
सांगती लोक किती जरी
त्यांचे घडेच पालथे.

लाजवितो कॅमेरा
लेखणी टॊचते आहे.
कसे सांगु मी तुला ?
कुठे कुठे बोचते आहे ?

माझेच मला माहित,
मी हे सोसते कशी?
सांग दर्पणा,मी दिसते कशी?

परस्परच कारभार,
कुणी कारभारी बघतो.
लोकशाहीचा चौथा खांब,
आज चौथाई मागतो.

मजबूत होता पाया जो,
तोच नेमका उकरला जातोय.
ज्यावर लोकशाही उभी
तो खांब पोखरला जातोय.

सांग वाळवी ही इथे,
घुसते कशी?
सांग दर्पणा,मी दिसते कशी?

ना टोचती खिळे मला,
झाले गुळगुळीत मी.
सप्तरंगांत रंगुनि सार्‍या
झाले बुळबुळीत मी.

ज्यांच्याविरुद्ध लढायचे
तेच माझे मालक झाले.
करणारांनी केले पोरके,
नको ते चालक-पालक झाले.

क्रुर ही थट्टा बघून,
मनात मी हासते कशी?
सांग दर्पणा,मी दिसते कशी?

जेंव्हा मालक सांगतील तेंव्हा,
वृत्तपत्रीय युद्धाचे शंख फुकले जातात.
स्वागतमूल्याच्या नावाखाली,
रूपायातही अंक विकले जातात.

नंबर वन कोणचे?
फालतू प्रश्न पडतात इथे.
वाचकांना पटविण्यासाठी,
लक्की ड्रॉ ही काढतात इथे.

जिल्हावार आवृत्यांची,
फौज पोसते कशी,
सांग दर्पणा,मी दिसते कशी?

बातम्या लिहिण्या वेळ कोणा?
सरळ झेरॉक्स मारली जाते.
कॉपी-पेस्टच्या तंत्राने
बातमी सहज पेरली जाते.

त्यांचेच अनुकरण केले जाते
जे कुणी म्होरके असतात.
कधी अगदी विरामचिन्हासहित
अग्रलेखही सारखे असतात.

विचारांची ही दुर्मिळता,आज भासते कशी?
सांग दर्पणा,मी दिसते कशी?

लायकांची ओळ नसते,
नालायकांच्या आरत्या येतात.
लेखणीस शाई पाजता,
लेखण्यांना स्फुर्त्या येतात.

प्रसिद्धीपत्रकांच्या बातम्या,
पुरवण्याही प्रायोजित असतात.
फुकट्यांना विचारतो कोण?
ते काय पैसे मोजित असतात?

कुठे भाडे प्रतिसेकंद,कुठे कॉलम-सेंटीमीटरशी .
सांग दर्पणा,मी दिसते कशी?

इलेक्ट्रॉनिक तर प्रिंटच्या
दोन पावले पुढे आहे.
चोविस तास दामटलेले
ब्रेकींग न्युजचे घोडे आहे.

उद्या काया दाखवायचे?
हाच आजचा सवाल आहे.
स्टींग-बिंग फोडीत राहते
बेडरूमचा काय हालहवाल आहे?

माझीच मी मला,
भेसूर भासते कशी?
सांग दर्पणा,मी दिसते कशी?

सोशल मीडियावर तर
मी चेकाळते आहे,
आग लावीत लावीत,
विकृतपणे खेकाळते आहे.

उखाळ्या-पाखाळ्या म्हणजे
इथे सारे कसे बेस्ट आहे .
ज्याला जास्त अंगठे मिळतात
तेच इथे सर्वश्रेष्ठ आहे.

संपादन बिंपादन कसले?
भडक असो वा बेधडक बातमी जशीच्या तशी.
सांग दर्पणा, मी दिसते कशी?

मिणमिणत्या का होईना,
अजून काही पणत्या आहेत.
जाहिराती आणि बातम्या
ओळख तु कोणत्या आहेत?

कोणत्या पापाची
आज मी फेड करते आहे ?
कसलीही न्युज असो,
आज ती पेड ठरते आहे.

मी शीलवान असूनही,
सहज फसते कशी?
सांग दर्पणा,मी दिसते कशी?

मलाही ठाऊक आहे
पोटाला तर जाळले पाहिजे.
समाजसेवेचा आव आणता,
काही तरी पाळले पाहिजे.

लेखणीच्या धारेला
आज कॅमेर्‍याचे बळ आहे !
मी तुझ्यासमोर ओकली,
ही जनमाणसाची कळ आहे !!

बारीक बघितले तर,
आत्याबाईलाही असते मिशी
सांग दर्पणा,मी दिसते कशी?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
http://suryakantdolase.blogspot.in
----------------------------------
पूर्वप्रसिद्धी-दै.पुण्यनगरी,
6जानेवारी2010
---------------------------------------
ज्यांना शेअर करायची आहे त्यांनी
आहे तशी शेअर करावी.

No comments:

दैनिक वात्रटिका19एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -317वा

दैनिक वात्रटिका 19एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -317वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Hd6EtBLdFyAAoFz3kRowp...