Monday, January 9, 2017

मॉंसाहेब आम्हांला माफ करा
















महाराष्ट्रातील प्रख्यात आणि तडाखेबंद वक्ते तथा लोकप्रिय वात्रटिकाकार सूर्यकांत डोळसे
यांची अत्यंत गाजलेली आणि संपूर्ण महाराष्ट्रात पोहचलेली
एक मालिका वात्रटिका
(जिच्या अनेक भ्रष्ट आवृत्या आज सोशल मिडियावर फिरत आहेत.)


खास जिजाऊ जयंती निमित्त
मॉंसाहेब,आम्हांला माफ करा....
...........................
मॉंसाहेब,आम्हांला माफ करा.....
मॉंसाहेब,आम्हांला माफ करा.....
विसरून गेलोत इतिहास आम्ही
विसरून गेलोत पराक्रम
आमच्या डोक्यात पाणी झालेय
त्याची तेवढी वाफ करा.
मॉंसाहेब,आम्हांला माफ करा.....
ज्यांनी शहाजींचा वसा घ्यायचा
तेच बोंबलत हिंडत आहेत.
घराघरातल्या आजच्या जिजाऊ
सासवांसोबत भांडत आहेत.
हे सारे बदलण्यासाठी
कुणातही टाप नाही.
तुम्ही तेवढी टाप करा.
मॉंसाहेब,आम्हांला माफ करा.....
घराघरातला शिवाजी
व्हिडीओ गेम खेळतो आहे.
जंक फुड खाऊन खाऊन
टि.व्ही.समोर लोळतो आहे.
घराघराचा कार्टून शो होतोय
हा बॅड शो तेव्हढा फ्लॉप करा
मॉंसाहेब,आम्हांला माफ करा.....
बाहेर खेळायला जावे तर
कुठे मावळ्यांचा पत्ता आहे?
साचलेल्या उकांड्यावरती
कावळ्यांचीच सत्ता आहे.
कॄपया , घर आणि डोक्यातले
उकांडे तेव्हढे साफ करा.
मॉंसाहेब,आम्हांला माफ करा.....
गनिमी काव्यासाठी तर
टि.व्ही.वाले लपलेले आहेत.
कोणताही चॅनल लावा,
सारे खानच खान टपलेले आहेत.
आमच्या चिकटलेल्या डोळ्यांची
जरा उघडझाप करा.
मॉंसाहेब,आम्हांला माफ करा.....
केस तेव्हडे वाढलेले,
पोकळ मात्र मस्तकं आहेत.
फार थोडी घरं सापडतील,
जिथे मुलांसाठी पुस्तकं आहेत.
आम्ही पापाचेच वाटेकरी
तरी होईल तेव्हढे पाप माफ करा.
मॉंसाहेब,आम्हांला माफ करा.....
राम-कृष्णांचा वारसा सांगुन
पुढच्या गोष्टी तुम्हांला
अगदी सोप्या करता आल्या.
इथली इरसाल लेकरं सांगतील,
आई-बापांच्या सहकार्यामुळेच
आम्हांला कॉप्या करता आल्या.
आई-बापांचेही खरे आहे,
कशाला म्हातारपणी ताप करा?
मॉंसाहेब,आम्हांला माफ करा.....
तुमच्यासारखी आई असली की,
लेकरांना आपोआप
स्वराज्याची शपथ घ्यावी लागते.
आज मात्र बळजबरीने पकडून,
कॉप्या न करण्याची शपथ द्यावी लागते.
पुन्हा गुरुजी चुकले तर
त्यांच्या हाताचे काप करा.
मॉंसाहेब,आम्हांला माफ करा.....
आंधळ्या परंपरेचे
इथे सगळे पाईक आहेत.
कित्तीही ओरडून सांगा,
सारे बहिरोजी नाईक आहेत.
किटलेल्या कानातला मळ
तेल ओतून साफ करा.
मॉंसाहेब,आम्हांला माफ करा.....
राजेपद वारसा हक्काने मिळते,
पण शिवबा घडवावा लागतो.
जाणतेपणाचा दुर्मिळ गुण
दागिण्यासारखा जडवावा लागतो.
जरा मर्यादा सोडून वागतोय,
संभाजीसारखा नातू मागतोय.
आम्हांला तुमच्यासारखी आई,
शहाजी राजांसारखा बाप करा
माँसाहेब, आम्हाला माफ करा
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
..................
पूर्वप्रसिद्धी-
दै.पुण्यनगरी /दै.झुंजार नेता
----------------------
आपल्यालाही चोर,कॉपीबहाद्दर
आणि नाव वगळून शेअर करणारे आढळले तर त्यांच्या
हे तुम्ही लक्षात आणून द्यावे
ही सविनय विनंती.



No comments:

daily vatratika...24nove2024