Saturday, April 14, 2012

आमच्या या देहामधली भीमराया जान तू ..


पेटविलीस मने तू, पेटविलेस रान तू,
आमच्या देहामधली भीमराया जान तू ।।धृ।।

केलास उद्धार तू, झालास आधार तू
कबीरांच्या दोह्यांना केलेस मदार तू
मुर्दाडांच्या कानामध्ये फुंकलेस प्राण तू ।।1।।

वाघिणीचे दूध प्याला, भीमराव वाघ झाला
फुरफुरलास तू, गुरगुरलास तू
माणसातल्या सैतानांची केली दाणादाण तू ।।2।।

धन्य तुझे काम, धन्य काळाराम
चवदार तळे तू, आम्हांलाच कळे तू
ज्योतिबांच्या अखंडाचे केलेस गुणगान तू ।।3।।

ज्ञान हीच शक्ती, ज्ञान हीच भक्ती
केलेस सिद्ध तू, झालास बुद्ध तू
गौतमाच्या धम्माचे एक एक पान तू ।।4।।

विद्रोहाचे कूळ तू, लेखणीचे बळ तू
बापांचा बाप तू, डफावरची थाप तू
वेडय़ा भीमशाहिराने घेतलेली तान तू ।।5।।

ना ढळली रीत कधी, ना ढळली प्रीत कधी
झालास कायदा तू, प्रगतीचा वायदा तू
हे क्रांतिसूर्या, हे विश्वरत्ना, भारताची शान तू ।।6।।

ना ढळली रीत कधी, ना ढळली प्रीत कधी
प्रज्ञेचे आगर तू, करुणेचा सागर तू
शीलाचा जागर तू, दिलाचा जिगर तू
बावीस त्या प्रतिज्ञांचा राखलास मान तू ।।7।।

हे शब्द अल्प माझे, घटनेचे शिल्प तुझे
दाविलास मार्ग तू, दाविलास स्वर्ग तू
हे इतिहासाच्या निर्मात्या, भविष्याचे भान तू ।।8।।

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
    मो. : 9923847269

No comments:

दैनिक वात्रटिका20एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 20एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -318वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1IJKUbzHQm0vLNSUd1TUrj...