गुरूजी उघडतात शाळा,
गुरूजीकडेच सफाई आहे.
शाळेची घंटा घणघणते
गुरूजी म्हणजे शिपाई आहे.
अमकी माहिती, तमकी माहिती
लिखाण एकसारखं आहे.
गुरूजीकडे बघून वाटतं
हा शाळेचा क्लर्क आहे.
हमाली करा,टपाली करा,
खिचडी,वरण-भात करत असतो.
आशावेळी बिचारा गुरूजी
आयता आचारी ठरत असतो.
शिक्षणाच्या कायद्याची
जिकडे-तिकडे दवंडी आहे.
शाळेतली बांधकामं सांगतात,
गुरूजी म्हणजे गवंडी आहे.
शिक्षण नावाच्या सर्कशीतला
शिक्षक एक जोकर झाला.
काहीही सांगा,कुणीही सांगा
शिक्षक सांगकाम्या नोकर झाला.
गुरूजीकडे राखुळीसाठी
दोन वर्गांचे आंदण असते.
गुरू साक्षात परब्रम्ह म्हणीत
गुरूजीला वंदन असते.
राजकीय व्यापार्यांचे
गुरूजीला सेलर व्हावे लागते.
मुलांच्या गणवेशापोटी
गुरूजीला टेलर व्हावे लागते.
समिती कुठलीही असो,
गुरूजीला सचिवाचा भाव येतो.
सांगेल तिथे करून
गुरूजीचा सह्याजीराव होतो.
नको तेवढ्या भूमिका
गुरूजीवर लादल्या जातात.
गुरूजीही काही कमी नाही
अनेक जोडधंदे साधल्या जातात.
आदर्शांचा आणि वास्तवचा
गुरूजी मेळ मागतो आहे.
मुलांना शिकविण्यासाठी
गुरूजी वेळ मागतो आहे.
गुरूजीला वापरले जाते,
गुरूजीला ढोपरले जाते.
गुरूजीतले गुरूजीपण
सोयिस्कर नाकारले जाते.
कुणीही येतो,
टिकली मारून जातो !
अशावेळी गुरूजीतला
गुरूजी मरून जातो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबा.९९२३८४७२६९
No comments:
Post a Comment