Thursday, August 30, 2012

मुहूर्ताचे बघा!


कितीही नाही म्हटले तरी
कसाब तसा लक्की आहे.
उशिरा का होईना पण
त्याची फाशी नक्की आहे

तेही देशद्रोहीच आहेत
ज्यांना कुणाला अजून वाटते
कसाब जगायला हवा!
पुन्हा हसू टाळण्यासाठी
एकदाचा मुहूर्त बघायला हवा!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
   मो. : 9923847269

उलटी गंगा


Tuesday, August 28, 2012

लोकशाही पूजकांचे भांडण

ज्याचा आग्रह धरला
ते लोकशाही मूल्य आहे.
तरीही संसद ठप्प
याचेच खरे शल्य आहे.

नैतिकतेच्या गप्पा मारणं
सर्वांसाठी सोप्पं आहे !
लोकशाही पूजकांच्या भांडणात
संसद मात्र ठप्प आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Monday, August 27, 2012

स्वयंघोषित भास


उद्याच्या ऐवजी आजच
अपेक्षापूर्ती करून घेतली जाते.
पदरच्या खर्चाने का होईना
आपली आरती करून घेतली जाते.

ओवाळून घेतलेले,
ओवाळून टाकलेले
तुमच्या आमच्या आसपास आहेत!
आपल्या नेतृत्वगुणाचे
हे स्वयंघोषित भास आहेत!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Sunday, August 26, 2012

नैसर्गिक न्याय


दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर
मराठी साहित्यिकांची हद्द झाली
विश्व साहित्य संमेलनाची टूर
बरे झाले रद्द झाली.

चिमूटभर लोकांसाठी संमेलन,
इथे काही रसिकांची उणीव नाही!
ते कसले साहित्यिक?
ज्यांना दुष्काळाची जाणीव नाही!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Saturday, August 25, 2012

दुष्काळी भिती

दुष्काळ आवडे सर्वांना
असे नेहमीच बोलले जाते.
कारण छावण्यातील गुरांचे
शेणसुद्धा खाल्ले जाते.

गुरांचे शेण खाणारे
वाट्टेल ते खाऊ शकतात !
खरी भिती याची आहे
दुष्काळही साजरे होवू शकतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)


Friday, August 24, 2012

सत्तेचे वर्तन


सत्ता उतली जाते,
सत्ता मातली जाते.
सत्ता हाती असली की,
साबणाने धुतली जाते,

सर्व काही करून सवरून
चेहरा मात्र स्वच्छ असतो !
काल जो बरोबरीचा होता
तो आज तुच्छ असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)

धक्के निवारक


आजचा घोटाळा बघून
कालचा घोटाळा विसरला जातो.
जसा पहिला आवरेपर्यंत
नवा पसारा पसरला जातो.

घोटाळय़ाचे धक्के असे
घोटाळय़ामुळेच पचले जातात!
घोटाळेबहाद्दरांचे आभार माना
त्यांना नवे घोटाळे सुचले जातात!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Thursday, August 23, 2012

संदर्भासहित स्पष्टीकरण

उगीच गोंधळात गोंधळ नको,
सांगायच्या त्या गोष्टी पक्क्या सांग.
टंचाई म्हणाली दुष्काळाला,
एकदाच तुझी माझी व्याख्या सांग.

दुष्काळ सांगे टंचाईला,
ही आणीबाणीची वेळ आहे !
तुझी माझी व्याख्या म्हणजे
सरकारी बाबूंचा खेळ आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)

टंचाई ते दुष्काळ



टंचाई आणि दुष्काळात
धोरणात्मक तफावत असते..
दुष्काळ जाहीर होईपर्यंत
टंचाई फोफावत असते

कुणासाठी दुष्काळ असतो,
कुणासाठी खुष्काळ असतो!
टंचाईच्या पोटातच
सरकारी दुष्काळ असतो!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
    मो. : 9923847269

Wednesday, August 22, 2012

सायलेंट झोन


सायलेंट झोनच्या बागुलबुवाचे
घराघरांत लोण आहे.
बायको म्हणते नवर्‍याला
घर म्हणजे 'सायलेंट झोन' आहे.

हाताची घडी तोंडावर बोट
बायकोचेच ऐकून घ्यावे लागते!
सायलेंट झोन जाहीर झाला की,
नवर्‍याला मौनीबाबा व्हावे लागते!!

सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मो. : 9923847269
-

Thursday, August 16, 2012

स्वातंत्र्य आहे साक्षीला....

स्वातंत्र्यालाही माहीत नसेल
इथे पुन्हा लढाया लढल्या जातील.
आपल्याकडून आपल्यालाच
इथे पुन्हा बेड्या पडल्या जातील.

स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्याचा हक्क
इथे पुन्हा पुन्हा मागावा लागेल.
स्वातंत्र्याचा इतिहास
पुन्हा पुन्हा जागावा लागेल.

स्वातंत्र्याचे सुदैव की दुर्दैव?
हे अजून ठरायचे आहे !
स्वातंत्र्यप्राप्तीइतकेच काम
स्वातंत्र्य टिकविण्यासाठी करायचे आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)

Wednesday, August 15, 2012

दुर्दैव-विलास


ऐन रंगात आलेला डाव
अचानक खल्लास झाला.
महाराष्ट्राच्या दृष्टीने
हा दुर्दैवाचा विलास झाला.

राजकारण्यांना सांगून गेले
तुम्हीही चेहरा हसरा ठेवू शकता.
सरपंचांना आत्मविश्वास दिला
तुम्हीही मुख्यमंत्री होऊ शकता.


सुन्न झाली दिल्ली,
सुन्न झाली गल्ली
सुन्न बाभळगाव आहे!
अजातशत्रू राजकारण्याचे
विलासराव हे नाव आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Friday, August 10, 2012

अशी ही नाचवा-नाचवी

एकाच मापाचे,एकाच छापाचे
साचे तयार करू लागले.
सगळेच चॅनलवाले
नाचे तयार करू लागले.

नको त्या,नको तसल्या गाण्यावर
पोरा-पोरींचा ठेका आहे !
चॅनलवाल्यांच्या नाचवा-नाचवीचा
पावला-पावलावर धोका आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

ज्याची त्याची गरज


Monday, August 6, 2012

बिनपावसाचा तमाशा


नैसर्गिक नाहीतर नाही,
कृत्रीमही पाऊस नाही.
उडती विमानं बघायची
लोकांना काही हौस नाही.

ढग आहेत तर विमान नाही
विमान येईल तेंव्हा ढग नसेल !
दु:खाच्या तमाशात
बिनपावसाचा वग असेल !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

समन्वयाचा प्रश्न


daily vatratika...29jane2026