Showing posts with label साप्ताहिक सरकारनामा. Show all posts
Showing posts with label साप्ताहिक सरकारनामा. Show all posts

Sunday, March 8, 2026

मोर्चाचे पीक...साप्ताहिक वात्रटिका



साप्ताहिक 
वात्रटिका 
--------------------------------

मोर्चाचे पीक

जणू शेतकऱ्यांच्या हितावरती, 
सगळ्यांचेच राजकीय जीव आहेत. 
त्यामुळे शेतकऱ्यांचे मोर्चे, 
सदा सर्वकाल चिरंजीव आहेत.

मोर्चे कायम; समस्या कायम, 
हा प्रकार आश्चर्यकारक असतो.
झेंडे,नेते आणि घोषणा,
यांच्यामध्ये दरवेळी फरक असतो.

शक्ती,भक्ती,शक्ती आणि युक्तीने, 
शेतकऱ्यांना मोर्चात ओढले जाते !
शेतकऱ्यांच्या बळावरती, 
मोर्चांचे नवे नवे पीक काढले जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-----------------------------
साप्ताहिक सरकारनामा 
वात्रटिका - 77
वर्ष- दुसरे 
7 मार्च 2026

Saturday, January 17, 2026

बंडखोरी आणि दृष्टिकोन...साप्ताहिक सरकारनामा वात्रटिका


साप्ताहिक
वात्रटिका 
--------------------------------

बंडखोरी आणि दृष्टिकोन

आपल्या बंडखोरांची हकालपट्टी, 
दुसऱ्यांच्या बंडखोरांचे स्वागत आहे.
लोकशाही आपली टिंगल टवाळी, 
अगदी उघड्या डोळ्यांनी बघत आहे.

ज्याच्या त्याच्या बंडखोरीचा, 
वेगवेगळा असा राजकीय रंग आहे.
इतरांच्या बंडखोरीचे कौतुक,
आपल्याकडून मात्र शिस्तभंग आहे.

राजकीय बंडखोरीकडे बघण्याचे,
प्रत्येकाचे दुटप्पी असे धोरण आहे !
सगळ्याच पक्षांच्या छावणीला,
हल्ली पक्षीय बंडखोरांचे तोरण आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-----------------------------
साप्ताहिक सरकारनामा 
वात्रटिका - 69
वर्ष- दुसरे 
17 जानेवारी 2026

Saturday, January 3, 2026

उमेदवारीची चित्तरकथा .. साप्ताहिक वात्रटिका


साप्ताहिक
वात्रटिका 
--------------------------------

उमेदवारीची चित्तरकथा

कुणा कुणाची चालली झुंडशाही, 
कुणा कुणाचे यशस्वी बंड आहे.
निष्ठावंतांनी जो जिरवून घेतला, 
तो आपल्याच निष्ठेचा कंड आहे. 

जे कानामागून आले तिखट झाले,
तेच आज जिकडे तिकडे गोड आहेत.
त्या निष्ठावंतांनाही किंमत कळाली,
जे कुणी पैश्या पाण्याने झोड आहेत.

काहीजण चिडले;काहीजण भिडले,
कुणी धाय मोकलून रडले आहेत !
आयाराम आणि गयाराम तर,
सर्वच कार्यकर्त्यांना नडले आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-----------------------------
साप्ताहिक सरकारनामा 
वात्रटिका - 67
वर्ष- दुसरे 
3 जानेवारी 2026

Saturday, December 6, 2025

निमित्ताला कारण.... साप्ताहिक सरकारनामा मात्रिका


साप्ताहिक
वात्रटिका 
----------------------------

निमित्ताला कारण

कुठे लांबवला मुहूर्त, 
कुठे हनिमून लांबला आहे. 
स्थानिक स्वराज्य संस्थांचा, 
रंगलेला खेळ थांबला आहे.

प्रत्येकाची उत्सुकता शिगेला, 
उत्साह मात्र शमला आहे.
सहन होईना;सांगता येईना,
न्यायप्रविष्ट मामला आहे.

कुणाचा झाला जळफळाट,
कुणाचे खवळलेले पित्त आहे !
उद्याच्या पराभवासाठी, 
हाती आयतेच निमित्त आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
----------------------------
साप्ताहिक सरकारनामा 
वात्रटिका - 63
वर्ष- दुसरे
6 डिसेंबर 2025

Sunday, June 8, 2025

आका... साप्ताहिक वात्रटिका

साप्ताहिक
वात्रटिका
-----------------------

आका 

आरोपी कोणताही असला तरी, 
तो फरार होण्याचा धोका असतो. 
प्रत्येक आरोपी आणि गुन्हेगारामागे,
आजकाल एखादा आका असतो.

कधी छोटा असतो;कधी मोठा असतो,
कधी कधी आकाचाही आका असतो.
आरोपींच्या आणि गुन्हेगारांच्या, 
सुरक्षिततेचा त्याच्याकडे ठेका असतो.

आकालाही आका म्हणायची,
आजकाल कुणामध्येही हिंमत नाही !
उघड्या डोळ्यांनीही आंधळी कोशिंबीर,
खेळण्यासारखी दुसरी गंमत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-----------------------
साप्ताहिक सरकारनामा
7जून 2025

Thursday, May 29, 2025

ट्रम्प कार्ड.....साप्ताहिक सरकारनामा...वात्रटिका



साप्ताहिक 
वात्रटिका 
---------------------

ट्रम्प कार्ड 

शस्त्र संधीची फळे, 
जो भोगायचे तो भोगत आहे.
न होता थांबले तरी,
युद्धविराम म्हणावे लागत आहे.

ज्याला जसे जमेल तसे, 
आपले 'ट्रम्प कार्ड' खेळतो आहे.
त्यामुळेच प्रत्येकाच्या मनामध्ये, 
आज शंकासुर खेळतो आहे.

सगळेच अस्वस्थ असले तरी,
शांततेचा टॅग बसवावा लागतो !
आपापली सोय बघून,
बुद्ध पुन्हा हसवावा लागतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
------------------------
वात्रटिका
साप्ताहिक सरकारनामा
17 मे 2025

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...