Tuesday, August 30, 2011

हक्कभंगाची गंमत

कुणी खरे बोलले की,
त्याला वाचाळता म्हणू नये.
नैसर्गिक वास्तवतेला
कधी गचाळता म्हणू नये.

त्यांना बोलले की हक्कभंग
जनसामान्यांना किंमत नाही!
आपल्या लोकशाहीमध्ये
हक्कभंगासारखी गंमत नाही!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Sunday, August 28, 2011

लालू उवाच

भ्रष्टाचारावर बोलण्याचा
लालूस अधिकार कुठला होता?
लोकसभेत एव्हढा बरळला की,
जसा चारा खाऊन उठला होता.

अण्णा जिंकले,देश जिंकला
ज्याच्या त्याच्या तोंडी साखर आहे !
लोकपाल चर्चेतून सिद्ध झाले
लालू पक्का जोकर आहे !!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

'वर' कमाई

भ्रष्टाचाराविरुद्ध बोलताना
नैतिकता कुठे आचरली जाते?
जिथे मुलगी देतानाही
वरकमाई विचारली जाते.

भ्रष्टाचाराची तिरडी
तेव्हाच खरी उठली जाईल!
जेव्हा वर कमाईची
सर्वाना लाज वाटली जाईल!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Saturday, August 27, 2011

उपोषणाचा मार्ग

अण्णांच्या आंदोलनाच्या
प्रतिक्रिया दिसायला लागल्या.
माहेरी जाईन म्हणणार्‍या
उपोषणाला बसायला लागल्या.

कितीही नमते घेतले तरी
त्यांचा माहेरचाच ठेका आहे!
लोकशाहीवादी नवरे म्हणतात
हा नवरेशाहीला धोका आहे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Thursday, August 25, 2011

वैचारिक रंगबाजी

आंदोलन यशस्वी करण्याचा
जसा अण्णांचा चंग आहे.
तसा कुणाकडून जातीय तर,
कुणाकडून धार्मिक रंग आहे.

त्यांना तसेच दिसणार
जसे डोळ्यावर गॉगल आहेत!
त्यांच्या बुद्धीची कीव येते
कसे म्हणावे ते पागल आहेत!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Wednesday, August 24, 2011

विरोधाभास

अण्णांच्या आंदोलनात बहकून जावे
एवढे कुणीच भावूक नाही.
असे कितीतरी जण आहेत
त्यांना 'लोकपाल' ठाऊक नाही.

नसेना का नसले तर
कुणीतरी त्यांच्यासाठी लढतो आहे!
भुंकणारे भुंकले तरी
लढय़ाचा पाठिंबा रोज वाढतो आहे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

लक्षवेध ते बुद्धिभेद


अण्णांचा लोकपाल लढा
जेवढा लक्षवेधक आहे.
बुद्धिवंताचाही अपप्रचारही
तेवढाच बुद्धिभेदक आहे.

लोक जागृत झाले नसते तर
इंग्रज कधीच पळाले नसते!
आजचे बुद्धिवंत तेव्हा असते तर
स्वातंत्र्य कधीच मिळाले नसते!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Sunday, August 21, 2011

लढय़ा मागचे हात

दोस्त हो सावध रहा
ही वैर्‍याची रात आहे.
शोधा मागे शोध सुरू झाले
आंदोलनामागे कुणाचा हात आहे?

शोधायची गरज नाही
आंदोलनांची कारणं सर्वज्ञात आहेत !
अण्णांच्या लढय़ाचे कारणच
बरबटलेले हात आहेत!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Saturday, August 20, 2011

कलमाडी बोले राजाला

पूर्वीच लोकपाल आले असते तर
किती बरे झाले असते.
तुमच्या-माझ्या नशिबात
हे दिवस कशाला आले असते?

ना होता माझा खेळखंडोबा,
ना तुमचा बॅण्ड वाजला असता!
लोकपालाचा वचक असता तर
भ्रष्टाचार कशाला माजला असता!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Friday, August 19, 2011

बुद्धिवंतांची टवाळखोरी

टेबला-टेबलावरती
टपलेला बोका आहे.
लोकपालासाठीचे आंदोलन
म्हणे लोकशाहीला धोका आहे.

ज्याला जशी ओकायची
तशी गरळ ओकू लागले.
वातानुकूलित बुद्धिवंत
आंदोलनाला ठोकू लागले.

त्यांना जसे लढता येईल
तसे बुद्धिवंतांनी लढून दाखवावे !
निदान रेशनकार्ड तरी
लाचखोरीशिवाय काढून दाखवावे !!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Thursday, August 18, 2011

खर्‍याचे नशीब

हल्ली खोटय़ाच्या नाही तर
खर्‍याच्या पदरी गोटा आहे.
खर्‍यापेक्षा खोटय़ाचाच
हल्ली नको तेवढा रेटा आहे.

खोटय़ाचा जरी फुसका बार,
खर्‍याच्या अंगी सुरुंग आहे!
खोटे मोकाट सुटलेले,
खर्‍याच्या नशिबी तुरुंग आहे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

लढाईचे सूत्र


भ्रष्टाचारविरोधी लढय़ात
वैयक्तिक सत्याग्रही व्हावे लागेल.
देणार नाही, घेणार नाही
एवढे निग्रही व्हावे लागेल.

चारणे थांबविल्याशिवाय
खाणेही थांबणार नाही!
मग लढय़ाची यशस्विता
फार काळ लांबणार नाही!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Saturday, August 13, 2011

श्रद्धाळूंसाठी...


श्रद्धा आणि अंधश्रद्धेत
आंधळेपणाचा फरक आहे.
बिनधास्त ठोकून देतात
वर स्वर्ग खाली नरक आहे.

श्रद्धेची अंधश्रद्धा होऊ नये
यासाठी श्रद्धा तपासली पाहिजे!
उघडय़ा डोळय़ांनी, जागत्या बुद्धीने
आपली श्रद्धा जोपासली पाहिजे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Friday, August 12, 2011

प्रति सेन्सॉरशिप


सेन्सॉरची सेन्सॉरशिप
बोर्डावर यायला लागली.
जिकडे तिकडे प्रति सेन्सॉरशिप
निर्माण व्हायला लागली.

प्रति सेन्सॉरशिप तर
कलेसाठी धोक्याची तर!
तथाकथित सेन्सॉरवाल्यांना
प्रतिक्षा फक्त मोक्याची आहे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Thursday, August 11, 2011

स्वच्छता प्रमाणपत्र

जयंत्या, पुण्यतिथ्याच काय?
वाढ-दिवसही घातले जातात.
भाडोत्री विचारवंतांकडून
स्वच्छता प्रमाणपत्र घेतले जातात.

आजकाल स्वच्छता प्रमाणपत्र
चोर-लुटारूंच्याही हातात आहेत!
भाडोत्री विचारवंतांचे धंदे
हाऊसफुल्लच्या बेतात आहेत!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Wednesday, August 10, 2011

नेतृत्वाची ऐशी-तैशी


सुरवंटाचे फुलपाखरू व्हावे
तसा नेता घडावा लागतो.
तळमळीच्या कार्यकर्त्यातुनच
नेता बाहेर पडावा लागतो.

हा राजकीय आदर्शवाद तर
केवळ बोलण्यासाठी उरला आहे !
कसले सुरवंट? कसले फुलपाखरू?
बापाने पोरगा माथी मारला आहे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Tuesday, August 9, 2011

भ्रमाचा भोपळा


सुशिक्षितांच्या घरामध्ये
जरी भोपळा हजर आहे.
तरीही त्यांना दृष्ट लागेल
अशी आमची नजर आहे.

घरातला भोपळाच
सगळे धाब्याला टांगतो आहे!
ज्याच्या त्याच्या अकलेचे मोजमाप
भोपळा बरोबर सांगतो आहे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Monday, August 8, 2011

संमेलनाचे कवित्व

संमेलनाच्या नंतर असते,
संमेलनाच्या आधी असते.
साहित्य संमेलन म्हटले की,
त्यात वादावादी असते.

साहित्यापेक्षा संमेलन
वादावादीमुळे लक्षणीय ठरते!
साहित्यिक कमी, घुसखोर जास्त
संमेलनही प्रेक्षणीय ठरते!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Sunday, August 7, 2011

मैत्री रे मैत्री

राजकीय मैत्रीसारखी
आपली मैत्री असू नये.
ऊठसूट आपल्या मैत्रीवर
अविश्वास दाखवीत बसू नये.

मैत्रीला बहुमत नाही,
एकमताचा पाया असावा!
मैत्री अशी असावी
मैत्रीच कस्तुरीचा फाया असावा!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Saturday, August 6, 2011

पक्षांतराचा अर्थ

हकालपट्टी आणि पक्षत्यागात
अंतर फार थोडे असते.
नेमके काय खरे मानावे?
हे राजकीय कोडे असते.

हकालपट्टीपेक्षा पक्षत्याग
पवित्र असल्यासारखे वाटते!
हकालपट्टी म्हटले की,
बुडावर लाथ बसल्यासारखे वाटते!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Friday, August 5, 2011

बेशर्मी मोर्चा

अंगावरचे कपडे काढून
लोकांचे लक्ष वेधले गेले.
त्यांचे त्यांनाच ठाऊक
नेमके काय साधले गेले?

जरी बेशर्मी मोर्चामुळे
सामाजिक बेशर्मी नगडी आहे !
महिलांचे प्रश्न मांडंण्याचा
हा मार्ग मात्र बेगडी आहे !!


- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

ग्लोबल महागाई

दररोजचा दिवस ढकलताना
सामान्य माणूस अगतिक आहे.
त्यालाच सांगणे बरे नाही
महागाईची समस्या जागतिक आहे.

समस्या जागतिक असो,
वा स्थानिक असो
ज्याची त्याला झळ आहे !
लागल्याशिवाय कळत नाही
महागाईची केवढी कळ आहे !!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

खड्डय़ांची आवश्यकता

रस्त्यावरचे खड्डे
जनतेकडून सोसले जातात.
रस्ते आणि खड्डय़ावरच
कार्यकर्ते पोसले जातात.

आंदोलनाशिवाय लोक
दुसरे काय करू शकतात?
दरवर्षी खड्डे पडले नाहीतर
कार्यकर्ते उपाशी मरू शकतात!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Thursday, August 4, 2011

सापांचे मनोगत

आमचे रक्षण जरूर करा,
मात्र आम्हाला पुजू नका
आम्ही दूधखुळे नाहीत
आम्हाला दूध पाजू नका

आम्ही काही माणसांप्रमाणे
मनामध्ये डुख धरीत नाहीत!
उत्साही सर्पमित्रांएवढे
आमचे हाल कुणीच करीत नाहीत!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Wednesday, August 3, 2011

सारेच चमत्कारीक !

इथे चमत्कारांना कमी नाही
मोठा चमत्कारीक देश आहे.
नव नव्या चमत्कारांचा नमुना
न चुकता पेश आहे.

ना चौकशी,ना चिकित्सा,
लोकच दूधखुळे आहेत !
लोक अज्ञानाच्या जिवावरच
चमत्कारीक चाळे आहेत !!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

लोकशाहीचा पुळका

समाज एकवटू नये
एवढेच त्यांच्या डोक्यात आहे.
त्यांनी आरडाओरड सुरू केली,
आपली लोकशाही धोक्यात आहे.

जेव्हा लोक एकवटतात तेव्हा,
चांगल्या चांगल्यांची फाटू लागते!
दुर्लक्षित केलेली लोकशाही
अचानक आपली वाटू लागते!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Tuesday, August 2, 2011

खड्डय़ांचा दचका

रस्त्यात खड्डे नाही,
खड्डय़ात रस्ते असतात.
सामान्य माणसांचे जीव
त्यांच्यासाठी सस्ते असतात.

एकदा गाफील राहिले की,
त्याचा पाच वर्षे पचका असतो!
'आता तरी शहाणे व्हा'
जनतेला खड्डय़ांचा दचका असतो!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Monday, August 1, 2011

'मार्क्‍स'वादी मूल्यमापन

आठवीपर्यंत परीक्षा नाहीत
म्हणजे नक्कीच धोका आहे
श्रेण्या नकोत, मार्क्‍स हवेत
'मार्क्‍स'वाद्यांचा हेका आहे

परीक्षा रद्दच्या अफवेचा
वरून खाली पाझर आहे!
नव्या मूल्यमापन योजनेला
'मार्क्‍स'वाद्यांकडून गाजर आहे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

daily vatratika...29jane2026