Friday, December 31, 2010

2010 चा निरोप

2010 चा निरोप

’घोटाळे..घोटाळे’ असे ऐकून
मी पुरता विटलो आहे.
अखेर माझेच दिवस भरले
मी एकदाचा सुटलो आहे.

उगवत्याला अंत असतो,
ही किमया काळाची आहे !
मला माझी काळजी नाही,
काळजी 2010 ह्या बाळाची आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, December 30, 2010

कलंकशोभा 2010

भ्रष्टाचाराचा कलंक
एकाहून एक ठळक आहे.
’घोटाळ्यांचे वर्ष’
ही 2010 ची ओळख आहे.

करणारे करून गेले,
कलंक 2010 च्या माथी आहे !
खाऊन खाऊन जातील कुठे?
अंतिम सत्य माती आहे !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, December 29, 2010

नथुरामचे स्मरण

वध..वध...असा जप करीत
नथुरामचे उदात्तीकरण होते.
संमेलनाच्या स्मरणिकेत
म्हणूनच त्याचे स्मरण होते.

हे काही नवे नाही,
हे पारंपारिक खूळ आहे !
हे अनावधान नाहीच नाही,
हे उठलेले पोटशूळ आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

इतिहासाचा स्वभाव

इतिहासाचा स्वभाव

इतिहास बहूमत नाही,
इतिहास पुरावे मागत असतो.
वर्तमान काहीही सांगो,
इतिहास स्वत:ला जागत असतो.

भेसळखोर वाढले की,
इतिहास भेसळला जातो !
लबाड वर्तमानावरती मग
इतिहास उसळला जातो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

आधुनिक भामटे

आधुनिक भामटेच तर
फार गाजावाजा करतात.
मुद्दा शिळा असला तरी
त्यालाच ते ताजा करतात.

भामटे नवे असले तरी,
त्यांची जुनीच चाल आहे !
सांगण्याची तर्‍हा निराळी;
ते म्हणती,आमचीच लाल आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, December 24, 2010

ग्राहका जागा हो...

भक्त ग्राहक झाले म्हणूनच
इथे धर्म विक्रीला मांडला जातो.
देवांचा बाजार झाल्यानेच
इथे देव देवळात कोंडला जातो.

व्याजावरती व्याज मिळते,
सहीसलामत मुद्दल असते !
दुकानदारांना तोटाच नाही,
गिर्‍हाईकांना कुठे अद्दल असते?

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, December 23, 2010

सा.सूर्यकांती अंक ३० वा


कांद्याच्या निमित्ताने

पेट्रोलचीही भाववाढ झाली,
पण कांद्याएवढी चर्चा नाही.
प्रसार माध्यमांचाही
पेट्रोलकडे मोर्चा नाही.

खोटे का होईना
भाववाढीचे समाधान मिळू द्या !
आपल्या मालाला भाव मिळू शकतो
शेतकर्‍याला तरी कळू द्या !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

ऐतिहासिक पराक्रम

इतिहासकारांचे पराक्रम असे की,
इतिहासालाही धूळ चारली जाते.
ओळखूही येणार नाही
अशीच पाचर मारली जाते.

इतिहास घडला एक,
दुसरा इतिहास घडविला जातो !
काजव्यांच्या पाठीमागे
प्रत्यक्ष सूर्य दडविला जातो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, December 22, 2010

कांदे-पुराण

भजे कुरकुरत म्हणाले,
कांद्याशिवाय मजा नाही.
पत्ता कोबी कोंबण्याएवढी
तळतळणारी सजा नाही.

भजे-कांद्याएवढीच दु:खी
हातगाड्यावरची भेळ आहे.
उतप्पा आंबट चेहर्‍याने म्हणाला,
माझ्यावरही तीच वेळ आहे.

खाणारापेक्षा पिकविणाराचेच
सगळीकडूनच वांधे आहेत !
जणू व्यवस्थेच्या डोक्यामध्ये
बटाटे आणि कांदे आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, December 21, 2010

दोघात तिसरा

कुणालाच कळेना
भेटीत काय ’राज’आहे?
कधी नव्हे तेवढी अस्वस्थता
युतीमध्ये आज आहे.

राजकीय दबावतंत्राचाच
जणू हा आसरा आहे !
अजपर्यंत कधीच नव्हता
तो दोघात तिसरा आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, December 19, 2010

भ्रष्टांची सारवासारव

आमच्यापेक्षा तुमचा मोठा
आमच्याविरूद्ध बोलू नका.
आम्ही कमी,तुम्ही जास्त
आमची पोल खोलू नका.

भ्रष्टांवर भ्रष्टांची
अशी राजकीय मात आहे !
जनता वेडी नाही
तिला सगळेच ज्ञात आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

शतकांचे अर्धशतक

तुमच्या आमच्या सारख्यांची
शतकांसाठी हाव आहे.
सचिन तेंडूलकर हे तर
विक्रमांचे दूसरे नाव आहे.

शतकांचे अर्धशतक
ही काय चेष्टा आहे ?
या विक्रमाचा पाया
सातत्य आणि निष्ठा आहे !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

बाटगे विचारवंत

उंदराला मांजर साक्ष,
टपलेले बोके आहेत.
ज्यांनी बोलले पाहिजे
तेच आज मुके आहेत.

गैरसमज करून घेऊ नका,
त्यांच्या जिभा छाटल्या आहेत !
एकवेळ छाटणे परवडले,
पण त्यांच्या जिभा बाटल्या आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, December 18, 2010

विकिलिक्सची भांडेफोड

कळेना काय उघड?
काय गुपित आहे?
इंटरनेटचे वरदान
जन्मत:च शापित आहे.

संगणक की मानव?
कोण कुणाचा मालक आहे ?
विकिलिक्सची भांडेफोड
ही तर निव्वळ झलक आहे !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, December 17, 2010

आमचा गौप्यस्फोट

नेमके काहीच कळेना
कोण काय काय बोलतो आहे ?
गौप्यस्फोटांच्या हादर्‍यांनी
कोण कुणाची पोल खोलतो आहे ?

गौप्यस्फोटांचे राजकारण
अधिकच प्रचलित होते आहे !
खरा गौप्यस्फोट असा की,
लोकांचे लक्ष विचलित होते आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, December 15, 2010

डेअरिंगबाज चोर

चोर ते चोर
वर शिरजोर्‍या करू लागले.
आता तर शनिशिंगणापूरातच
चोर्‍या करू लागले.

देवाबरोबर माणसांचाही
विश्वास डळमळीत होतो आहे !
किमान आंधळा भक्त तरी
हळुहळू कळीत होतो आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, December 12, 2010

भोंदू रे भोंदू

भोंदूना भोंदू म्हटले तर
भोंदूना राग येऊ लागले.
दोन तोंडांची गांडूळं
जहरी नाग होवू लागले.

आंधळ्या भक्तीचे जहर
लोकांना चढवित आहेत.
अधर्म..अधर्म..म्हणीत
भामटे ऊर बडवित आहेत.

ज्याचे त्यालाच कळेना
बोलून उपयोग काय आहे ?
कसायांचा दोष नाही,
त्यांनाच धार्जिन गाय आहे !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

हुतात्म्यांची शपथ

दुश्मनांनी एकदाच मारले
तुम्ही पुन्हा पुन्हा मारू नका.
आमच्या हौतात्म्याची शपथ आहे,
आमचे राजकारण करू नका.

हे असेच चालत राहिले तर
बलिदानाला किंमत उरणार नाही !
आमचे राजकारण बघून
देशासाठी कुणीच मरणार नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, December 11, 2010

विटाळ

देशाचे विचारचक्रच
घोटाळ्यांभोवती घोटाळू लागले.
पावित्र्याचा आव ज्यांचा
असे सारेच विटाळू लागले.

कोणी म्हणतो,राजकीय सुपारी;
कोणी म्हणतो,हे किटाळ आहे !
पण देशात सर्वत्र
घोटाळ्यांचा विटाळ आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, December 10, 2010

सशस्त्र व्हा...

घोटाळे लपूनछ्पून नाही
लोकांच्या उरावर केले जातात.
कुणाचे डोळ्यावर हात,
कुणी बिच्चारे भ्याले जातात.

पूर्वी आपण नि:शस्त्र होतो
आता माहिती अधिकार हाती आहे !
चला दाखवून देऊ
आपलीही ताकद किती आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, December 9, 2010

घोटाळ्यांचे टिमवर्क

सरकारी खुराकावर
पोसलेले कठाळे आहेत.
तुही खा,मीही खातो
घोटाळ्यावर घोटाळे आहेत.

खाणारे खात राहतात,
समिती चौकशीत गर्क असते !
घोटाळा एकट्याचे काम नाही,
घोटाळा म्हणजे टिमवर्क असते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, December 8, 2010

थंडोत्सव

कुणाला थंडी नकोनकोशी,
कुणाला थंडी हवीहवीशी वाटते.
ज्याला थंडी साजरी करता येते
त्याला थंडी नवीनवीशी वाटते.

थंडी जाणवते,थंडी मानवते,
थंडी एवढी काही दुष्ट नाही !
थंडी गुलाबी,थंडी शराबी,
एकट्याने साजरी करण्याएवढी
थंडी साधीसुधी गोष्ट नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, December 7, 2010

जिरायती दु:ख

अस्मानाकडून अन्याय होतो,
सुलतानाकडूनही अन्याय होतो.
बागयतदार व जिरायतदारांचा
एकाच मापाने न्याय होतो.

ही न्यायिक समता असेलही,
पण त्यात समतेला वाव नाही !
सब घोडे बारा टक्के
जिरायती दु:खालाही खरा भाव नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, December 6, 2010

दाम ले के बोल

कुणी तळ्यात आहे,
कुणी मळ्यात आहे.
खरी मौज अशी की,
लवासाच तळ्यात आहे.

कुणी तर्‍हेवाईक आहेत,
कुणी पर्यावरणाचे पाईक आहेत.
दाम ले के बोल
बोलायला माईक आहेत.

वर निळू निळू आकाश,
खाली निळू निळू पाणी असेल !
ज्याला बुद्धीभेद जमला
तोच सर्वांपेक्षा ज्ञानी असेल !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, December 4, 2010

पावसाची नसबंदी

पावसाला पाझर फोडता येतो,
त्याची नसबंदीही करता यावी.
पावसाची अवकाळी मस्ती
ढगातल्या ढगात जिरता यावी.

जसा कृत्रिम पाऊस पाडता येतो,
तसा जर थांबवता आला असता !
तर कोरड्यासारखा ओलाही
दुष्काळ लांबवता आला असता !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, December 3, 2010

व्वा रे धंदा !

शेतकर्‍यांचा माल स्वस्त,
व्यापार्‍यांचा महाग असतो.
चुकीच्या धोरणांचाच
हा सगळा भाग असतो.

एकाने रक्त ओकायचे,
एकाने महाग विकायचे,
हा चांगलाच धंदा आहे !
वर परत मखलाशी
तू जगाचा पोशिंदा आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

लोकशाहीचा रास्ता रोको

कुणाच्या पायी राज्यघटना,
कुणाच्या हाती राजदंड असतो.
कुणा कुणाला दोष द्यावा?
आपल्याला लोकशाहीचा कंड असतो.

कुणाला चर्चा हवी आहे,
कुणाला चर्चा नको आहे !
हा गोंधळातला गोंधळ म्हणजे
लोकशाहीचा रास्ता रोको आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, December 2, 2010

नाका-बंदी

तिथे तिथे वाटमारी असेलच
जिथे जिथे संधी आहे.
काही का होईना टोलवाल्यांची
आता नाकाबंदी आहे.

उपोषणाच्या इशार्‍याचे
असे त्वरित फळ आहे !
उपोषणाची चेष्टा नको
त्यात नैतिक बळ आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

daily vatratika...29jane2026