Monday, October 3, 2022

नवरात्रातली बायकालॉजी.... मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
---------------------------

नवरात्रातली बायकालॉजी

पहिली विचारते दुसरीला,
उद्याचा रंग कोणता आहे?
सांगायचीच गरज नाही,
अकलेची किती घनता आहे?

झिपऱ्या बडवतात टिपऱ्या,
ज्या वैचारिक उपऱ्या आहेत.
खालपासून वरपर्यंत,
सगळ्या गोष्टी आपऱ्या आहेत.

जेवढ्या मॉड;तेवढ्या ऑड,
त्याहूनही त्या फ्रॉड आहेत!
आपले उद्धारकर्ते सोडून,
त्यांचे भलतेच गॉड आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-8058
दैनिक झुंजार नेता
3ऑक्टोबर2022 

राजकीय धुमश्चक्री... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

राजकीय धुमश्चक्री

बुरुज कोसळले गेले,
बालेकिल्ले ढासळले गेले,
गडाची पडझड बघून,
किल्लेदारी ढिसाळले गेले.

आपल्याच सावलीशी,
आपलेच वैर झाले.
वर्मावरचा घाव बघून,
सैनिकही सैरभैर झाले.

घरभेदी फितूर तरी,
आपला गड शाबूत आहे !
सेनापतींनी भरवसा,
सेना आपल्या काबूत आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6597
दैनिक पुण्यनगरी
3ऑक्टोबर2022

 

Sunday, October 2, 2022

राक्षसी इरादे... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

राक्षसी इरादे

अकलेचे निघाले दिवाळे,
ज्यांची बुद्धी गहाण आहे.
त्यांना आपापला धर्म,
संविधानापेक्षा महान आहे.

त्यांना धर्मनिरपेक्षता नको,
त्यांना धार्मिक राष्ट्र हवे आहे.
त्यासाठीच अकांड तांडव,
त्यासाठीच डावे उजवे आहे.

त्यासाठीच विष पेरणी,
त्यासाठीच बुद्धीभेद आहे !
बिनडोक समर्थकांचा,
त्यांचा रात्रंदिवस शोध आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8057
दैनिक झुंजार नेता
2ऑक्टोबर2022

 

सुट्टी आणि जयंती... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

सुट्टी आणि जयंती

सुट्टीच्या दिवशी जयंती आली की,
कर्मचारी कासावीस होऊ लागतात.
आपली हक्काची सुट्टी गेल्याचा दोष,
थेट महापुरुषांनाच देऊ लागतात.

महापुरुषांच्या त्यागाच्या कथा,
आज सर्वांसाठीच खोट्या झाल्या.
राष्ट्रीय महापुरुषांपेक्षाही,
आजकाल सुट्ट्या मोठ्या झाल्या.

महापुरुषांनी कर्मचाऱ्यांचे दुःख,
तेंव्हाच लक्षात घ्यायला हवे होते!
किमान शनिवार रविवार सोडून,
त्यांनी जन्माला यायला हवे होते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6596
दैनिक पुण्यनगरी
2ऑक्टोबर2022

 

Saturday, October 1, 2022

घराणेशाहीचा न्याय.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

घराणेशाहीचा न्याय

पक्ष नवा असो की जुना,
घराणेशाही काही सुटत नाही.
पुन्हा पुन्हा तेच सांगायला,
आम्ही काही काथ्या कुटत नाही.

दुसऱ्याची ती घराणेशाही,
आपला तो कर्तृत्त्वाला न्याय आहे?
लोकशाही ते खोकेशाही,
एकसारखेच नाही तर काय आहे?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8056
दैनिक झुंजार नेता
1 ऑक्टोबर2022

 

धार्मिकतेची मार्केटिंग... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

धार्मिकतेची मार्केटिंग

धार्मिकतेची झाली मार्केटिंग,
धर्म पोट भरण्याचे साधन आहे.
लोकांच्या भोळ्या धार्मिकतेला,
पुन्हा नवे नवे आधण आहे.

धार्मिकतेला आधण येताच,
आनंदाला उकळ्या फुटू लागतात.
गिऱ्हाईकांची झुंबड पाहून,
आपले नवे दुकान थाटू लागतात.

धार्मिकतेच्या बाजारामध्ये,
नव्या दलालांची नवी गर्दी आहे!
सलामत रहे दोस्ताना हमारा...
धर्माला दलालांची वर्दी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6595
दैनिक पुण्यनगरी
1 ऑक्टोबर2022

 

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...