Monday, July 13, 2009

निळू फुले:एक श्रद्धांजली

निळू फुले:एक श्रद्धांजली

निळूभाऊ,
तुम्ही नायक असूनही
खलनायकाचाच.....
अभिनय करीत राहिलात...
तोही एवढा जिवंत की,
गावाकड्च्या आया-बाया ..तुमच्या नावनं बोटं मोडायच्या...
सैतान..राकीस म्हणायच्या तुम्हाला !
निंळूभाऊ एवढा रांगडा आणि अस्स्ल सलाम
कुणालाच घेता आला नाही..घेताही येणार नाही!
तुम्ही खलनायकांवर प्रेम करायला शिकविलेत..
नाही प्रेम करायला भाग पाडलेत !!
”मास्तर..वाड्यावर या..."
"गं...sssssssssssssss साजणी......"
असे सूर भिनलेत रोमारोमांत !
तुमचा कुणाशी सामना नव्हता...
कसल्या पिंजर्‍यात अडकला नाहीत....
तुम्ही रसिकांच्या सिंहासनावर म्हणूच..चिरतंन स्वार आहात...स्वार रहाल..अगदी चिरंतन !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, July 12, 2009

हासेगावचा रडकेपणा

***** आजची वात्रटिका *****
**********************

हासेगावचा रडकेपणा

हा मानवतेचा नाही,
अमानवतेचा अविष्कार आहे.
एड्स बाधित विद्यार्थ्यांवर
सार्‍या गावचा बहिष्कार आहे.

एड्सचा बागुलबुवा होतोय
हे कुणासाठीच ठीक नाही !
जे भोगतात हे दु:ख सारे
त्यांची त्यात काहीच चूक नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, July 11, 2009

लोकसंख्या नियंत्रणाचे उपाय

***** आजची वात्रटिका *****
**********************

लोकसंख्या नियंत्रणाचे उपाय

काम चालु,रस्ता बंद
हे जेंव्हा घोषवाक्य होईल.
लोकसंख्या नियंत्रणात आणणे
तेंव्हाच कुठे शक्य होईल.

समलैंगिकतेच्या मान्यतेमुळेही
एक गोष्ट नक्की घडणार नाही !
लोकसंख्येची मुळीच चिंता नको
ती तर मुळीच वाढणार नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

एटी-केटी

***** आजची वात्रटिका *****
**********************


एटी-केटी

दहावी-बारावीच्या मुलांच्या कपाळी
आता नापासाचा शिक्का बसणार नाही.
आषाढीबरोबर कार्तिकीच्या
वारीचाही कपाळी बुक्का बसणार नाही.

मुलांची वर्षॆ वाया जाऊ नयेत
म्हणून ही कल्पना तर भारी आहे !
नाहीतरी पहिली ते दहावीला
सध्याही 'एटी-केटी' च तर जारी आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, July 10, 2009

काव्यात्मक न्याय

***** आजची वात्रटिका *****
**********************

काव्यात्मक न्याय

समलैंगिक संबंधांच्या मान्यतेने
आता वेगळेच व्हायला लागले.
समलिंगी प्रणयाच्या कविताही
कवी नव्याने लिहायला लागले.

त्या कविता कशा असतील?
मनातल्या मनात वाचू शकता !
तेच काय़ ? तुम्हीसुद्धा,
मनातल्या मनात रचू शकता !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, July 8, 2009

घरगुती बजेट

***** आजची वात्रटिका *****
**********************

घरगुती बजेट

म्हणायला द्वितंत्री कारभार,
तसा तो एकतंत्री असतो.
घरोघरी गृहमंत्री हाच
पदसिद्ध अर्थमंत्री असतो.

गृहमंत्र्याच्या हातातच
अर्थमंत्र्याच्या नाड्या असतात.
ज्यांना हे जमत नाही
त्या बिचार्‍या वेड्या असतात.

घरगुती बजेटचा अंदाज तरी
सांगा कुठे रास्त असतो ?
आपत्कालीन खर्चच
बजेटपेक्षा जास्त असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, July 7, 2009

गुरू-दक्षिणा

** गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व गुरुतुल्यांना विनम्र वंदन आणि आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा **



***** आजची वात्रटिका *****
**********************


गुरू-दक्षिणा

जिकडे तिकडे अध्यात्मिक गुरूंचे
पेवच्या पेव फुटलेले आहे.
शिष्य़ांनाही कळत नाही
आपले काय काय लुटलेले आहे?

तन-मन-धन
लुटायचे काहीच सोडीत नाहीत !
आसपासच पुरावे आहेत
आम्ही काही बाता झॊडीत नाहीत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, July 6, 2009

सारेच धक्कादायक

***** आजची वात्रटिका *****
**********************

सारेच धक्कादायक !

माहिती आणि तंत्रज्ञानाचा
जरी जगभर डंका आहे.
तरी मतदान यंत्रांच्या
विश्वासार्हतेवर शंका आहे.

त्यांचा दोष नाही
शेवटी यंत्र ती यंत्र आहेत !
पराभवाच्या समर्थनाची
ही धक्कादायक तंत्र आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

++++++++++++++++++++++++++++++
प्रिय,
सप्रेम नमस्कार...... चला..... ’मनमोकळं’ व्हा... एक नवे व्यास-पीठ ....एक नवा विचारमंच..आपली वाट बघत आहे..चला सामिल व्हा आपल्या एका नव्या प्रवासाला..आपण समृद्ध होवु......इतरांनाही समृद्ध करूया...आधिक माहितीसाठी माझ्या प्रोफाईलला भेट द्या !! http://www.orkut.co.in/Main#Community.aspx?rl=cpn&cmm=91738275

Sunday, July 5, 2009

दळभद्री विचार

***** आजची वात्रटिका *****
**********************

दळभद्री विचार

मुंबईतला सागरी पूल तर
दोन्ही कॉंग्रेसला जोडू लागला.
रस्त्यावरच्या भिकार्‍यांना मात्र
नवाच प्रश्न पडू लागला.

नामकरणाच्या राजकारणाशिवाय
राजकारण्यांना जगता येणार नाही !
भिकार्‍यांचे दु:ख हे की,
त्या पुलाखाली बसून
भिक मागता येणार नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, July 4, 2009

ममताशून्य रेल्वे अर्थसंकल्प

***** आजची वात्रटिका *****
**********************

ममताशून्य रेल्वे अर्थसंकल्प

लालू तर चालूच होता
बॅनर्जींनाही ममता नाही.
जरा रेल्वे अर्थसंकल्प बघा
तुम्हांलाही दिसेल समता नाही.

आपलाच दाम खोटा,
म्हणूनच असे फसवित आहेत !
मुंबईत परप्रांतीयांचे लोंढे
डब्या-डब्याने घुसवित आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, July 3, 2009

दर्शनाचा (दुजा) भाव

***आषाढी एकादशीच्या हार्दीक शुभेच्छा***
*****************************

***** आजची वात्रटिका *****
**********************

दर्शनाचा (दुजा) भाव

पंढरीच्या वारकर्‍यांना
काय दर्शनाची आस नाही?
व्ही.आय.पी.पासेसचे धोरण
म्हणूनच तर पास नाही.

भक्तांच्या भक्तीमध्ये
असा दुजाभाव आहे !
भेदाभेद अमंगळ
हा तर केवळ आव आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

उपास-तपास

***** आजची वात्रटिका *****
**********************

उपास-तपास

उपवासाच्या दिवशीच
नवनवे मेनू स्फूरू लागतात.
साबुदाण्याने उसळी मारताच
बिच्चारे चिप्स कुरकुरू लागतात.

वड्याचे तेल असे
वांग्यावरती काढले जाते !
नायलॉनच्या जाळीने
पुण्य पदरी पाडले जाते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

समलैंगिकतेची मान्यता

***** आजची वात्रटिका *****
**********************

समलैंगिकतेची मान्यता

आपण पुढा्रलेलो आहोत
याची प्रचिती यायला लागली.
पोटाच्या प्रश्ना ऎवजी
चोटाची चर्चा व्हायला लागली.

आता लैंगिकच नाही तर
समलैंगिक शिक्षण द्यावे लागेल ?
कितीही हादरलो,भेदरलो तरी
हे नव्याने समजून घ्यावे लागेल !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, July 2, 2009

सेतुनामा

***** आजची वात्रटिका *****
**********************

सेतुनामा

पुलाचे ठेवा,मुलाचे ठेवा
वाटलेच तर बापाचे ठेवा.
निष्टा दर्शविण्यासाठी
नावचं गांधीछापाचे ठेवा.

आम्हांला’गांधी’ची ऍलर्जी नाही
ती तुमच्या लाळघोटेपणाची आहे !
तुम्हीच खोटेपणा करता;
चर्चा मात्र,आमच्याच
वैचारिक छोटेपणाची आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, July 1, 2009

एका वारकर्‍याची विनंती

***** आजची वात्रटिका *****
**********************

एका वारकर्‍याची विनंती

भावभक्तीच्या दुधात
उगीच मिठाचा खडा नको.
वारकर्‍यांच्या ताकदीवर
अप्रस्तुत लढा नको.

भावना भडकविणे
हा साधासुधा खेळ नाही.
वादासाठी वाद घाला
पण ही वादाची वेळ नाही.

संत-सज्जनांनो, तुमचे वाद
तुमच्यापाशी राहू द्या हो !
आम्हां विठूमाऊलीचे दर्शन
डोळा भरून घेऊ द्या हो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

जीवन गौरव

***** आजची वात्रटिका *****
**********************

जीवन गौरव

अर्धे तुला,अर्धे मला
असे पुरस्कार लाटले गेले.
तरूण तुर्कांना देखील
जीवन गौरव वाटले गेले.

असा आमचा नाही तर
टाळलेल्यांचा दावा आहे !
हा गणिमी नाही तर
मित्रांचाच कावा आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, June 29, 2009

विठ्ठ्ला पांडूरंगा

***** आजची वात्रटिका *****
**********************

विठ्ठ्ला ss पांडूरंगा !

पंढरीच्या वाटेवरी
भडकवली मस्तकं
जुनीच पुस्तकं
उचकुन ॥१॥

वड्याचे तेल वांग्यावर
प्रकार हे सुरू
कोण कुणाचे गुरू?
जगजाहिर ॥२॥

भोळे वारकरी
त्यांच्या भक्तीची लुट
पडली फुट
दिंड्यांमध्ये ॥३॥

तुझ्याच भक्तांना
तुच सांग पांडूरंगा
नको हा दंगा
भक्तीसोहळ्यात ॥४॥

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

भांडा सौख्य भरे

भांडा सौख्य भरे

लहान-लहान मुलांसारखे
एकमेकांना चिड्वू लागले.
वास्तवाची जाण असतानाही
स्वबळाची राड उडवू लागले.

भांडा सौख्य भरेच्या नाटकाचा
प्रयोग तर हीट झाला आहे !
स्वबळावर लिहून लिहून
आम्हांलाही वीट आला आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

मायकल जॅक्सन

मायकल जॅक्सन

त्याचे जगणेही वाद्ग्रस्त होते
त्याचे मरणेही वादग्रस्त आहे.
त्याच्या चाहत्यांसाठी तर
हा फक्त देहाचाच अस्त आहे.

जे वेडावले त्याच्यासाठी
ते खरोखरच धन्य होते !
भारतात थिरकले पाय त्याचे
ते शिव उद्योगाचे सौजन्य होते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

अरे चोरांनो.......



अरे चोरांनो.......

चोरली कुणाची कविता तर
निदान चोरी खपली पाहिजे.
कविता चोरावी अशी की,
ती आपल्याला झेपली पाहिजे.

चोरी ती चोरीच
कधी ना कधी फुटली जाते.
उंटाचा मुका घेतल्याची गोष्ट
वाचकांनाही पटली जाते.

इतर चोर्‍यांप्रमाणेच
कवितेचीही चोरी पचत नाही !
कारण काळीज हालल्याशिवाय
कविता कधी सुचत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)


Sunday, June 28, 2009

दोघांत तिसरा.....

***** आजची वात्रटिका *****
**********************

दोघांत तिसरा.....

युतीच्या संसारातला
हा टर्निंग पॉंईट म्हणूया.
धनुष्य़बाण म्हणाला कमळाला,
आता दोघात तिसरा आणूया.

एवढ्या वर्षाचे प्लॅनिंग
त्यालाच आता तडा आहे !
अख्खा महाराष्ट्र जाणतो
नेमका कुणामुळे हा राडा आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
http://suryakantdolase.blogspot.com

Saturday, June 27, 2009

जागृतीचा सवाल

***** आजची वात्रटिका *****
**********************

जागृतीचा सवाल

देव-देवतांचे अनुक्रमही
सोयीनुसार लावले जातात.
फक्त जागृत देवस्थानेच
म्हणे भक्तांना पावले जातात.

देवधर्माचा धंदा करायला तर
काही लोक टपलेले असतात !
काही देव जागृत तर
बाकीचे काय झोपलेले असतात ?

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

http://suryakantdolase.blogspot.com

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...