Friday, May 6, 2022

दवा आणि दुवा....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

दवा आणि दुवा

तमाम आयांचा प्रॉब्लेम,
भोंगा बंदीमुळे सॉल्व झाला.
पोरांनी भोंगा लावताच म्हणातात,
तो बघा राज ठाकरे आला रे...
राज ठाकरे आला...!!

मागे पडली भोकाडी,
इतिहासजमा बागुलबुवा आहे !!
तमाम आया- बायांचा,
आता राज ठाकरेंना दुवा आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7920
दैनिक झुंजार नेता
6मे2022

 

न्यूज चॅनल..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
न्यूज चॅनल
पराचा करतात कावळा,
राईचाही पर्वत असतो.
दोरीचा साप केल्याने,
विश्वास हरवत असतो.
चोथा चघळता चघळता,
प्रेक्षकांचा अंत पाहून घेतात
चॅनलवाले आणि पॅनलवाले,
आपले हात धुऊन घेतात.
टीआरपीच्या मोहापोटी,
विश्वासार्हतेचा घोट आहे !
तुमचा तुमच्यावर नसला तरी,
प्रेक्षकांच्या हाती रिमोट आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6467
दैनिक पुण्यनगरी
6मे2022

 

Thursday, May 5, 2022

वाजवा रे वाजवा... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

वाजवा रे वाजवा

सुप्रीम कोर्टाने आदेश दिला,
सुपारी फुटली,मुहूर्त काढा.
कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
चला एकदाचे लढा रे लढा.

बाशिंग तर गुडघ्यालाच होते,
अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले!
वाजवा रे वाजवा म्हणीत
सगळे उतावळे बावळे झाले!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7919
दैनिक झुंजार नेता
5मे2022

 

गळ्या शप्पथ सांगतो...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

गळ्या शप्पथ सांगतो...

विश्वासाच्या बुरख्याआड,
घातकी लोक लपू शकतात.
गळ्यात गळे घालणारेच,
आपला गळा कापू शकतात.

मग दगा.. दगा म्हणीत,
स्वतःवरतीच चिडू नका.
सवत:लाच दोष देत देत,
नसता गळा काढू नका.

केसाने गळा कापणे,
ही अविश्वसनीय केस आहे !
मागच्यांनो जरा नीट बघा,
पुढचा कुणा कुणाला ठेस आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6466
दैनिक पुण्यनगरी
5मे2022

 

Wednesday, May 4, 2022

इरादा...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
इरादा
कालचा धार्मिक भोंगा,
आज सामाजिक झाला.
यातूनच तर त्यांचा,
इरादा लीक झाला.
इरादा पक्का असला तरी,
इरादा फारसा नेक नाही !
कालचा आणि आजचा,
पवित्रा काही एक नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-7918
दैनिक झुंजार नेता
4मे2022

 

जशास तसे...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
जशास तसे
मी बायकोला म्हणालो,
तुझाही भोंगा वाजवू नको.
तुझा डेसिबल वाढवून,
नसता गोंधळ माजवू नको.
बायको म्हणाली,जसे तुमचे,
तसेच तर माझे आहे.
तुमचा केवळ भोंगा नाही,
तो तर चक्क डी.जे आहे.
बायकोने भोंगा बंद करताच,
डी.जे. ला विराम द्यावा लागला!
असह्य आणि स्मशान शांततेचा,
सक्तीने अनुभव घ्यावा लागला !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6464
दैनिक पुण्यनगरी
4मे2022

 

Tuesday, May 3, 2022

गचाळ सवय....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

गचाळ सवय

एकजात सगळे वाचाळवीर,
वाट्टेल तसे वाचाळू लागले.
मुद्द्यावरून गुद्द्यावर येता-येता
वाचाळवीर पिचाळू लागले.

जसे वाचाळणे बरे नाही,
तसे पिचाळणेही बरे नाही.
वाचाळांना पक्के ठाऊक असते,
आपले काहीही खरे नाही.

तरीही त्यांना वाचाळावे लागते,
तरीही त्यांना पिचाळावे लागते !
आपल्या राजकीय स्वार्थापोटी,
वातावरण गचाळावे लागते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
सूर्यकांती
3मे2022

 

ऐतिहासिक चूक....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------
ऐतिहासिक चूक
भविष्य अंध:कारमय दिसतच,
ते इतिहास आठवू लागले.
डोके ठिकाणावर नसल्यासारखे,
ते इतरांचे डोके उठवू लागले.
कालचा वेगळा लूक होता,
आजचा वेगळा लुक आहे !
आपले अज्ञान उघडे करणे,
ही तर ऐतिहासिक चूक आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
फेरफटका-7917
दैनिक झुंजार नेता
3मे2022

 

Monday, May 2, 2022

तोंडपूजा... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------
तोंडपूजा
खोटे बोलता बोलता,
बघा तोंड सुजे इथे.
तोंडावर गोड बोलती
बघा तोंडपुजे इथे.
लबाडांना साव म्हणती,
सारे लबाड इथे.
कौतुक करता करता.
ङ्काटे दाभाड इथे.
किती हे लांगूलचालन?
किती बिभत्स स्तुती इथे?
ज्यांना पूजावे खेटराने,
त्यांच्याच आरत्या गाती इथे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
 

Sunday, May 1, 2022

मचाळा

आजची वात्रटिका --------------------- मचाळा जसे ऋषीचे कुळ, आणि नदीचे मूळ विचारू नये. तसे राजकारण्यांचेही, राजकीय खूळ विचारू नये. राजकीय खुळामुळेच, सगळा खुळखुळा झाला आहे ! कोण येडे?कोण खुळे? राजकीय मचाळा झाला आहे !! -सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 --------------------------------------- फेरफटका-7916 दैनिक झुंजार नेता 1मे2022
 

महाराष्ट्र माझा....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

महाराष्ट्र माझा....

आज याची उद्या त्याची,
खाजवतो महाराष्ट्र माझा.
जमतील तसे भोंगे,
वाजवतो महाराष्ट्र माझा.

गलिच्छ राजकारण,
सोसतो महाराष्ट्र माझा.
राजकीय शिवीगाळ ऐकून
आ वासतो महाराष्ट्र माझा.

घोटाळ्यांच्या वेटोळ्यात,
अडकला महाराष्ट्र माझा.
स्वतःच स्वतःवरती,
भडकला महाराष्ट्र माझा.

अब्रुचा खेळखंडोबा बघून,
आज लाजतो महाराष्ट्र माझा!
काल वेगळा,आज वेगळा
आज गाजतो महाराष्ट्र माझा !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6464
दैनिक पुण्यनगरी
1मे2022

 

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...