Tuesday, May 16, 2023

दंगलखोर..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

दंगलखोर

दंगल पेटवणारे वेगळे असतात,
अफवा उठवणारे वेगळे असतात
दंगल बळींचा कसला जमाखर्च?
दंगल वठवणारे वेगळे असतात.

जे करतात दंगल में मंगल,
ते विकृत दर्शनी वेगळे असतात.
मास्टर माईंड असतो पडद्याआड,
मात्र सकृत दर्शनी वेगळे असतात.

काही धर्मांध;काही जात्यांध,
काही गुंड,काही पुंड असतात!
दंगलखोर समजतात स्वत:ला मर्द,
प्रत्यक्षात दंगलखोर षंढ असतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
चिमटा-6807
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
16मे2023
 

Monday, May 15, 2023

कर्नाटक इफेक्ट...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

कर्नाटक इफेक्ट

कर्नाटकाच्या एका विजयाने,
सगळे विरोधक चार्ज झाले आहेत.
छोटे मोठे सगळे मतभेद,
बघता बघता वर्ज्य झाले आहेत.

होत्या नव्हत्या त्या धुसफुशी,
हळूहळू निवळू लागल्या आहेत.
ढील्या झालेल्या वज्रमुठी,
नव्याने आवळू लागल्या आहेत.

कर्नाटकाचा एक विजय,
जणू जादूची कांडी होतो आहे !
दोस्ता आणि दोस्ता सोबत,
शत्रूचा शत्रूही सोबत येतो आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8255
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
15म22023
 

सबूरीचा सल्ला....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

सबूरीचा सल्ला

विजयाचे व्यसन लागले की,
एखादा पराभवही पचत नाही.
मग काय बरळावे? काय नाही?
हे सुद्धा मग नीट सुचत नाही.

विजयाचा नक्की जल्लोष करावा,
पण पराभवाचाही क्लेश होवू नये.
विजयावर नक्कीच प्रेम करावे,
पण पराभवाचाही द्वेष होवू नये.

विजयाचे आणि पराभवाचेही,
मंथन आणि आत्मचिंतन व्हावे !
ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू,
याचे स्मरण अगदी चिरंतन व्हावे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
चिमटा-6806
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
15मे2023
 

पतीती माझे सभापती..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

Sunday, May 14, 2023

जागते रहो...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

जागते रहो

नाही नाही म्हणता म्हणता,
मतदार राजा काहीही करू शकतो.
त्याचा कुणी नाद करायचा नाही,
कुणीही जिंकू आणि हरू शकतो.

जो जीता वो सिकंदर हे खरे,
पण मस्ती सोबतच माज नको.
कुणीही उतू नका;मातू नका,
सत्तेचीही नसती खाज नको.

काल परवाचे दिवससुद्धा,
उद्या उलटे सुलटे फिरू शकतात !
जे प्रतिमा निर्मिती करतात,
तेच प्रतिमाभंजन करू शकतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8254
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
14म22023
 

कर्नाटक स्टोरी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

कर्नाटक स्टोरी
एका 'कर्नाटक स्टोरी' पुढे,
कोणतीही स्टोरी चालली नाही.
सामान्य जनतेने करून दाखवले,
जनता उघड काही बोलली नाही.
भाकरी फिरवायची परंपरा,
कर्नाटकाने पुन्हा पाळली आहे.
पप्पू भी मेरिट में आ सकता हैं,
फेलकऱ्यांना गोष्ट कळली आहे.
हेही खरे की, बेगानी शादी में,
अब्दुल्ला दिवाना दिसला आहे !
बजरंग बलीच्या गदेचा फटका,
जसा बसायचा तसा बसला आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
चिमटा-6806
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
14मे2023

Saturday, May 13, 2023

खुळचटपणा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

खुळचटपणा

कायदाही बालविवाहांचा,
बाल बाका करू शकत नाही.
सगळेच राजी असल्यावर,
कायदा कुणाला पूरू शकत नाही.

कायद्याचे हात लांब असले तरी,
त्याचेही हात लुळे पडू शकतात !
सुशिक्षित असोत व अशिक्षित,
या भानगडीत खुळे पडू शकतात!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
दैनिक वात्रटिका
13मे2023
 

नैतिकतेची चढाओढ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

नैतिकतेची चढाओढ

राजकीय नैतिकतेवरच्या,
प्रतिक्रियाच बोलक्या आहेत.
परस्परांवर कुरघोड्या करणाऱ्या,
प्रतिक्रियाही शेलक्या आहेत.

एकमेकांच्या नैतिकतेचा बुरखा,
ते फाड फाड फाडायला लागले.
अंगावरचे उरले सुरलेसुद्धा,
ते जाहीरपणे फेडायला लागले.

जशी छिनालांच्या खांद्यावर,
आज नैतिकतेची पालखी आहे !
नैतिकतेची चढाओढ लागली,
विजयपथावर छिनालकी आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
दैनिक वात्रटिका
13मे2023
 

Friday, May 12, 2023

लोकशाही वाचली पाहिजे...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

लोकशाही वाचली पाहिजे

खाताडही म्हणू लागले,
लोकशाही वाचली पाहिजे.
गाताडही म्हणू लागले,
लोकशाही वाचली पाहिजे.

गुंडही म्हणू लागले,
लोकशाही वाचली पाहिजे.
षंढही म्हणू लागले,
लोकशाही वाचली पाहिजे.

छापणारेही म्हणू लागले,
लोकशाही वाचली पाहिजे.
ढापणारेही म्हणू लागले,
लोकशाही वाचली पाहिजे.

सगळ्यांचीच तळमळ,
सगळ्यांनाच पचली पाहिजे!
आधी नेक व्हा;आधी एक व्हा,
लोकशाही वाचली पाहिजे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8253
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
11म22023 

आम्ही भारताचे लोकहो..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

आम्ही भारताचे लोकहो..

कुणाचा झाला तांत्रिक विजय,
कुणाचा तांत्रिक पराभव आहे.
निकालाचा अर्थ लावता लावता,
चक्क उन्हाळ्यात सुद्धा हीव आहे.

निकाल पटो वा ना पटो,
कोणीच काही बोलायचे नाही?
आम्ही भारताचे लोक हो,
आता तरी म्हणा,हे चालायचे नाही.

हा निकाल साधासुधा नाही,
हा निकाल अगदी सुप्रीम आहे.
सगळे दूध नासलेले असताना,
कसे म्हणायचे,त्यात क्रीम आहे?

बलात्कार चुक,बलात्कारी दोषी,
डोळ्यादेखत सगळे पाप आहे!
लोकशाहीच्या विजयासाठी म्हणा,
मीच होणाऱ्या मुलाचा बाप आहे!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
चिमटा-6804
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
12मे2023
 

Thursday, May 11, 2023

दुहेरी मापदंड....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
दुहेरी मापदंड
जाती धर्माच्या चष्म्यातून,
सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात.
आपल्या सगळ्या निष्ठा,
जाती धर्मावर वाहिल्या जातात.
ज्याला त्याला जाती धर्माचा,
नको नको तेवढा कंड असतो !
कोणत्याही घटनेला लावायला,
त्यांचा दुहेरी मापदंड असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8252
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
11मे2023

 

निकालाची तिसरी बाजू...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

निकालाची तिसरी बाजू

त्याचाच न्यायदेवतेवर विश्वास,
जो कोर्टात कधीच हरला नाही.
जो हरतो तो म्हणत राहतो,
सत्याला वालीच उरला नाही.

सत्य आणि असत्यातले अंतर,
कोर्टाच्या निकालावर ठरले जाते.
कोर्टाचा निकाल म्हणजेच सत्य,
अगदी पक्के गृहीत धरले जाते.

कधी खालचे वर हारले जातात,
कधी वरचे खाली हारले जातात!
सिद्ध केलेल्या निकालालाच,
न्यायाचे शिक्के मारले जातात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
चिमटा-6803
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
11मे2023
 

Wednesday, May 10, 2023

अवकाळ वृत्ती....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

अवकाळ वृत्ती

यंदाच्या अवकाळी पावसाने,
बळीराजाचे बूड बसवले आहे.
वेधशाळेशी दोस्ती करून,
पंचांगवाल्यांना फसवले आहे.

पाऊस झालाय वादळी,
वर्तन परिस्थिती जन्य नाही!
जणू काही ग्रंथ प्रामाण्य,
अवकाळीला मान्य नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8249
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
10मे2023
 

आघाडीतील खेचाखेच...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

आघाडीतील खेचाखेच

परस्पर विरोधी राजकारण,
एका पेक्षा एक झकास आहे.
तीन तिघाडे काम बिघाडे,
हाच त्यांचा महाविकास आहे.

आघाडीकडून बिघाडीकडे,
हाच बाणा देहबोलीत आहे.
एकाकडून दुसऱ्याच्या हाती,
अगदी आयतेच कोलीत आहे.

नेतेच एकमेकांना कोलू लागले,
कार्यकर्त्यांपुढे मात्र पेच आहे !
महाविकास राहिला बाजूला,
आघाडीत रोज खेचाखेच आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------
चिमटा-6802
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
10मे2023
 

Tuesday, May 9, 2023

वैधानिक इशारा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
वैधानिक इशारा
खोट्या नाट्या स्टोऱ्यासुद्धा,
खऱ्या म्हणून खपवल्या जातात.
खऱ्या खऱ्या स्टोऱ्यासुद्धा,
खोट्या म्हणून लपवल्या जातात.
भाकडकथा ऐकून पाहून,
लोकसुद्धा उल्लू बनू शकतात.
उल्लू बनलेले लोकच,
असत्याला सत्य म्हणू शकतात.
तरीही काश्मीरपासून केरळपर्यंत,
विवेकीवादी फसूच शकत नाही!
कादंबरी आणि चित्रपट,
हा इतिहास असूच शकत नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-8248
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
9मे2023

 

हनी ट्रॅपचे विश्लेषण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

हनी ट्रॅपचे विश्लेषण

रंगेल सावज दिसले की,
तिथे 'हनी ट्रॅप' लावला जातो.
ज्याचा त्याचा रंगेलपणा,
ज्याचा त्यालाच भोवला जातो.

स्कीनच करन्सी झाली की,
चलन -वलन बिघडले जाते.
भय आणि लज्जा संपताच,
स्वर्गाचे दारही उघडले जाते.

कळत आणि नकळतही,
कधी कधी असंगाशी संग होतो!
सावज सटकू लागले की,
हनी ट्रॅपचाच विनयभंग होतो!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------------
चिमटा-6801
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
9मे2023
 

Monday, May 8, 2023

महाभारताच्या आवृत्त्या...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

महाभारताच्या आवृत्त्या

काका असो वा पुतण्या असो,
सगळेच बेभरोशाचे काम आहे.
नात्यामुळे गोत्यात येणे,
हा प्रकार तर खुलेआम आहे.

काका पुतण्या कुठलाही असो,
सगळीकडे सारखीच तऱ्हा आहे!
कुणाच्या कौटुंबिक महाभारताचा,
पंचनामा न केलेलाच बरा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8247
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
8मे2023
 

मिमिक्री शो...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

मिमिक्री शो

पक्षा पक्षाच्या जाहीर सभा,
सभा सोडून मिमिक्र्या होवू लागल्या.
राजकीय सभ्यतेच्या तर,
पार ठिकऱ्या ठिकऱ्या होवू लागल्या.

एकाचे बघून दुसऱ्यालाही
हल्ली मिमिक्रीची हुक्की येते आहे.
टावाळा आवडे विनोद,
ही उक्तीही पुन्हा पक्की होते आहे.

नक्कलच झाली प्रचाराची शक्कल,
जणू लोकांची अक्कल गहाण आहे!
वाचाळ आणि कुचाळविरांपेक्षाही,
आजकाल मिमिक्रीवाला महान आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6800
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
8मे2023
 

Sunday, May 7, 2023

शिल्प आले धावून...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

शिल्प आले धावून

विरोधक म्हणतात, होणार नाही.
समर्थक म्हणतात,होणार आहे,
बारासूचे मात्र हो नाही चाललेले,
सध्या तरी निश्चिंत नाणार आहे.

जो तो आगीत तेल घालतोय,
लोकांना कसेही नाचवू शकतात!
आता तर फक्त कातळ शिल्पच,
नाणारला यातून वाचवू शकतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8246
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
7मे2023
 

डीजाळलेली गाणी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

डीजाळलेली गाणी

आपल्या हृदयात ठसलेली गाणी,
आपल्या हृदयावर आदळू लागली.
जनताही डीजेच्या तालावरतीच,
जशी वाट्टेल तशी खिदळू लागली.

आपल्याला वाटते डीजेमुळे,
जुनी गाणी उजाळली जात आहेत !
खरी वस्तुस्थिती अशीआहे की,
जुनी गाणी डीजाळली जात आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------------
चिमटा-6799
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
7मे2023
 

Saturday, May 6, 2023

चेकमेट ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
चेकमेट
राजकारण म्हणजे बुद्धिबळ,
ते कधीही चकवा देऊन जाते
त्याची चाल कळली नाही तर,
स्वतःचेच प्यादे होऊन जाते.
सगळेच मग उंटासारखे,
तिरके चालायला लागतात.
आपले अडीच घर सोडून,
घोडेही बोलायला लागतात.
सरळ चालणाऱ्या हत्तीलाही,
वझीर असल्याचे मोह होतात !
दुसऱ्याच्या इशाऱ्यावर प्याद्याही,
आपल्याच राजाला शह देतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
दैनिक वात्रटिका
6मे2023

 

एका भाकरीची फिरकी..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

एका भाकरीची फिरकी

उद्याचा काळच सांगू शकतो,
त्यांनी कुणाची जिरवली आहे?
जाळ अन धूर काढून,
त्यांनी भाकरी तर फिरवली आहे.

राजकारणात काहीही घडू शकते,
त्याचा कुठे कुणाला नेम आहे?
विरोधक नक्की म्हणू शकतात,
हा तर त्यांचा स्क्रिप्टेड गेम आहे.

निवृत्तीचा एक प्रश्न सुटला तरी,
अनेक प्रश्न उभे राहिलेले आहेत!
ज्यांना ज्यांना उद्याचे बघता येते,
त्यांनी त्यांनी ते पाहिलेले आहेत!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------------------
चिमटा-6798
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
6मे2023
 

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...