Friday 17 February 2012
सबकुछ दिखता है
दावे-प्रतिदावे
सोबत एक्झिट पोल होतो,
भल्याभल्यांचा अंदाज
मतदानयंत्रासमोर फोल होतो.
दवंडीच्या पहिलवानांचीही
मातीला पाठ लागते!
मतदान उघड झाले की,
कार्यकर्त्यांची वाट लागते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Thursday 16 February 2012
द्या टाळी !
प्रचाराचे मुद्दे सोडून
उखाळय़ा-पाखाळय़ा काढल्या जातात.
राजकीय कलगीतुरा रंगताच
हशा आणि टाळय़ा पडल्या जातात.
ते तर भुलवायलाच येतात
आपण सावध असावे लागते!
आपण दात काढीत राहिलो की,
टाळय़ा वाजवीत बसावे लागते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Wednesday 15 February 2012
निवडणूक खर्च
कोटींनी खर्चून
शेकडय़ात दाखविला जातो.
निवडणूक आयोगही
जनतेबरोबर ठकविला जातो.
खर्चिलेले दाखविले जातात
वाटलेल्यांची तर गणतीही नाही!
अंधार फार झाला तरी
कुणाकडे साधी पणतीही नाही!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Tuesday 14 February 2012
प्रेमसूत्र
प्रेमाच्या गावाकडे जाणारे
फाटेच फाटे असतात.
वर गुलाब फुलले तरी
खाली काटेच काटे असतात.
ना ट्वेंटी-ट्वेंटी, ना वन-डे,
प्रेम म्हणजे 'टेस्ट' असते!
तावून सुलाखून निघालेलेच
प्रेम ऑल दी बेस्ट असते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Monday 13 February 2012
चकवाचकवी
कुणी करून दाखवलं
कुणी वरून दाखवलं.
सगळे बघत असतानाही
कुणी चरून दाखवलं.
केले काय? झाले काय?
सगळी दाखवादाखवी आहे!
ठकास महाठकांची
ही जाहीर चकवाचकवी आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Sunday 12 February 2012
लोक(प्रतिनिधी)शाही
दगडापेक्षा वीट मऊ म्हणीत
प्रतिनिधी निवडावे लागतात.
ठरावीक पर्यायातूनच
प्रतिनिधी आवडावे लागतात.
अजून तरी लोकांच्या पुढे
दुसरा पर्याय नाही आहे!
ही कसली लोकशाही?
ही तर लोकप्रतिनिधीशाही आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
झेरॉक्स
पक्षीय जाहिरनामे म्हणजे
जनतेला जाहिर टोप्या असतात.
जुन्याच जाहिरनाम्यांच्या
झेरॉक्स कॉप्या असतात.
एकमेकांच्या जाहिरनाम्याची
जाहिर झेरॉक्स काढली जाते !
एकाने सोडली की,
सगळ्यांकडून सोडली जाते !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Saturday 11 February 2012
राजकीय खुजेपणा
दिल्लीतून गल्लीत येत
राजकारण करू लागले.
राष्ट्रीय नेतेसुद्धा
गल्लीबोळात फिरू लागले.
दिल्लीत राहून गल्लीची
त्यांना काळजी वाटू लागली!
राष्ट्रीय नेत्यांची उंची
हळूहळू घटू लागली!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Friday 10 February 2012
पक्षीय 'भाई'चारा
उमेदवारीची तिकिटं
अशा लोकांच्या हवाली आहेत.
जे उघड उघड
गुंड आणि मवाली आहेत.
तिकिटापुरत्या रामायणाचा
साक्षीदार भाई आहे!
वाल्याचे वाल्मिकी करण्याची
राजकीय पक्षांना घाई आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Thursday 9 February 2012
सुगीचे दिवस
जसे सुगीनंतर पाखरं
फडफडताना दिसतात.
तसे निवडणुकीनंतर कार्यकर्ते
तडफडताना दिसतात.
सततच्या निवडणुकांसाठी
कार्यकर्त्यांचे नवस असतात!
निवडणुका म्हणजे
सुगीचेच दिवस असतात!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Wednesday 8 February 2012
निष्ठेची सच्चाई
निष्ठेचा आणखी एक पैलू
मतदानात उमजला जातो.
ज्याची बोगसगिरी जास्त
तोच सच्चा समजला जातो.
जेवढे जास्त लुच्चे,
तेवढे जास्त सच्चे आहेत !
सर्वत्र कार्यकर्ता नावाचे
नेत्यांकडे बगलबच्चे आहेत !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
निवडणुकीचा आँखो देखा हाल
बोगस मतदानासाठी
कार्यकर्त्यांच्या उडय़ा पडल्या.
उमेदवारांच्या बापासा
कार्यकर्त्यांनी मिशा काढल्या.
दुसर्याच्या बापासाठी कार्यकर्ते
एकमेकांना खुट्टय़ा मारीत होते!
हा आँखो देखा हाल बघून
मतदानयंत्र डबल शिट्टय़ा मारीत होते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Tuesday 7 February 2012
’बंडल’बाजी
कालही खबर ताजी होती,
आजही खबर ताजी आहे.
मतदारांना भुलविण्यासाठी
बंडलबाजांची ’बंडल’बाजी आहे.
बंडलबाजांच्या बंडलबाजीवर
तुम्हांला वाटेल ही कोट्या आहेत !
पैसे घेणारांनो नीट बघा
घेतलेल्या नोटा खोट्या आहेत !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
विरोधाभास
तेच तेच चेहरे,
तेच तेच दांडे आहेत
जुन्याच दांडय़ाला
बदललेले झेंडे आहेत.
झेंडय़ांची अदलाबदली
बदललेले चिन्ह आहे!
राजकीय विरोधाभासाने
लोकशाहीच सुन्न आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Monday 6 February 2012
लोकपाल समर्थकांनो..
लोकपाल समर्थकांनो..
टाकायचे म्हणून टाकू नका,
अन्यायापुढे झुकू नका.
लोकपालाच्या समर्थकांनो
तुमचे तरी मत विकू नका.
उतू नका, मातू नका
लोकपालाचा वसा टाकू नका.
'मै भी अण्णा, तू भी अण्णा'चा नारा
ठोकायचा म्हणून ठोकू नका.
खरेदीदार टपलेले आहेत
त्यांच्यात पैशांची धुंदी आहे!
लोकपालाच्या समर्थनाची
आणखी एक नामी संधी आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Sunday 5 February 2012
स्वागत असो!
पुणे तिथे काय उणे?
सगळे पुणे बघत होते.
जिथे एका आरोपीचेही
प्रचंड असे स्वागत होते.
नेत्याचे स्वागत करण्यास
कार्यकर्ता तर कटिबद्ध आहे!
आरोपीवरचे आरोप सोडू
बाकी सगळे काही सिद्ध आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मुद्द्याचे बोला
मुद्द्याची गोष्ट तर
ऐकायलाही मिळत नाही.
निवडणूका कोणत्या आहेत?
हे सुद्धा कळत नाही.
त्यांची खात्री अशी की,
जनता तर पागल आहे !
म्हणूनच कळीच्या मुद्द्यांना
बेमालुमपणे बगल आहे !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Saturday 4 February 2012
उमेदवारीची मोजणी
आपल्या गंजलेल्या मेंदूला
जरा पाणी पाजीत चला.
कुणाच्या घरात किती उमेदवार्या?
जरा निट मोजीत चला.
ते खानदानी नेते झालेत,
आपण खानदानी कार्यकर्ते आहोत !
आपल्याला विचारतो कोण?
जरी आपण कार्यकर्ते आहोत !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
साहित्यिकांना विनंती
केवळ हशा आणि टाळ्यांसाठी
लिहिणे बरे नाही.
केवळ साहित्यिक चाळ्यांसाठी
लिहिणे बरे नाही.
टाळ्यांसाठी लिहू नका
चाळ्यांसाठी लिहू नका.
पायाखालचे सोडून
आभाळाकडे पाहू नका.
साधे सोपे लिहा,
उगीच शब्दांचा गुंता नको!
तुमचे तुम्ही बघा
मराठी भाषेची चिंता नको!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मो. : 9923847269
Friday 3 February 2012
डर्टी गेम
कुणाला चढवले जाते,
कुणाला लोळवले जाते.
इथल्या माणसा-माणसाला
पद्धतशीर खेळवले जाते.
माणसात माणूस राहिला नाही,
घरात घरात घर राहिले नाही !
एवढे गलिच्छ राजकारण
आम्ही आजवर पाहिले नाही !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
(अप)प्रचार
अपप्रचार करता करता
प्रचार टाळला जात आहे.
प्रचाराच्या नावाखाली
शिमगा खेळला जात आहे.
ज्याच्या त्याच्या तोंडामध्ये
निव्वळ गटारगंगा आहे!
प्रचार प्रचार राहिला नाही
हा तर राजकीय दंगा आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Thursday 2 February 2012
आगीतून फुपाट्यात
नेत्यांच्या बंडखोरीचा
कार्यकर्त्यांना फटका आहे.
सामान्य कार्यकर्ता
ना घरका ना घाटका आहे.
ति्कडॆ उपेक्षेचा फुपाटा
इकडे पश्चातापाची आग आहे !
निष्ठेच्या प्रदर्शनासाठी
सगळे सोसणे भाग आहे !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
उमेदवारीचा जुगार
कुणी बसला घोडय़ावर,
कुणाची माघार आहे.
पक्षीय उमेदवारी म्हणजे
राजकीय जुगार आहे.
ऐनवेळच्या माघारीमागे
बरेच काही शिजलेले असते!
बळीच्या बकर्याला
गोड बोलून पाणी पाजलेले असते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)