Sunday, January 7, 2024

सावित्री नावाची वाघीण,शेळी कधीच झाली नाही !



दगडालाही भ्याली नाही,शिव्या शापालाही भ्याली नाही !
सावित्री नावाची वाघीण,शेळी कधीच झाली नाही !!
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त रंगले कवी संमेलन

पाटोदा-येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ३ जानेवारी २०२४ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाच्या बागेत आयोजित खुल्या काव्यसंमेलनात प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांनी सावित्रीचा वसा या मालिका वात्रटिकेने अगदी सहज सुलभ आणि तितक्याच परखड शब्दांनी क्रांतीज्योती, कवित्री सावित्रीबाई फुले यांचे जीवन चरित्र उलगडून दाखवले. 
आपल्या 'सावित्रीचा वसा' या मालिका वात्रटिकेमध्ये मध्ये सूर्यकांत डोळसे यांनी सावित्रीबाई फुले यांचा  जीवन पट उघडून दाखवतानाच 

दगडाला भ्याली नाही,
शिव्या-शापालाही भ्याली नाही.
सावित्री नावाची वाघिण
शेळी कधीच झाली नाही.

तुम्ही आम्ही शेळपट
सावित्री मात्र वाघिण होती,
कारण ज्योतीबाच तसा आहे.
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’सत्यधर्म’कसा आहे?..

अशा  शब्दात ज्योतिबा आणि सावित्रीचा सत्य धर्मही समजावून सांगितला. सावित्री आणि ज्योतिबांची जोडी ही एक आदर्श समाज सुधारकांची जोडी होती. त्यांनी एकमेकांच्या साथीने समाजातील तळागाळातील लोकांसाठी शिक्षण खुले केले. एकत्रपणे खूप मोठा लढा दिला. त्यांचा जोडा हा आदर्श जोडा होत हे सांगताना...

सावित्रीलाही नटता आले असते,
सावित्रीलाही मुरडता आले असते.
अव्यवहारी नवरा म्हणून
ज्योतीबाला खरडता आले असते.

लष्कराच्या भाकर्‍या कशाला भाजता?
असे ओरडता आले असते.
पण सावित्रीचा धर्म
सांगा कुठे तसा आहे?
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’सत्यधर्म’कसा आहे?..

सगळ्या कुलूपबंद व्यवस्थेची
शिक्षण हीच चावी होती.
ज्योतीबांना सावित्री मिळाली,
त्यांना जशी हवी होती.

सावित्रीबाई फुले जेवढ्या मोठ्या क्रांतिकारी समाज सुधारक आहेत तेवढेच ते मोठ्या त्या कवित्री आहेत, त्यांचे योगदान मराठी काव्यात खूप महत्त्वाचे आहे.
सावित्रीबाईंच्या कवितांचा नव्याने विचार केला पाहिजे.
त्यांनी सहज शब्दात लिहिलेल्या कविता आजही नव्या पिढीला प्रेरणा देणाऱ्या आहेत.. अत्यंत ऊर्जादायी आहेत हे सांगताना डोळसे पुढे म्हणाले,

सावित्री उर्जेची जन्मदात्री होती,
सावित्री कवयित्री होती.
आपला जोडा आहे का?
सावित्री-ज्योतीबाचा जसा आहे?
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’सत्यधर्म’कसा आहे?...

सावित्री ज्योतीबांच्या सत्यधर्माची
जित्ता-जागता आरसा होती.
सावित्री ज्योतींच्या सत्यधर्माचा
जित्ता-जागता वारसा होती.

सावित्रीने दिलेली ललकार
आपल्याला देता येईल?
कारण सावित्रीचा तो कंठ,
आपला तो घसा आहे.
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’सत्यधर्म’कसा आहे?..
असाही आग्रह आपल्या मालिका मात्र वात्रटिकेतून धरला
कोणतीही कला अथवा काव्य कुणाचे तरी अनुकरण व अनुसरण केल्याशिवाय निर्माण होत नसते. कोणतीही व्यक्ती कुणाच्यातरी अनुकरणातून शिकत असते, अनुकरण करता करता त्यावरती चिंतन मनन केले स्वतःच्या विचार मंथनाचे संस्कार त्यावर करीत अनुसरणची पायरी गाठली अनुसरण म्हणजे अनुकरण करता करता त्यात घातलेली स्वतःची शैली होय.जगात स्वयंभू कोणीही नाही प्रत्येक कलाकार किंवा कवी कवीवाट कोणाचा तरी प्रभाव असतो. कधी कधी आपण तो प्रभाव मान्य करण्याचे टाळतो किंवा आपल्याला ते कमीपणाचे वाटते. मात्र हे चुकीचे आहे असेही प्रतिपादन सूर्यकांत डोळसे यांनी केले. 
याचवेळी त्यांनी आपल्या अनेक वात्रटिका सादर केल्या. वाढत्या स्त्री भृण हत्येवरती भाष्य करताना
सखे,सावित्री... या वात्रटिकेमधून

आम्ही सावि्त्रीच्या लेकी,
पूजा वडाची करीतो.
गर्भातल्या लेकी आम्ही
गर्भातच मारीतो.

सखे,सावित्री...सांग,
तुझा असा कसा बाई वसा ?
आमच्या रक्तातला अंधार
सांग जात नाही कसा?

अशा शब्दात कोरडे ओढले.
प्रमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रोफेसर आबासाहेब हांगे होते. विशेष अतिथी म्हणून वर्षा एकबोटे निमंत्रित होत्या. व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. गणेश पाचकोरे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. मनोजकुमार प्रकाश, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. नामदेव चांगण, पर्यवेक्षक प्रा. अनिल जोगदंड, ग्रंथपाल प्रा. नंदकुमार पटाईत, प्रा.
जयंत साठे उपस्थित होते.
कार्यक्रमात सर्वप्रथम सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पमाल्यार्पण अध्यक्ष व अतिथींच्या हस्ते संपन्न झाले. 
यानंतर आयोजित काव्यसंमेलनाला मार्गदर्शन करताना सूर्यकांत डोळसे  म्हणाले की, युवकांनी काव्यनिर्मिती करताना जसे व्यक्त होता येईल तसे व्यक्त झाले पाहिजे. आपला हुंकार शब्दांमधून व्यक्त केला आपला आतला आवाज कवितेतून शब्दबद्ध करत असताना वृत्त किंवा अलंकार यांच्या बंधने झुगारून व्यक्त झाले पाहिजे. कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, साने गुरुजी यांनी उदात्त प्रेमावरती आणि देशप्रेमावरती केलेल्या कवितांचे दाखले देत
कॉलेज जीवन म्हणजे युवा अवस्था...प्रेम युवावस्थेतच होत असते. प्रेम खरे तर देशावर असते, आईवर असते, प्रेम महान व्यक्तींवर असू शकते किंवा निसर्गावर पण प्रेम हे केले पाहिजे कारण प्रेम ही अशी भाषा आहे की ती जनावरांना सुद्धा समजते म्हणून प्रेमभावना व्यक्त झाल्याचं पाहिजेत. याप्रसंगी त्यांनी 'चेंडूचं फूल' मधून 
'तू लाँग ऑफला 
मी लाँग ऑनला,
डोळ्यातलं पाणी आवरत 
तो तिला म्हणाला, 

नशिबात आलं असं समजून 
आता आपापलं क्षेत्र राखीत जा, 
कधी मनात आलंच तर 
एखादा ओव्हरथ्रो 
माझासाठीही फेकीत जा'.

या ओळी सादर गेल्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रचंड टाळ्या आणि प्रतिसाद मिळविला. याच वेळी त्यांनी आपल्या मालिका वात्रटिके मधून 

स्वत:चा वेडेपणा बघून
स्वत:वरच चिडला आहात.
स्वप्नांचे पंख लावून
पिसासारखे उडला आहात,
मग सरळ मान्य करा की,
प्रेमामध्ये पडला आहात...

कुणाशी तरी बोलून बोलून
मन हलकं हलकं होत आहे.
कंटाळा आला तरी
मन बोलकं बोलकं होत आहे.

जागेपणी स्वप्न पाहून
स्वप्नामध्येच पडला आहात.
दडविण्यासारखे काहीच नसतानाही
संकोचाने दडला आहात.
मग सरळ मान्य करा
प्रेमामध्ये पडला आहात...

कुणाच्या तरी चाहूलीने
काळीज धडधडत आहे.
राहून राहून कानमध्ये
कुणीतरी बडबडत आहे.

स्वत:तच स्वत:ला डिस्टर्ब करून
स्वत:वरतीच चिडला आहात.
मग सरळ मान्य करा की,
प्रेमामध्ये पडला आहात...

तुमच्या अंगाखांद्यावरती
मोरपिसं फिरत आहेत.
तुमच्या तना-मना‘ध्ये
फुलपाखरं शिरत आहेत.

इंद्रधनुचा गोफ करून
आकाशाशी भिडला आहात.
एक एक तारा तुम्ही
अलगदपणे खुडला आहात.
मग सरळ मान्य करा की,
प्रेमामध्ये पडला आहात..
मग सरळ मान्य करा प्रेमामध्ये पडला आहात' 
अशा हळुवार आणि नाजूक शब्द कळेना श्रोत्यांची दाद मिळवली. त्यांनी सादर केलेला ओव्हर थ्रो
तर प्रचंड हश्या आणि टाळ्या घेऊन गेला.

त्याला आवडायचा फुटबॉल,
तिला आवडायचा क्रिकेट,
कधी व्हायचा गोल,
कधी पडायची विकेट.

तेव्हा त्यांच्या लक्षात आले,
संसार म्हणजे खेळ नसतो !
आवडीनिवडी वेगळ्या असल्या तरी,
दोन जीवांचा मेळ असतो !!

यानंतर प्रमुख अतिथी वर्ष एकबोटे यांनीही आपल्या काही कविता सादर करीत आपल्या आयुष्यातील कवितेचे महत्त्व स्पष्ट केले आणि विद्यार्थी कवींना शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य प्रोफेसर हांगे म्हणाले की इतरांच्या प्रती केलेली कोणतीही चांगली वर्तणूक म्हणजे प्रेम असते. म्हणून सर्वावर प्रेम करत राहिले पाहिजे व युवकांनी काव्याच्या विश्वात नेहमी रमले पाहिजे. महाविद्यालयाच्या मराठी विभाग व महिला सक्षमीकरण समितीच्या वतीने आयोजित या काव्यसंमेलनात प्रा. प्रदीप मांजरे, डॉ. कुशाबा साळुंके, श्रीमती माधुरी पुराणिक, डॉ. प्रज्ञा बागूल, प्रा. जगन्नाथ पटाईत यांच्यासह विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्या अप्रतीम कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भारती नंदागौळी-फुलेकर व प्रा. कावेरी खुरणे यांनी केले. आभार डॉ. प्रज्ञा बागूल यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मराठी विभागप्रमुख  प्रोफेसर हमराज उईके, डॉ. दिलीप गिन्हे यांनी विशेष परिश्रम घेतले.

1 comment:

Anonymous said...

भारीच

दैनिक वात्रटिका l 23नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 174 वा

दैनिक वात्रटिका l 23नोव्हेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 174 वा l पाने -42 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1A5mkHsW3z8FfTwlz_...