
आजची वात्रटिका
--------------------
*निकालाचा मतितार्थ*
ज्यांना ज्यांना चढला होता माज,
त्यांचे त्यांचे पार खुट्टे उपटले गेले.
आपणच खोदलेल्या खड्ड्यात,
एक्झिट पोल वालेही आपटले गेले.
भ्रष्ट तितुका मेळवावा...
या मंत्राची पार वाट लागली आहे.
प्रचारा बरोबर अपप्रचाराची,
ज्याची त्याने सजा भोगली आहे.
ज्यांनी वाचली हनुमान चालीसा,
त्यांना सुद्धा कडूपण भोवले आहे.
प्रत्यक्ष अयोध्येने सुद्धा,
हे राम... म्हणायला लावले आहे.
कुणाच्या उज्वल भविष्याची,
बिर्याणी सुद्धा शिजली नाही.
नात्यामुळे गोत्यात आले तरी,
कुणी वयोमर्यादा मोजली नाही.
कुठे कुठे फॅक्टर चांलले आहेत,
कुठे कुठे ॲक्टर चालले आहेत.
पलटूराम आणि आलटूरामांनी,
सत्तेचे शिवधनुष्य पेलले आहेत.
अब की बार चारसो पारचा नारा,
तीनशेच्याच्याच आत बाहेर आहे.
वंचित आघाडीचे संचित बघा,
त्यांना तर थेट घरचाच आहेर आहे.
एकीचे बळ मिळते फळ,
अंधुकसा संधीप्रकाश दिसला आहे.
ईव्हीएम वरचा कलंकसुद्धा,
अगदी पुराव्यानिशी पुसला आहे.
हुकूमशाही आणि घराणेशाही,
नेहमीप्रमाणेच नडली आहे.
ज्याने त्याने विजयाची पावती,
लोकशाहीच्या नावे फाडली आहे
कोण चंद्रा? कोण नीतिमान?
सांगा कोण किती फेकू आहेत?
मोदीशाहीच्या एक खांबी तंबूला,
आता बाबुशाहीचे टेकू आहेत.
आम्ही लावला तेवढाच अर्थ,
जेवढी आमची मती आहे !
यापेक्षा जास्त अर्थ लावावा तर,
आम्हालासुद्धा ईडीची भीती आहे !!
- सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
मोबा.9923847269
-----------------------------
दैनिक वात्रटिका
6 जून 2024
अंक पाचवा l वर्ष चौथे
-----------------------------
दैनिक वात्रटिका l 6जून2024
वर्ष- चौथे
अंक -6 वासा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे