llआठवणीतील
मालिका वात्रटिकाll
आदर्श शिक्षक पुरस्कार
मिळवलेल्या शिक्षकाचे मनोगत
हसण्याच्या आणि रडण्याच्या
दोन्हीच्याही बेतात आहे.
माझाच विश्वास बसत नाही,
पुरस्कार माझ्या हातात आहे.
खूप खस्ता खाल्ल्या
प्रामाणिकपण नडला गेला.
हाता-तोंडाशी आलेला घास,
अनेक वेळा ओढला गेला.
शिकविता शिकविता
मीही पुरस्कारांच्या
ट्रीक्स शिकत गेलो.
माझ्यातल्या खऱ्या गुरुजीला
माझा मीच मुकत गेलो.
आवश्यक ते छक्के पंजे
मग मीही सुरू केले.
ज्यांनी ज्यांनी पुरस्कार लाटले
त्यांना त्यांना गुरू केले.
शिफारशी आणल्या,
कागदी घोडे जोडीत गेलो.
गल्ली-बोळातले सगळे पुरस्कार ,
पदरात पाडीत गेलो.
विद्यार्थी सोडून,
ज्यांना जे हवे ते देत गेलो.
आदर्शाया नशेपायी
शाळेतून अदृश्य होत गेलो.
हळूहळू कळत गेले.
प्रामाणिकपणाचे
किती धोके आहेत.
सत्याचे वाली खूपजण मिळाले ,
पण व्यवस्थेपुढे मुके आहेत.
हे मी थोडक्यात सांगातोय
अनुभव खूप धक्कादायक आहेत.
माझ्यापेक्षा कितीतरी जण
या पुरस्काराच्या लायक आहेत.
माझ्यासारखे कितीतरी बोके
शिकारीसाठी टपलेले होते.
वर्गातील एकलव्यांचे आंगठे,
यांनी केंव्हाच कापले होते.
शिक्षणाच्या हक्काचा कायदाही
मला रोखू शकला नाही.
असा एकही डाव नाही,
जो मी यासाठी टाकला नाही.
एकदा गल्लीतला मिळाला की,
दिल्लीतलाही मिळवता येतो.
दुसऱ्याच्या ताटातला घास
बघता बघता पळवता येतो.
त्यांना पुरस्कार कसला?
ज्यांना कुणी गॉडफादर नाही.
दुःखाची बाब एक
विद्यार्थ्याच्या नजरेत
कौतुक आणि आदर नाही.
बातम्या आला, फोटो आले,
टी.व्ही. वर मुलाखत आली.
विकतची का होईना
तेवढ्यापुरती पत जाली.
पुरस्कार म्हणजे कौतुक,
ही तर निव्वळ थाप आहे.
हाताने ओढावून घेतलेला
तळतळाट आणि शाप आहे.
व्यवस्थेला फसवू शकलो,
विद्यार्थ्यांना फसवू शकलो नाही.
माझ्यातल्या शिक्षकाला .
आज गप्प बसवू शकलो नाही.
वाटणारे वाटत राहोत,
लाटणारे लाटत राहोत,
ज्यांना खरोखर भेटावेत
ज्यांनाच भेटत राहोत.
आदर्शाची वाट आडवाट ,
मी कोळून प्यालो आहे !
लाज वाटली तरी सांगतो
मी खरोखर मुक्त झालो आहे !!
- सूर्यकांत डोळसे पाटोवा (बीड)
मोबा. 9923847269
------------------------------
पूर्वप्रसिद्धी-
फेरफटका-4192
दै.झुंजार नेता
5 सप्टेंबर 2011
1 comment:
सर आपण खूप सुंदर शिक्षकांबद्दल आपले मनोगत वात्रटिक यातून व्यक्त केले वाचून खूप आनंद झाला असेच सुंदर लेखन आपल्या हातून घडो ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि आपणास खूप खूप शुभेच्छा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
Post a Comment