Saturday, August 20, 2022

तर आमचीही मरायची तयारी आहे... मालिका वात्रटिका

महाराष्ट्रातील सामजिक भाष्यकार, मुक्त पत्रकार, प्रसिद्ध वात्रटिकाकार सूर्यकांत डोळसे यांची काळजाला भिडणारी आणि आत्मचिंतन करायला लावणारी मालिका वात्रटिका...
वाचा आणि इतरांनाही नक्की पाठवा.....
तर आमचीही मरायची तयारी आहे
माणसं मारून विचार मरतो
हे खुळचट गृहीत
तुमची धरायची तयारी आहे.
तर आम्हीही उदार आहोत
आमचीही मरायची तयारी आहे।।१।।
आज सगळी मंडळी आठवतेय
तुम्ही ज्यांना ज्यांना वर पाठवले आहे.
आपल्या मार्गातून तुम्ही
ज्यांना ज्यांना दूर हटवले आहे.
त्या सर्व सत्याग्रहींची
वाट धरायची तयारी आहे।।२।।
तुमचे शेपूटघालू धोरण
आम्हाला कधीच पचले नाही
साधे साधे सत्यही
तुम्हाला कधीच रुचले नाही.
मरणाला न भिता पंचनामा करायची तयारी आहे।।३।।
तुम्ही भेकड आहात,
तुम्ही खोकड आहात,
कुठली तरी नशा दिलेले
तुम्ही माकड आहात.
तुमच्या श्वापदांना पुरून
आमची उरायची तयारी आहे।।४।।
तुमच्या बाजूने कुणी नाही
पण विरोधात तरी कोण आहे?
ज्याच्या त्याच्या हाती
आपली पत्रावळी आणि द्रोण आहे.
खाल्ल्या मिठाला जागण्याची
परंपरा धरायची आहे।।५।।
माणसं मारून जिंकल्याचे
एक तरी उदाहरण दाखवा
तुम्ही हिंस्त्र बनण्याचे
एक तरी सबळ कारण दाखवा
तुमचे म्हणणे पटले तर
जिंकूनही हरायची तयारी आहे।।६।।
तुमची पक्की खात्री आहे
सत्याग्रहींची जमात अनाथ असते.
तुम्ही उघडा तमाशा मांडता
ज्याला पळकुट्यांची कनात असते.
कुणी मेले काय? कुणी जगले काय?
कुठे गणना करायची तयारी आहे?।।७।।
दोन मिनिटांची स्तब्धता पाळून
दोन आसवं गाळली जातात
तेव्हा सामाजिक सत्त्यात्मे
पुन्हा पुन्हा छळली जातात.
उद्याचे सगळे दु:खही
आमची सारायची तयारी आहे।।८।।
तुमचे शस्त्र नवे असते,
तुमचे अस्त्र नवे असते
तुमचे उद्दिष्ट बदलत नाही
जे तुम्हाला नेहमीच हवे असते.
अनेक गेले, अनेक जातील
तरीही पुरून उरायची तयारी आहे।।९।।
कुणी आमचा पाठीराखा नाही,
आम्हाला कुणी वाली नाही.
आमचा लढा संपविण्यासाठी
कुणाची माय व्याली नाही.
चांगले काही घडणार असेल तर
मागे सरायची तयारी आहे।।१0।।
आमच्या रक्ताचा एकेक थेंब
क्रांतिकारी इतिहास पेरीत जाईल.
स्वातंत्र्यासाठी जे जे झाले
ते ते पुन्हा करीत जाईल.
नवा विचार उगविण्यासाठी
रक्त पेरायची तयारी आहे।।११।।
कोण पुरून उरतेय ते पाहू?
कोण हरतेय ते पाहू?
किती मारले तरी
कोण मरतेय ते पाहू?
समाजासाठी आयुष्यावर
आमची झुरायची तयारी आहे।।१२।।
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
दैनिक पुण्यनगरी
17फेब्रुवारी2015

No comments:

एनर्जी स्टॉक...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- एनर्जी स्टॉक उद्याच्या आशेवरती, सगळेचजण जगत आहेत. म्हणूनच लोकसभेकडे, कुणी तटस्थपणे बघत आहेत. विधान...